डॉ. श्रीराम गीत
आपल्या मुलांनी काही हट्ट धरला तर त्याला नाही कसे म्हणावे, हे सहसा कोणी सांगत नाही. मात्र, मुलांचा हट्ट चुकीच्या दिशेने जेव्हा जायला लागतो तेव्हा आईला दोष द्यायला मात्र सारेच उभे असतात. विशेषत: मुलांचे कमी होत जाणारे मार्क, वर्गात लक्ष न दिल्यामुळे वर्ग शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडे केलेली तक्रार, आणि घरात अभ्यासावरून होणारी नियमितपणे सुरू झालेली भांडणे या साऱ्याचा मला कुणाल आठवीत गेल्यावर पासून अगदी वीट आला होता. मी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून गेली दहा वर्षे काम करते. मला तसे सगळेच विषय शिकवावे लागतात. त्यामुळे कुणालचा अभ्यास घेणे हे पाचवीपर्यंत मला छान जमले. पण नंतर सारीच गाडी हाताबाहेर गेल्यासारखी व्हायला लागली.
लहान मुलगा जेवला नाही तर आईला जेवण जात नाही. हातात मोबाइल दिला म्हणून कुणाल जेवतो ही आठवण काढून घरातील सारे पुन्हा पुन्हा माझ्याच डोक्यावर खापर फोडतात. पण बाबा कामावरून सायंकाळी घरात आल्यानंतर त्यांचा मोबाइल घेऊन कुणाल गेम खेळत बसतो त्याची आठवण मात्र कोणाला येत नाही.
आजी आजोबांचा नातू अतिशय लाडका, तसेच त्यांचा मुलगाही त्यांचा लाडका. कुणालसह ही सारी चौकडी माझ्याकडेच कुणालचा छळवाद करत असल्यासारखी गेली दोन-तीन वर्षे पहात होती. कुणालचे यंदाचे आठवीचे मार्क हाती आले आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला. गणित व शास्त्रात शंभर पैकी ४० मार्क पाहून इंजिनीअर असलेल्या बाबांचा राग तर अनावर झाला होता. आपल्या इंजिनअर मुलाचे सगळेच उत्तम मार्क आठवून आजींना सुद्धा आठवणींचे कढ आवरेनात.
थंड चेहरा,कोरडे डोळे
पण मला सगळय़ात धक्का बसला तो म्हणजे कुणालच्या या साऱ्यांच्या रागावण्याकडे पाहण्याच्या, त्रयस्थपणे बघण्याच्या देहबोलीचा. हे सारे त्याला उद्देशून बोलत आहेत असे त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. कुठल्यातरी भलत्याच मुलाबद्दल आजी-आजोबा व बाबा बोलत आहेत व आई अस्वस्थ झाली आहे असा त्याचा चेहरा होता. अनावर रागाने बाबांनी त्याच्यावर हात उचलला तेव्हा आजीनेच त्यांना थांबवले. आजी म्हणाली,‘‘अरे कुणाल काही एखाद दुसरा शब्द तरी तोंडातनं काढशील का नाही? हे सारे जण तुझ्याबद्दल काय बोलत आहेत, त्यावर तुझं म्हणणं तरी काय?’’
कुणालने जे उत्तर दिलं ते ऐकून माझी झोप जवळपास कायमची उडाली. आजी आजोबा काळजीने काळवंडले. तर बाबा रागाने लालीलाल झाले होते.
कुणालचे चिमखडे बोल होते, ‘‘लहानपणापासून मी गेम्स खेळत आलो आहे. मी गेमर बनणार आहे. शास्त्र, गणित किंवा शाळेचे मार्क याचा त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. हे एवढे पण तुम्हाला माहिती नाहीत काय? यासाठीच दर पंधरा दिवसांनी बाजारात आलेला नवीन गेम पाहिजे म्हणून मी तुमच्याशी भांडत असतो. तो तर तुम्ही देत नाही. बाबा तुमच्या दुप्पट पैसे मी गेमर म्हणून कमवून दाखवीन.’’
त्या दिवशी रात्री कुणाल सोडला तर कोणाला जेवण गेले नाही. पण कुणालने मात्र मस्तपैकी जेवून ढेकर दिला. वैयक्तिक खासगी शिकवणी लावून कुणालची अभ्यासाची ढकलगाडी त्यानंतर सुरू झाली. शाळा आणि शिकवणीची वेळ सोडली तर गेममध्येच त्याचे सारे लक्ष एकवटलेले असे. माझा मोबाइल मी दिला नाही म्हणून दोनदा त्याने आपटून फोडून टाकला. शेवटी त्याच्या हट्टा खातर एक साधासा स्मार्टफोन त्याला देणे भाग पडले.
शाळेत माझी शिक्षिकेची नोकरी. शेजारी पाजारी व शाळेतील सारीच मंडळी कुणालची शैक्षणिक वाटचाल जाणून घेण्यात उत्सुक. शिक्षिकेचा मुलगा हुशारच असणार हे गृहीतक त्यांच्या डोक्यातून जाणे कठीणच. जेव्हा कुणाल साठ टक्के मार्क मिळवून दहावी पास झाला व त्याने कॉमर्सला प्रवेश घेतला तेव्हा मी जरा सुस्कारा टाकला होता. पण तो तात्पुरताच निघाला. अकरावीला जेव्हा तो नापास झाला तेव्हापासून घरातील सगळय़ांशी त्याने बोलणे बंद केल्यात जमा होते. कधी आजीकडे तर कधी आजोबांकडे हातखर्चाचे पैसे तो मागत असे. बाबांनी त्या विषयावर त्याच्याशी वाद नको म्हणून त्याच्या नवीन काढून दिलेल्या बँकेच्या खात्यात दरमहा तीन हजार रुपये टाकायला सुरुवात केली.
तुझे मित्र कोण? तू कोणाशी गप्पा मारतोस? दिवसभर करतोस काय? यावर काही विचारणे म्हणजे फक्त भांडणाला आमंत्रण अशी नंतरची चार वर्षे गेली. अधे मध्ये कधीतरी तो अभ्यास करताना दिसायचा. कसल्या तरी परीक्षा देतोय इतकेच समजायचे.
अचानकपणे एका दिवशी त्याने आम्हा सगळय़ांना धक्काच दिला. एका कंपनीने दिलेले ऑफर लेटर आमचे समोर त्याने ठेवले. ‘येत्या आठवडय़ापासून मी एका गेमिंग कंपनीत उमेदवारी करता निवडला गेलो आहे.’ हे ऐकून त्याचे शब्दांवर आमचा विश्वास बसत नव्हता पण समोर तर पत्रच होते. तब्बल सहा वर्षांनी मी माझ्या लेकराला पोटाशी धरले आणि आनंदाश्रुंनी त्याला अक्षरश: भिजवले.
बदललेल्या नजरा वेगळय़ा वाटेवर चालणाऱ्या कुणालचे आता कौतुक करताना त्याचे मित्र किंवा आमचे शेजारी अजिबात कमी पडत नाहीत. आडुन पगार विचारत नाहीत हे नशीबच..