गणित हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा नावडता विषय असला तरी अनेक विद्यार्थ्यांना तो आवडतो आणि गणितातच करिअर करण्याची इच्छा असते. इन्शुरन्स क्षेत्राचा आत्मा असलेल्या अॅक्चुरीजपासून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत, विशेषत: डाटा सायन्स क्षेत्रासाठी गणित विषय पायाभूतच मानला जातो. दहावीनंतर गणित विषय खूप आवडतो मात्र शास्त्र विषय आवडत नाही अशा विद्यार्थ्यांना आर्ट्स शाखेतूनही गणितात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन करिअर घडवता येते. गणित व शास्त्र दोन्ही विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र शास्त्र शाखा निवडणे गरजेचे आहे.

गणित या विषयामध्ये संशोधन करण्यासाठी १९९८ साली चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट ( www. cmi. ac. in) ही संस्था स्थापन झाली. २००६ पासून ही संस्था विद्यापीठ म्हणून ओळखली जाते. या विद्यापीठाकडे कॉर्पोरेट तसेच गव्हर्नमेंट क्षेत्राकडून निधीचा ओघ सुरु असतो. या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या संस्थेमधून बारावीनंतर बीएससी मॅथेमॅटिक्स व कॉम्प्युटर सायन्स हा कोर्स कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तर मॅथेमॅटिक्स व फिजिक्स हा कोर्स शास्त्र शाखेतून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या तीन वर्षांच्या कोर्सेसच्या प्रवेशासाठी संस्था बारावीनंतर एक राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा घेते जी यंदाच्या वर्षी २४ मे २०२५ या दिवशी देशातील अनेक शहरांमध्ये घेतली जाईल.

या परीक्षेत दोन सेक्शन असतील , पहिल्या ए सेक्शन मध्ये ४ मार्कांचे दहा प्रश्न असतील जे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. दुसऱ्या बी सेक्शन मध्ये दहा मार्कांचे सहा प्रश्न असतील. सेक्शन ए मध्ये ४० पैकी किमान २४ मार्क पडणे आवश्यक आहे, तरच विद्यार्थ्यांचा सेक्शन बी तपासला जाईल. दोन्ही सेक्शनमध्ये १२ वी पर्यंतच्या गणितावर आधारित प्रश्न असतात. परीक्षेसाठी १५ एप्रिल पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. नॅशनल सायन्स ऑलिंपियाडमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. या संस्थेमध्ये गणित, कॉम्प्युटर सायन्स व डाटा सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय आहे यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते. एवढंच नाही तर मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स व फिजिक्स या विषयांवर पीएचडी करण्याची सोयही या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये मानाचं स्थान मिळतं.

बारावीनंतर शास्त्र शाखेतून अनेक महाविद्यालयांमध्ये गणित विषयात बीएससी पदवीची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आयआयटी मधून एमएससी या पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. अर्थात त्यासाठी पदवीच्या शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना ‘जाम’ नावाची एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई, कानपूर , दिल्ली, मद्रास,पाटणा , रूरकी , खरगपूर ,गांधीनगर , धनबाद , पाटणा , मंडी , रोपार , गुवाहाटी , भुवनेश्वर तिरुपती येथील आयआयटी मधून मॅथेमॅटिक्स तसेच मॅथेमॅटिक्स व कॉम्प्युटींग या विषयांमध्ये दोन वर्षांचा एम एस्सी कोर्स करण्याची संधी मिळते. याच परीक्षेतून विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या बंगलोर मधील संस्थेतून एमएससी तसेच पीएचडी करण्याची संधी मिळते. गणितामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परदेशातही उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या संधी उपलब्ध आहेत. गणिता मध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना विमा क्षेत्राचा आत्मा असणाऱ्या अॅक्चुरीजमधील परीक्षा देणं शक्य असते. विमा क्षेत्र हे सातत्याने वाढत जाणारं क्षेत्र आहे. यामधील इन्शुरन्स अंडररायटर आणि इन्शुरन्स क्लेम अॅडजस्टर या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती पात्रता या परीक्षांमधून मिळते. यासाठी कोणत्याही शाखेतून बारावीनंतर इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्चुरीज ऑफ इंडिया या संस्थेमार्फत एक अॅक्चुरिअल कॉमन इन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे या विषयातील तेरा परीक्षा देता येतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या परीक्षा एकीकडे पदवी / पदव्युत्तर शिक्षण चालू असताना देता येतात. या परीक्षांनंतर विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होतात. गणित विषयात पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंग, इन्शुरन्स, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, फायनान्शिअल अॅनॅलिसिस , बिझनेस अॅनॅलिसिस, डाटा सायन्स, ऑपरेशन रिसर्च अशा विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध होतात.

vkvelankar@gmail. com