डॉ. सचिन शिंदे
भारतीय शेती व शेती व्यवसाय हा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर कायमच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे. परंतु ज्या प्रमाणात शेती व्यवसायाला सामाजिक आर्थिक, शैक्षणिक धोरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे, तो अजून दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ या दृष्टिकोनातून आज यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. अशावेळी शेतीमधील करिअर व विकसित भारत २०४७ या व्हिजन मध्ये विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी कशा असतील. त्या कशा पद्धतीने बदलत आहेत. हे आज जाणून घेण्यासाठी हा लेख.
शेती हा व्यवसाय वेल्थ क्रिएटर म्हणून ओळखला जातो. शेतकरी १०० बी लावतो. सूर्यप्रकाश व खते पाणी यांच्या सहाय्याने लाखो किलो धान्य तयार करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएट होते म्हणून यात होणारे करिअर अतिशय समाधानाचे आहे. शेतीमधील करिअरचा विचार करायचा झाला तर प्रामुख्याने आपल्याला दोन भागात विभाजन करावे लागेल – एक म्हणजे पारंपरिक शेतीमधील नोकरीच्या संधी आणि दुसरे आधुनिक शेतीमधील संधी. या दोन्ही बाबींचा आपण सविस्तर विचार करणार आहोत.
हेही वाचा : JEE Main 2025च्या संयुक्त प्रवेश परीक्षा सत्र एकचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होईल परीक्षा
कृषी क्षेत्रातील करिअर आपण सविस्तर खालील विभागांमध्ये पाहूया. ते विभाग जसे शिक्षण घेताना उपयोगी पडतात तसे करिअरच्या दृष्टीने सुद्धा उपयोगी आहेत –
१. कृषी विज्ञान
२. कृषी अन्न तंत्रज्ञान
३. कृषी अभियांत्रिक
४. उद्यान विद्या
५. होम सायन्स
६. कृषी वानिकी
७. कृषी मत्स्य शेती
८. कौशल्य विकास आधारित करिअर संधी
९. आधुनिक शेती तंत्रज्ञान व करिअर
१०. कृषी व्यवस्थापन क्षेत्रातील संधी
वरील वेगवेगळ्या विभागात आज करिअरच्या प्रचंड संधी असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनिवडी व कौशल्य यांचा समन्वय साधून करिअरची निवड करणे आवश्यक आहे.
विकसित भारतातील कृषी करिअरचे काही आधुनिक घटक –
१. ड्रोन टेक्नॉलॉजी ऑपरेटर
२. योग्य जागेवरील शेती तंत्रज्ञान
३. GI अँड GPS अॅनालिसिस अँड ऑपरेशनल पर्सनल
४. एआय टेक्नॉलॉजी डेटा अॅनालिसिस
५. रोबोटिक्स आणि डेटा अॅनालिसिस
६. कार्बन सिक्वेस्ट्रेशन अँड अडॅप्टेशनल पर्सनल
७. क्लायमेट चेंड टेक्नॉलॉजी
अशा विविध नवीन करिअरच्या संधी आहेत. आपण प्रत्येक संधीचे विश्लेषण करणार आहोत.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०२१-२२ या वर्षांमध्ये शेती व शेतीसंबंधी काम करणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ४६.५ टक्के आहे. यात महिलांची संख्या वाढत आहे. परंतु या सर्वांचा विचार करता शेतीमधील सरकारी नोकऱ्यांमध्ये घट होत आहे. तसेच सर्व शासकीय नोकऱ्यांमध्ये मोठा बदल होताना दिसत नाही. याचा अर्थ शेतीमधील करियर करताना आता नवीन क्षेत्रनिहाय होणारे बदल व त्यासंबंधीच्या संधी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Success Story: कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता सुरू केले मधमाशीपालन; दोन कोटींच्या घरात पोहोचला व्यवसाय
विविध नोकऱ्यांमध्ये होणारी वाढ
यामध्ये महत्त्वाचा बदल हा आहे की शासकीय नोकरीमध्ये सातत्याने घट होत आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण फक्त १.४ कोटी आहे म्हणजे १०० नोकऱ्यांपैकी फक्त दोन नोकऱ्या सार्वजनिक क्षेत्रात आहेत. परिणामी केवळ १.४ टक्के काम करणाऱ्या लोकसंख्येला सरकारी नोकरी मिळू शकते, ज्यामुळे या नोकरीमध्ये स्पर्धा तीव्र आहे. परंतु कौशल्याधारित नोकरीच्या संधी जास्त आहेत. त्यात शेतीमधील सर्व विभागात विकसित भारत २०४७ या कार्यक्रमांतर्गत नोकरीचा सुवर्णकाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या देशात ५३ कृषी विद्यापीठे आहेत. पाच अभिमत विद्यापीठे कृषीचे शिक्षण देत आहेत. चार केंद्रीय विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रात ४७ शासकीय महाविद्यालये व १५५ खासगी महाविद्यालय कृषी शिक्षणाची धुरा सांभाळत शेतीमध्ये हातभार लावत आहे. या सर्वांमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आधुनिक शेतीमध्ये हातभार लावत आहे. पुढील लेखामध्ये आपण पारंपरिक नोकरीच्या संधींचा आढावा घेणार आहोत.
(लेखक सातारा येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत)
sachinhort.shinde@gmail.com