बीए उत्तीर्ण झालो आहे. यूपीएससी द्यायची इच्छा आहे. मला दहावीत ८४ व बारावीत (विज्ञान) ८१ गुण होते. कृपया मला मार्गदर्शन करावे की मी प्लॅन बी साठी आता काय करावे?- अभ्युदय

इंजिनीअर न बनता या चुकीच्या रस्त्यावर का गेलास? आता मिळेल ती नोकरी शोध वा एम.ए. कर. किमान दोन वर्षे नोकरी करताना वा एम.ए.करताना एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास समजावून घेत अभ्यास कर. अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्लॅन- बी आपोआप तयार होत असतो. या उलट दहावीपासून यूपीएससीची चर्चा करणाऱ्यांच्या संदर्भात घसरण सुरू होते. तुझे ध्येय, तुझे स्वप्न, तुला मिळालेले बीएचे गुण कळवले नसले तरी पुढील वाटचालीचे खडतर स्वरूप तुला विस्ताराने सांगितले आहे. त्यावर विचार कर. शुभेच्छा.

नमस्कार सर, मला दहावीत ९४, बारावी कला शाखेत ८८.६२ टक्के, बीए मध्ये ८२ होते. मी सध्या एम.ए. समाजशास्त्र या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. मला बीए दरम्यान जाणवले की यूपीएससी, एमपीएससी मनापासून करावेसे वाटत नाही, त्यात रस नाही. समाजशास्त्र आवडायचे म्हणून एम.ए.ला अॅडमिशन घेतले. पुढे नेटची परीक्षा देताना सोबत बी.एड. – एम.एड. इंटिग्रेटेड करावे असे वाटते, पण ‘हा कोर्स केलेले खूप जण बेरोजगार आहेत, खूप कमी पगार मिळतो, हे आऊटडेटेड झालंय, आता बी.एड. ४ वर्षांचं होणार आहे’ असं सगळं ऐकायला मिळतं, तर मी काय निर्णय घेणे योग्य राहील? माझी करियरची वाटचाल चुकली तर नाही ना असेही वाटू लागते. मला चित्रकला इ. मध्येही आवड आहे तर इंटेरियर डिझाइन मध्ये डिप्लोमा करू का? पण तो रस्ता अजूनच वेगळा होऊन जाईल, नेमके काय योग्य राहिल? कृपया मार्गदर्शन करावे.प्राजक्ता अहिरे.

आपण काय शिकत आहोत? कशाकरता शिकत आहोत? याचा कसलाही विचार न करता अभ्यास व गुण चांगले असूनही तुझ्यासारखी परिस्थिती ओढवणारे सहज निदान २५ टक्के विद्यार्थी आसपास आहेत. केवळ तुझ्या करता उत्तर न देता त्या २५ टक्यांकरता हे उत्तर मी सविस्तर देत आहे. दहावी नंतरची शाखा निवड डोळसपणे केली तर सायन्स मध्ये स्कोप भरपूर असतो, कला शाखेतून यूपीएससी करून पद मिळवू, कॉमर्स मधून एमबीए किंवा सीए करून टाकू अशा भ्रमात सुरुवात होत नाही. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही रस्त्याला जाण्यासाठी त्यातील माणसांना भेटणे व त्यांच्याकडून माहिती घेणे हे गरजेचे असते. म्हणजेच सायन्स मधून इंजिनीअर झालेला करतो काय? डॉक्टरीला जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला काही मिळाले काय? यूपीएससी कितव्या प्रयत्नात पास होता येते किंवा असा माणूस समक्ष भेटतो का? बारावी नंतर सलग सीएच्या परीक्षा देऊन पास झालेले किती? अशा सोप्या प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या प्रत्येक मुलाची फसगत कधीच होत नाही. या उलट बीए केले, एमए केले, आता बीएड, एम एड करू? का सेट नेट देऊ? का पीएचडी करू? अशी शिक्षणाची न संपणारी वाट समोर उभी राहते. शिक्षकी पेशात नोकऱ्या नाहीत हे तू पहिलीत प्रवेश घेतल्यापासूनचे वास्तव एम ए होईस्तोवर तुला कळले नाही का? असो…

तुझ्यासाठी मास्टर्स इन सोशल वर्कचा सुंदर अभ्यासक्रम वाट पाहतो आहे. तो पूर्ण केल्यावर विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये कामाला सुरुवात करता येते. मिळाल्यास सरकारी नोकरीच्या संदर्भातही विचार करता येतो. यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना भेट अभ्यासक्रमाची माहिती घे चांगली करियर नक्की सुरू होईल.

Story img Loader