फारूक नाईकवाडे
गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील पर्यावरण या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. आतापर्यंत या घटकाचा समावेश भूगोल किंवा विज्ञान घटकातील मुद्द्यांच्या स्वरुपात केला जायचा. आता तो स्वतंत्रपणे समाविष्ट करून सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. या घटकाची मुद्देनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.
मानवी विकास व पर्यावरण
मानवी विकास व पर्यावरण यांमधील परस्परसंबंध समजून घ्यावेत. विकासाचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा मुद्दा पर्यावरणीय आघात (Environmental Impact) या संकल्पनेच्या आधारे समजून घ्यावा. विविध उद्याोग, पायाभूत सुविधा प्रकल्प यांचे पर्यावरणीय आघात मूल्यमापन ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी.
चालू घडामोडींमध्ये चर्चेतील प्रकल्पांना पर्यावरणाच्या आधारे होणारे विरोध, त्यातील मुद्दे यांची माहिती करून घ्यावी. याबाबत पर्यावरणीय चळवळींच्या वाटचालीतील ठळक टप्पे माहीत करून घ्यावेत.
पर्यावरण पूरक विकास
पर्यावरण पूरक विकासामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना महत्त्वाची आहे. ही संकल्पना समजून घेऊन त्यातील समाविष्ट घटक माहीत करून घ्यावेत.
वसुंधरा परिषदा आणि अजेंडा २१ यांचा थोडक्यात आढावा घ्यावा.
पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास लक्ष्ये समजून घ्यावीत व त्याबाबत भारताकडून विहीत उद्दिष्टे समजून घ्यावीत. शक्यतो याबाबत सहस्त्रक विकास लक्ष्यांचाही तुलनात्मक आढावा घ्यावा.
भारताची शाश्वत विकास उद्दीष्टांबाबतची निर्धारीत उद्दिष्टे व त्यातील कामगिरी माहीत असायला हवी.
हरित आणि नील अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि त्यांच्या विकासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषत: वनसंधारण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार, त्यांचा वापर, महत्त्व, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता या बाबी उदाहरणांसहित समजून घ्याव्यात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी शासकीय स्तरावरील योजना आणि या क्षेत्रातील नवनवीन उपक्रम माहीत करून घ्यायला हवेत. योजनांचा अभ्यास करताना त्यांचे नाव. उद्दीष्ट, ब्रीदवाक्य, कालावधी, असल्यास लाभार्थ्यांचे निकष व लाभाचे स्वरूप इ. मुद्दे पहायला हवेत.
वन संधारण हा मुद्दा त्यातील शास्त्रीय संकल्पना समजून घेऊन अभ्यासायला हवा. निर्वनीकरणाचे परिणाम, वनसंधारणाची आवश्यकता, त्याचे फायदे व त्यासाठीचे शासकीय व अशासकीय प्रयत्न या मुद्द्यांच्या आधारे तयारी करायला हवी.
विविध प्रकारची प्रदूषणे
वायू, ध्वनी, पाणी, मृदा इत्यादी प्रकारची प्रदूषणे समजून घ्यावीत. या प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठीचे निकष, प्रदूषकांची मान्य मर्यादा/प्रमाण, धोकादायक पातळ्या यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करता येईल.
सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे स्त्रोत आणि त्यांचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी होणारे प्रयत्न यांचा आढावा घ्यायला हवा.
वायू प्रदूषणामध्ये हवेतील घटक वायूंचे, वाफेचे व solid particlesचे प्रमाण, त्यातील वाढ, त्यांचे स्त्रोत, त्यांच्या धोकादायक पातळ्या व त्यांबाबतचे निर्देशांक, अशा पातळ्या ओलांडलेली भारतातील प्रदूषित शहरे हे मुद्दे पहावेत.
जल प्रदूषणामध्ये प्रदूषकांचे प्रकार, त्यांच्यामुळे होणारे तोटे/परिणाम, त्यांचे स्त्रोत, औद्याोगिक व कृषी क्षेत्रामुळे होणारे जल प्रदूषण, त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाय योजना हे मुद्दे पहावेत. यामध्ये Eutrophication सारख्या संकल्पना समजून घ्यायला हव्यात.
मृदा प्रदूषणामध्ये शेतीची आदाने, औद्याोगिक कचरा/ सांडपाणी, मृदेची धूप अशा कारकांमुळे होणारे प्रदूषण व त्याच पिकांवर होणारे परिणाम समजून घ्यायला हवेत.
पर्यावरणीय आपत्ती
नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे उद्भवणाऱ्या सजीवांना अपायकारक असलेले घटना/ परिणाम म्हणजे पर्यावरणीय आपत्ती हे लक्षात घ्येऊन हा मुद्दा अभ्यासावा. त्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास, जैवविविधतेचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश पर्यावरणीय आपत्तीमध्ये करायला हवा.
पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्यांच्या आधारे करावा.
जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना
जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, आवश्यक उपाय योजना या मुद्द्यांच्या आधारे करावा. यामध्ये पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA) व कार्बन क्रेडिटस या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.
नैसर्गिक आपत्ती व त्यांचे उपपप्रकार, त्यांची कारणे, तीव्रता मोजण्याची एकके, परिणाम, पूर्वसूचनेसाठीच्या प्रणाली इ. मुद्दे समजून घ्यावेत.
पर्यावरण संरक्षणाबाबत कायद्यांचा आढावा घ्यायला हवा. यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, ठळक तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/ राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संस्था/ संघटना यांचा अभ्यास कार्यक्षेत्र, स्थापनेचे वर्ष, उद्देश, मुख्यालय, ब्रीदवाक्य, ठळक कार्ये, मिळालेले पुरस्कार, संघटनेकडून देण्यात येणारे पुरस्कार, सध्याचे अध्यक्ष, भारत सदस्य आहे किंवा कसे, असल्यास भारताची भूमिका या मुद्द्यांच्या आधारे करावा.