डॉ. श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर या चारीचे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. या लेखात स्पोर्ट्स मॅनेजमेंटबद्द्ल..
आत्याने तिचं नाव ठेवलं होतं निशिगंधा.आजी आवर्जून तिला निशिगंधा म्हणत असे. पण ती तिच्या बाबांची लाडकी फक्त निशी होती. बाबांचा लाडका खेळ क्रिकेट. तोच तिलाही खूप आवडे. विराट तर तिचा अगदी लाडका खेळाडू. बाबांनी तिला छोटी असताना खेळणे म्हणून पहिल्यांदा आणली ती प्लास्टिकची बॅट, मात्र इयत्ता दुसरी झाल्यानंतर तिने हट्ट करून मिळवली होती खरी खुरी क्रिकेटची बॅट. तिच्या उंचीची छोटी बॅट शोधताना बाबांचा अख्खा दिवस वाया गेला होता. पण बॅट मिळाल्यानंतर निशी आणि बाबांचा आनंद गगनात मावत नव्हता. पुढचे दोन महिने बाबा ऑफिसातून परत कधी येतात आणि चेंडू टाकून ती विराट सारखी फलंदाजी कशी करते असा खेळ चालू होता. घरातील काय पण आसपासच्या सगळय़ा शेजारीपाजाऱ्यांना याची गंमत वाटत असे. त्या अख्ख्या सोसायटीमध्ये क्रिकेटचा नाद लागलेली एकुलती एक मुलगी निशीच होती.
हायस्कूल सुरू झालं आणि निशीने तिच्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ग्राउंड वर लांब गेलेला चेंडू निशी पटकन फेकते, तोही नेमका कॅच देऊन हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला सामावून घेतलं. मात्र बॅटिंग तिला सरते शेवटीच मिळायची. एकदा आधीचे सगळे खेळाडू जेमतेम धावा करून आऊट झालेले असताना निशीने चक्क तीस धावा केल्या तेव्हा मात्र सगळय़ांचा ‘आ’वासला होता. त्या दिवशी मॅच निशीने जिंकून दिल्यापासून तिची बढती झाली आणि चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर तिचा खेळ सुरू झाला. जेमतेम बारा वर्षांच्या निशीला मॅचच्या आदल्या दिवशी उद्या खेळायला ये म्हणून निरोप द्यायला टीम मधील तीन चार मित्र आवर्जून घरी यायला लागले. याच सुमाराला निशीने बॉय कट करून घेतला व कॅप घातल्यावर ती मुलगा आहे की मुलगी हे मैदानावर कळेनासे झाले. उन्हामुळे चेहरा कधीचा रापलेला होता. पण ती सावळी छटा सुद्धा तिला शोभून दिसे. करमणूक व नाईलाज म्हणून मुलांच्या ग्रुप मध्ये खेळणं आठवी पास झाल्यानंतर बंद झालं आणि निशीने रीतसर एका फक्त मुलींना शिकवणाऱ्या क्रिकेट कोचिंग क्लबमध्ये नाव घालून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. इतके दिवस तिचे कौतुक करणारे सारे नातेवाईक आता मात्र हे वेड कुठे जाणार म्हणून नाक मुरडायला लागले होते. एकीकडे शाळा व अभ्यास चालू होता. कायम सत्तर टक्के मार्क तिने टिकवले असल्यामुळे त्याबद्दल कोणाला बोलायला जागा नव्हती. मुलीच्या खेळावर होणारा खर्च खूप वाढतोय म्हणून अधून मधून तिची आई तक्रार करायची एवढेच. अधून मधून एखाद्या टूर्नामेंटमध्ये छान धावा केल्या म्हणून तिचे नाव वृत्तपत्रातही छापून यायला लागले होते. पण एकूण मुलींच्या क्रिकेट कडे पूर्णत: दुय्यम म्हणून बघितले जाण्याचे वातावरण असल्यामुळे याचे कौतुक जेमतेमच राही. अशात तिची दहावी सुरू झाली आणि लावलेले क्लास, शाळा व अभ्यास यात थोडेसे क्रिकेट मागे पडले.
निमित्त दुखापतीचे
दहावी नंतरच्या मोठय़ा सुट्टी मध्ये एकदा मॅच खेळताना उसळता चेंडू तिच्या बरगडीवर बसला आणि बरगडी फ्रॅक्चर झाली. हाडाच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या महिनाभराच्या विश्रांतीनंतर वयात आलेल्या निशीचे वजनही वाढले होते, खेळण्याचा उत्साह असला तरी सुद्धा क्षेत्ररक्षण करतानाची दुखण्याने चपळाईही कमी झाली होती. फिटनेस नीट नाही याकरता प्रथमच तिला टीम मधून वगळण्यात आले. सलग सात दिवस नाराज झालेली निशी खेळ चालू असताना पॅव्हेलियनमधे मनात धुमसत बसली होती आणि त्याचवेळी अकरावीची सुरुवात झाली. निशीने ठरवून क्रिकेट कडे पाठ फिरवली ती कायमचीच. वडिलांना वाईट वाटले होते तरी इलाज नाही हे त्यांनी समजून घेतले.
मात्र, क्रिकेटवर झालेला अवाढव्य खर्च आईला कायमच बोचत असे. अधेमधे ती जरा बोचऱ्या शब्दात याची जाणीव निशीला करून देई. शांतपणे उलट उत्तर न देता ती ते सारे ऐकून घेत असे. फस्र्ट क्लास टिकवून निशीचा कॉमर्सचा अभ्यास चालू होता. आईने सुचवून सुद्धा तिने सीए किंवा एमबीएचा विचार करायलाही थेट नकार दिला. तेव्हा मात्र आईचा संताप उफाळून आला. नुसती बीकॉम झालीस, जेमतेम नोकरी मिळाली तर तुझ्या लग्नाला क्रिकेटवर खर्च केलेले पैसे तरी उपयोगी आले असते असे तिने मुलीला एकदा ऐकवले. दोघींमध्ये त्या दिवशी मात्र जोरदार भांडण झाले. साऱ्याच मुली सांगतात तसे निशीने आईला बजावले, ‘माझ्या लग्नाचा विषय तू पुन्हा कधी काढायचा नाहीस. त्याची चिंता तुला करण्याचे कारण नाही’. हा संवाद ऐकून बाबा मात्र अवाक झाले होते.
वेगळी दिशा, खेळातील
पदवी परीक्षा देण्यापूर्वीच निशीने कसली तरी एक प्रवेश परीक्षा दिली होती. त्याबद्दल आई-बाबांना तिने अवाक्षरही सांगितले नव्हते. पदवीचा निकाल व त्या प्रवेश परीक्षेचा निकाल एकाच आठवडय़ात लागला. भोपाळ येथील नामांकित स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला तिने प्रवेश मिळवला होता. वडिलांना आनंद झाला व आईला आश्चर्याचा धक्का बसला. दोन वर्षांचा तो अभ्यासक्रम उत्तम रीतीने पार पाडून निशी त्यात पहिली आली. एका मोठय़ा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तिला मोठय़ा पगारावर स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये ट्रेनी मॅनेजर म्हणून दाखल करून घेतले. एका वर्षांच्या प्रोबेशन नंतर तिला कोणते काम करायला आवडेल, असे विचारले असता क्रिकेटशी संबंधित सर्व कामात मला रस आहे असे तिचे उत्तर होते. अर्थातच तिच्या आवडत्या कामावर तिची नेमणूक झाली.
ज्यांच्या बरोबर ती क्रिकेट खेळली होती, तीच मुले आता विविध टीमचा भाग म्हणून खेळताना निशीला मॅडम म्हणून हाक मारतात आणि त्यांना लागणाऱ्या सगळय़ा गरजा पुरवण्याकरिता तिला विनंती करतात. एका प्रसिद्ध टीमच्या कॅप्टनकडून निशीला लग्नाची मागणी आली आहे. अर्थातच या बातमीवर तिची आई अतिशय खुश आहे. जेमतेम दोन वर्षांच्या नोकरीनंतर बाबांनी तिच्या क्रिकेटवर केलेला एकूण खर्चाचा चेक बाबांच्या हस्ते आईला सप्रेम भेट म्हणून वाढदिवसाला तिने दिला तेव्हा तिघांच्याही डोळय़ात आनंदाश्रू होते.