श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर या चारीचे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा ‘आरसा’ वाचकांसमोर येईल, दर आठवडय़ाला. मग अर्थातच निर्णय वाचकांचा..
करिअरचा निर्णय एकाच्या हातात असतो का कधी? मुलांना स्वप्न पडतात. मात्र स्वप्नातून जागं करण्याचं काम आई आणि बाबांचं असतं. तिथे तरी त्या दोघात एकमत कुठे असतं? बहुतेक घरात ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ असलं तरी सुद्धा आईचा छुपा पाठिंबा मुलांना असू शकतो. काही वेळा नवऱ्याच्या करिअरबद्दल आणि वाटचालींबद्दल आईच्याही काही ठाम समजुती असू शकतात आणि याशिवाय समजा या तिघांनी एकमताने काहीतरी करायचे ठरवले तरी त्याकडे समाज कसे बघतो? कारण समाजाच्या दृष्टिकोनातून यशाचे निकष पूर्ण वेगळेच असतात. खरंतर मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर या चारीचे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा ‘आरसा’ वाचकांसमोर येईल, दर आठवडय़ाला. मग अर्थातच निर्णय वाचकांचा..बालपणी कुणालने जेवायला सुरुवात केली तीच मुळी एक एक घास घेताना गेम खेळत. हातातला मोबाइल न सोडता आईचे भरवणे आणि याने गेम खेळणे असा साग्रसंगीत कार्यक्रम रोज २० मिनिटेतरी दोनदा चालत असे. नंतर जसजसे कळायला लागले तसतसे दर महिन्याला कुणालला बाजारात नवीन आलेला एक गेम विकत आणून देण्याचे महतकार्य कुणालचे बाबा किंवा आजोबा करत असत. एखादा गेम खेळत असताना जिंकणे म्हणजेच अभ्यास असतो, अशी कुणालची ठाम समजूत पहिलीत जाण्यापूर्वीच झाली होती. घरातील मोठय़ा स्मार्ट टीव्हीवर गेम खेळत असल्यामुळे प्राथमिक शाळेच्या संदर्भात तेवढा वेळ तरी अभ्यासाकडे लक्ष दिले जाई.
हायस्कूलमधली घसरण
जेव्हा गेम खेळणे मोबाइलवर सुरू झाले मग तो आईचा असो, बाबाचा असो किंवा आजीचा तेव्हापासून मात्र सारे तंत्र बिघडत गेले.‘‘अरे तू अभ्यास कर, मार्क मिळव, चांगले शिक, चांगले कमव’’, या प्रत्येकाला कुणालचे ठाम उत्तर सुरू झाले, ‘‘मी गेमर बनणार व त्यातच करिअर करणार.’’ आई ,बाबा आणि शिक्षक, क्लास यांच्या मदतीने कुणाल जेमतेम ६० टक्के मिळवून दहावी झाला. कुणालला कधी कोणी मार्कावरून बोलले तर त्याचे थेट उत्तर असे, ‘‘गेम खेळण्याकरिता मार्क लागत नसतात तिथे लागते ते स्किल. ते माझ्याकडे भरपूर आहे.’’ पहिली ते दहावीच्या प्रवासाबद्दल बोलण्याऐवजी नवनवीन गेम कोणकोणते बाजारात आले आहेत आणि ते मला आता बाबा का आणून देत नाहीत यावरून घरात वादावादी चालत असे. नेटवरून ऑनलाइन गेम शोधणे हाही त्याचा एक आवडता उद्योग बनला होता. अकरावी कॉमर्सला एक विषय राहिला तेव्हा कुणालने डिक्लेअर केले की गेिमग करता पदवीची गरज नसते. मात्र याच वेळेला कुणालला एका गेिमग कंपनीत काम करणारा कर्मचारी भेटला.
कंपनीत काय काय काम चालते याची सखोल माहिती त्याच्याकडून कुणालने मिळवली आणि त्याच्या लक्षात आले की गेम खेळून आपले पोट भरणार नाही. तर त्यासाठी काहीतरी वेगळेच शिकावे लागते. करावे लागते आणि त्यातील कौशल्ये मिळवावी लागतात. तो एक साक्षात्कारी दिवसच होता कुणालसाठी!
त्या दिवसापासून त्याने आपण होऊन रोज दोन तास अभ्यास करून एक्स्टर्नल बीकॉमची पदवी मिळवली. त्या दरम्यान गेम टेस्टिंग नावाचा प्रकार काय असतो त्याचा रीतसर अभ्यास त्याने केला. त्यात कुणाल वेगाने शिकत गेला. कोणत्या वयोगटासाठी कोणते गेम्स वापरले जातात व त्याची विक्री यंत्रणा कशी असते यावरही त्याचं माहिती घेणे व वाचन चालू होते. मात्र, या साऱ्याचा घरच्यांना सुगावा कधीच लागू दिला नाही. कुणाल हा एक वाया गेलेला मुलगा आहे असे आसपासच्या सगळय़ांचे ठाम मत बनले होते. मात्र कुणाल एकेका वर्षी बी.कॉमचे पेपर देत गेला होता.
बी.कॉम.चा निकाल लागण्याच्या आधीच कुणालची गेम टेस्टर म्हणून एका प्रसिद्ध कंपनीमध्ये निवड झाली. कुणालच्या मित्रांना अशी एखादी कंपनी भारतात काम करते याची काहीही माहिती सुद्धा नव्हती.
अकरावी नापासचा दणका बसल्यावर योग्य माहिती मिळवून कुणाल जागा झाला व जिद्दीने त्याने निवडलेला आगळा वेगळा रस्ता कुठे कसा जातो याची योग्य माहिती काढली. केवळ स्वप्न रंजनात तो रमला नाही.
कुणालची उमेदवारी संपली. रीतसर योग्य पॅकेजवर तो कंपनीत रुजू झाला. पण त्याने सातत्याने आपली कंपनी काय करते यावर चौकसपणे नजर ठेवून माहिती घेणे चालू ठेवले. नोकरीची तीन वर्षे संपत असताना ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंगमधे त्याने शिक्षण संपवले. कंटाळवाण्या टेस्टिंगच्या कामातून त्याने स्वत:ची सुटका करून घेतली. सध्या कुणाल सिंगापूर येथे मार्केटिंगच्या कामांमध्ये नवीन कंपनीत रुजू झाला आहे. बरोबरच्या मित्रांना तो आता फक्त इंस्टाग्राम वरच दिसतो आणि भेटतो. (क्रमश:)