स्पर्धा परीक्षा देण्याकडे आज लाखो तरुण-तरुणींचा कल दिसतो. मात्र, यासाठी नक्की किती आणि कसा अभ्यास केला पाहिजे, त्या वेळचा ताण कसा हाताळायचा किंवा तंदुरुस्ती कशी राखायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला पडताळून कसे पाहायचे. याविषयी सांगत आहेत, सध्या सेवेत असलेले आयएएस आणि आयपीएस अधिकारी.. दर पंधरा दिवसांनी.
आई-वडील आपल्या मुलांना खूप कष्टाने शिकवत असतात त्यामुळे एका स्वप्नाच्या मागे किती र्वष पळायचं, तेही अशा स्वप्नाच्या मागे की ज्याच्या पूर्ततेची खात्री नाहीच. त्यामुळे लवकरात लवकर जागं होणं गरजेचं आहे. या क्षेत्रात भवितव्य अनुभवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र तो किती घ्यायचा, किती वेळ घ्यायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे.
मी कधी ठरवलं नव्हतं की मला आयपीएस व्हायचंय किंवा आयएएस व्हायचं. मी लहान असताना वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हवाई दलातील वीरमरण प्राप्त झालेले निर्मलजित सिंग हे माझे आदर्श होते. अगदी दहावीपर्यंत माझं तेच स्वप्न होतं आणि पायलट व्हायचंच निश्चित केलं होतं. मात्र, अकरावीत असताना मला चष्मा लागला आणि माझं पायलट होण्याचं स्वप्न भंगलं.
बारावीनंतर जैव तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम करण्याचा मी निर्णय घेतला. तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी पुण्यात एलएल.बी. करण्याचा निर्णय घेतला. एलएल.बी.ला असताना महाविद्यालयामधल्या मित्र-मैत्रिणींकडून मला स्पर्धा परीक्षेबद्दल समजलं. अकरावीनंतर पायलट होण्याचं स्वप्न भंगल्यानंतर पाच-सहा वर्षे मला करिअर करण्यासाठी ठोसपणे काही सापडत नव्हतं, ते मला स्पर्धा परीक्षांतून गवसलं.
या सगळय़ात माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुम्ही कुठल्याही पदावर जा, तुम्ही ‘डिसिजन मेकिंग’मध्ये सहभागी असणार आहात. आपल्याला मिळणारं पद आपली निर्णयक्षमता वाढवून आपल्याला अधिक निर्णयक्षम बनवणार आहे. हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. परीक्षांचे सोपस्कार पार पडल्यानंतर माझ्या रँकप्रमाणे मला आयपीएस मिळाले. या सगळय़ात माझ्यासाठी सुखद गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा युनिफॉर्म परिधान केला तेव्हापासून ते आजपर्यंत मला जाणवतं की मी अगदी योग्य ठिकाणी आले आहे.
अभ्यासक्रम पहिला गुरू
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. कारण तुमचा पहिला आणि खरा गुरू कोण असेल तर तो तुमचा अभ्यासक्रम असतो. अनेक वेळा मुलांना हेच कळत नाही की काय वाचायचंय आणि काय नाही वाचायचंय. स्पर्धा परीक्षा आणि एखाद्या विषयामधील तज्ज्ञ होण्यासाठीचा अभ्यास यातील फरक स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थीना समजला पाहिजे. अनेकदा मुलं काय करतात एखादा विषय घेऊन त्याचाच खूप सखोलपणे अभ्यास करत बसतात त्याचा परिणाम असा होतो की उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे वेळच शिल्लक राहत नाही. कारण ही परीक्षा तीन टप्प्यांत होते. प्रत्येक टप्प्याच्या निकालानंतर तुम्हाला पुढच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळतो. त्या कमी कालावधीत तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर तुम्ही एकाच टॉपिकला सर्वाधिक महत्त्व देणं योग्य ठरत नाही. तसेच दहा मुद्दे अभ्यासले आणि हे उर्वरित पाच मुद्दे ऑप्शनला टाकले असंही चालत नाही. त्यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम हा शंभर टक्के पूर्ण करता आलाच पाहिजे. म्हणूनच अभ्यासक्रमाचं सखोल ज्ञान हवं.
नियोजन अत्यावश्यकच
कोणत्याही परीक्षेचा शंभर टक्के अभ्यासक्रम तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही योग्य नियोजन कराल. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे कितीही केलं तरी शंभर टक्के अभ्यास पूर्ण शक्य नाही. तर मी त्यांना सांगू इच्छिते की जरी तुम्हाला शंभर टक्के नाही तरी ८० ते ८५ टक्के अभ्यास पूर्ण करता आला तरीही चालेल, मात्र तो बिना नियोजनाचा करू नका. अनेक विद्यार्थी मला विचारतात की, ‘तुम्ही किती काळ अभ्यास केला?’ अभ्यास करण्यासाठी प्रत्येकाचे तास वेगवेगळे असू शकतात. एकपाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि तीन-चार वेळा वाचायला लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तास एकसारखे असू शकत नाही. म्हणून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्याचे आकलन करून त्याला योग्य पद्धतीने समजावून घेण्यासाठी किती वेळ लागतो हे प्रत्येकाला स्वत:चं स्वत: ठरवता आलं पाहिजे. त्याप्रमाणे किती वेळा रिव्हिजन झाली पाहिजे हेही लक्षात घ्या. त्याप्रमाणे तुम्ही नियोजन केलं पाहिजे आणि त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
संवाद तोडू नका, छंद जोपासा
प्रत्येकाला येणाऱ्या ताणतणावाला वेगवेगळी परिस्थिती कारणीभूत असते. सुदैवाने माझ्या आई-वडिलांनी कधीच माझ्यावरती कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकला नाही. त्याचा सकारात्मक परिणाम माझ्या अभ्यासावर झाला. माझं कुटुंब हे माझी एनर्जी बूस्टर होते. कुटुंबाचा पाठिंबा हे तुम्हाला तणावमुक्त राहायला मदत करते. त्यामुळे या काळातच नव्हे, तर कायम तुमचा तुमच्या कुटुंबाशी संवाद असणं गरजेचं आहे. तुमच्या मित्र-मैत्रिणींशी संवाद असणं हे फार गरजेचे आहे. ही तुमची सपोर्ट सिस्टीम आहे ती तुम्ही तोडता कामा नये.
मला कंटाळा आला की, मी गाणी ऐकायचे. कविता वाचन करायचे. त्याची आवड असल्याने आवड आणि अभ्यास यात समवाक्यता झाली. कंटाळा आला, ताण आला की आवडत्या विषयाचा अभ्यास करायचे. जुनी गाणी ऐकणं हे माझं मेडिटेशनच होतं. तुम्ही या परीक्षा काळातही तुमचे छंद जोपासले पाहिजेत. ते तुम्हाला नवीन उमेद देतात.
स्पर्धा परीक्षा ही काही जणांना सहा संधी देते, काही जणांना आठ संधी देते, काही जणांना दहा. तुम्ही स्वत: अभ्यास करून ठरवायला पाहिजे की, परीक्षा देण्यासाठी मी किती वर्षे देईन. सर्वोत्तम अभ्यास करून जर माझी निवड होऊ शकत नसेल. तर पुन्हा परीक्षा देण्याची काय आवश्यकता आहे? कुठे थांबायचे हे लक्षात घ्यायला हवे. प्लॅन बीकडे कधी वळायचं याचा योग्य निर्णय घेता आला पाहिजे.सांगताहेत मुंबई पोलीस उपायुक्त (मुख्यालय २) तेजस्वी सातपुते.
त्रुटी, कमतरता ओळखा
मला नोट्स काढायला खूप वेळ लागायचा, त्यामुळे मी मार्जिनमध्ये लिहीत असे. पण त्याचा मला तोटाही झाला. माझा लिखाणाचा वेग कमी होता. तो लिखाणाचा वेग जास्तीत जास्त लिहूनच वाढणार होता. मात्र, मी तसं न केल्यामुळे मुख्य परीक्षेत मला येत असूनही पेपर पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आपले विकनेस ओळखणे आणि त्या विकनेसवरती काम करून त्यांना आपले सामथ्र्य बनवण्याचे प्रयत्न करणे हे माझ्या चुकांमधून दिसून आलेली गोष्ट.
नोट्स (टिपणे) काढा
नोट्स काढणे ही तिसरी महत्त्वाची गोष्ट. नोट्स तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बनवू शकता. मला कमी लिहायला आवडतं. त्यामुळे समासामध्ये (मार्जिनमध्ये) लिहायचे. पहिल्या वाचनाच्यावेळी मी काही महत्त्वाच्या गोष्टींना अधोरेखित करायचे. दुसऱ्या वाचनामध्ये मला ज्या गोष्टी आठवत नाहीत त्यांचे की-वर्डस मी वरच्या समासात लिहून ठेवायचे. तिसऱ्या वाचनाच्या वेळी मला पूर्ण पान वाचण्याची गरज पडायची नाही. मी ते की-वर्डस वाचायचे आणि जर त्याच्या नंतरही मला आठवलं नाही तर मी ते पूर्ण पान वाचायचे. याप्रमाणे मी माझा वेळ वाचवत असे.
कामात बदल हीच विश्रांती
महात्मा गांधीजी म्हणायचे, ‘कामात बदल हीच विश्रांती.’ शारीरिक तंदुरुस्तीसाठी मी वेगळा असा व्यायाम परीक्षेच्या काळात केला नाही. पण मी आणि माझी मैत्रीण सकाळी नियमित चालायला जायचो. त्या वेळात आम्ही कवितांचे पाठांतर, वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा करायचो. कधी निबंधांच्या विषयांवर मत मांडायचो. हे चालणे आम्हाला प्रसन्न करायचे. त्यामुळे ज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांनी आपल्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश आवर्जून करावा, ज्यांना फारशी आवड नाही त्यांनीही रुचेल, झेपेल, आनंद वाटेल असा व्यायाम जरुर करावा.
शब्दांकन : रेश्मा भुजबळ