डॉ. श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर वेगवेगळे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. अभियंता म्हणून वावरलेल्या वडिलांना संगीत क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलाची म्हटली तर चिंता होतीच. मात्र, त्यांनी ते स्वीकारले कसे याची ही उलगड.
स्वत:च्या मुलाशी पुरेसा संवाद न साधता येणे याचे दु:ख काय असते ते गेले पंधरा वर्षे मी सहन करत आलो आहे. एकुलता एक मुलगा वाढवताना मला पुरेसा वेळ देता येत नाही, कंपनीच्या कामाकरता सकाळपासून रात्रीपर्यंत मी गर्क असतो याची खंत मनात बाळगून आहे. पण त्याच वेळी जमेल तेव्हा मुलाशी संवाद साधत असताना त्याचे कडून खुल्या मनाने संवाद साधला जात नव्हता. अवास्तव नसून रास्त अपेक्षा ठेवणे हे कसे चूक आहे याविषयी मला बायकोकडून अनेकदा ऐकावे लागले. मल्हारने तसे काही सांगितले नसले तरी जेव्हा तो म्हणाला, ‘मला गाण्यातच करिअर करायचे आहे’ त्या क्षणी आलेले दडपण तो नोकरीला लागला तोपर्यंत कधीच गेले नव्हते. त्याला नोकरी मिळाली किंवा ती लागली म्हणण्यापेक्षा केवळ माझ्या शब्दावर त्याला प्रशिक्षणार्थी म्हणून मित्राच्या कंपनीत चिकटवले गेले. कंपनीत सर्वाचाच पगार भरभक्कम असल्यामुळे त्यालाही तो प्रशिक्षणानंतर मिळायला लागला. पण याचा अर्थ उलटाच मल्हारने काढला. माझे काम मी नीट करत असल्यामुळेच मला एवढा पगार देतात. तर यापेक्षा कामात शिकणे किंवा प्रगती करणे यावर मी कशाकरता लक्ष देऊ?
गाणे गाणे आणि गाणे
गाण्यावर संसार चालू शकतो यावर माझा विश्वास कधीच नव्हता. भली भली मंडळी महिन्याकाठी लाखांनी कमावतात असे आकडे माझ्या तोंडावर फेकले जात. पण साधे सुधे सामान्य गायक काय करतात याचा कधीच त्यात उल्लेख नसतो. मल्हारने तीन वेळा रि?लिटी शो साठी अयशस्वी ऑडिशन दिली. चौथ्यांदा त्याच्या आईनेच अर्ज भरला व त्यांचे भांडण झाले. तेव्हा एक प्रकारे मी सुस्काराच टाकला होता. सारेगामा किंवा इंडियन आयडॉल हे आपल्यासाठी नाही हे तरी त्याला उमजले असावे. खरे तर यात यशस्वी झालेल्या गेल्या पंधरा वर्षांतील अडीच तीनशे मुला मुलींपैकी जेमतेम पंधरा-वीस जणांची नावे मध्येच कुठेतरी ऐकू येतात एवढेच! हे मला चांगले माहिती होते याची अनेक ठिकाणी मी चौकशी केली होती. पण हा उल्लेख केला तर घरात फक्त भांडणे होत. गाण्यात करिअर म्हणजे नेमके काय याची कोणतीही संकल्पना मल्हारच्या किंवा त्याच्या आईच्या समोर नव्हती. या उलट आयटी कंपनीमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे मुळात आखणी शिवाय काम नाही ही शिस्त माझ्या मनात रुजली होती. शास्त्रोक्त संगीत मल्हारला आवडत नाही हे लक्षात आल्यावर अजूनच माझी धडधड वाढली. एकीकडे छानशी नोकरी करत स्वत:चा छंद जोपासण्यासाठी तो रस्ता ठीक असतो. संगीताच्या समुद्रामध्ये स्वत:चे होडके घेऊन वल्हवत राहणे यातील आनंद वेगळाच असतो. प्लेबॅक सिंगर म्हणून हिंदी मध्ये गेल्या वीस वर्षांत होऊन गेलेले बदल त्यातील नामवंतांनाही चक्रावून टाकणारे ठरले आहेत. मुलगा काय करेल ते खरं.
सुखावणारी ओळख
एक गोष्ट मात्र खरी होती की मल्हारचा आवाज सहजगत्या कानावर पडला तर तो कानाला गोड लागत असे. काहीतरी वेगळं होतं खरं त्यात. पण माझे सारे नकारार्थी विचार ही गोष्ट मोकळेपणाने मान्य करत नव्हते. हेही तितकंच खरं होतं. गाण्यातील यशाकरता वेळ द्यावा लागतो हे मला कळत असले तरी वळत नव्हते. कुठल्याही कलेतील अर्थार्जनासाठी झगडावे लागते, रस्ता खडतर असतो, मात्र आनंददायी असतो हे वाक्य छान वाटले तरी ते मुलाच्या वाटय़ाला जसेच्या तसे येऊ नये हे बाप म्हणून मला वाटत होते. रोज रात्री उशिरापर्यंत बाहेर असलेला मल्हार काय करतो याचा आईला पत्ता नव्हता. तो लावण्याकरता महिनाभरात मला पुरेसे यश आले. छोटय़ा मोठय़ा ऑर्केस्ट्रा बरोबर विविध ठिकाणी गाणे अशा फुटकळ कामांमध्ये तो पूर्णपणे दंग झाला होता हे माझ्या लक्षात आले. पण मी चिकटवून दिलेल्या नोकरीमध्ये नियमितपणा असल्यामुळे व तसेच मित्राकडून कोणतीही तक्रार नसल्यामुळे मी याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे ठरवले.
आणि अचानक
एके दिवशी शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस संपताना माझा एक कलिग हातामध्ये एक मराठी पेपर घेऊन आला. आमच्या ऑफिसमध्ये मराठी पेपर हातात असणारा माणूस दिसत नाही. त्यामुळे मी जरा चकित झालो. ‘सर अभिनंदन. छान जाहिरात आलीय या पेपरमध्ये मुलाच्या फोटोसकट. तुम्ही पाहिलीच असेल ना? आपल्या ऑफिसमधल्यांना त्याचे कौतुक वाटले, म्हणून हा अंक मिळवून तुम्हाला दाखवायला आलो आहे.’ सहकारी काय बोलतो आहे ते क्षणभर मला कळतच नव्हते. पण अंक उलगडला आणि साराच खुलासा झाला. एका गाजलेल्या ऑर्केस्ट्राचे जाहिरातीत आमचा प्रमुख गायक म्हणून मोठय़ा टाईपात मल्हारचे नाव व फोटो होता. हे वाचून माझ्या डोळय़ात टचकन पाणी तरळले. त्या कार्यक्रमाची तिकिटे काढून मी आणि मल्हारची आई त्याला कळणार नाही अशा जागी बसलो होतो. त्याच्या गाण्याला मिळणारे वन्स मोअर पाहून व प्रेक्षकांचा जल्लोष ऐकून आमचे अंगावर रोमांच उठत होते. कार्यक्रम संपल्यावर त्याला गाडीत घालून आम्ही घरी घेऊन आलो. बदललेले बाबा बघून तो जरा धास्तावलेला होता. पण मग हळूहळू मोकळा होत गेला. कधी नव्हे तो त्या दिवसापासून आमच्यातील संवाद मोकळेपणाने सुरू झाला. योग्य वेळ येताच त्याचा स्वत:चा ‘मेघ-मल्हार ऑर्केस्ट्रा’ सुरू करण्यासाठी भांडवल मी त्याला देऊ केले. स्वत:च्या गाण्यांचा पहिला अल्बम यूटय़ूब वर टाकण्याचा कार्यक्रम आईच्या हस्ते मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत पार पडला. आता माझी ऑफिस मधली ओळख वेगळीच झाली होती. ‘गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा’.