Maharashtra 12th Board Exam Preparation Tips: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा राज्यात उद्यापासून म्हणजेच ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. काही विद्यार्थ्यांना टेन्शनही आलं आहे. मात्र यामुळे अनेकदा विद्यार्थी करू नये ती चूक करून बसतात. परीक्षेच्या भीतीमुळे महत्वाच्या वस्तू घरी विसरतात. तर सेंटरला गेल्यानंतरही काही सूचनांचं पालन करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स आणि सूचना देणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.
परीक्षेच्या काळात सेंटरला जाताना आणि गेल्यानंतर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
परीक्षेला वेळेत जा परीक्षेच्या किमान २ तास आधी अभ्यास बाजूला ठेऊन २ मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा. स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा. त्यानंतर आपली सर्व कामं करून वेळेत परीक्षेला जा. किमान १ तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा. यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल.
हॉल तिकीट तपासून घ्या परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका. तसंच सोबत २-३ पेन . पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, स्केल आणि इतर महत्वाच्या सर्व गोष्टी आठवणीनं घ्या. यासाठी वस्तूंची यादी बनवून घ्या आणि ती भिंतीवर लावून ठेवा. यामुळे तुम्हाला सगळं घेतलं की नाही हे लक्षात राहील.
पोहोचण्यास उशीर झाला तर?
अनेकदा ट्रॅफिकमुळे किंवा इतर काही कारणांमुळे परीक्षेच्या सेंटरवर पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. मुद्दाम केलं नसेल तरी वेळ पाळली नाही म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका उशिरा मिळते. अशावेळी चिंता करू नका. वर्गातील शिक्षकांना तुमच्या उशिरा येण्याचं कारण नम्रपणे समजवून सांगा. तसंच त्यांना काही वेळ अधिक देण्याची मागणी करा. तुमचं कारण त्यांना पटलं तर महाल काही वेळ मिळू शकतो.
हॉल तिकीट हरवलं तर?
अशा वेळी घाबरू नका. लगेच तुमच्या सेंटरवरील अधिकारांना याबाबत माहिती द्या. तसंच त्यांना हॉल तिकिटशिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा. मात्र असं काहीच होऊ नये म्हणून तुमच्या हॉल तिकीटाची एक झेरॉक्स नेहमी आपल्या बॅगमध्ये ठेवा. जर तुमचं हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांना ही झेरोझ दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी मागा. हे सर्व करताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका.
पाण्याची बाटली जवळ बाळगा
उन्हळ्याच्या दिवसांत परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते. त्याचप्रमाणे अनेकदा भरपूर लांबून सेंटरला पोहोचल्यानंतर तुम्हाला तहान लागू शकते. अशावेळी तुमच्याजवळ स्वतःची पाण्याची बाटली नसल्यास तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसंच परीक्षेत तुमचं लक्ष लागू शकत नाही. म्हणूनच परीक्षेला जाताना नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली जरूर ठेवा
तुमच्या जागेवर कुठला कागद दिसला तर?
परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थी कागदांचे तुकडे खिशात लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा हे विद्यार्थी उत्तर लिहून झाल्यावर कागद वर्गात फेकून देतात. असा कुठला कागद तुमच्या जागेजवळ असला तर त्याला हात लावण्याआधी वर्गातील शिक्षकांना सांगा. असं केल्यामुळे कुठलाही चुकीचा आरोप तुमच्यावर होणार नाही. तुम्ही शांतपणे आपला पेपर देऊ शकाल.
परीक्षाकाळातील व्यवस्थापन
रात्रीचं जागरण टाळावं. अकारण साहसी प्रयोग करू नयेत. (झाडावर चढणं, अवजड वस्तू उचलणं). सुरी, कात्री वगरे धारदार वस्तूंचा जपून वापर करावा. परीक्षेच्या ठिकाणी जाताना सायकल वा अन्य वाहन जपून चालवावं.
परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यावर तसंच पेपर लिहिताना कोणाशीही बोलू नये. घशाला कोरड पडत असल्यास लिमलेटच्या गोळ्या जवळ ठेवाव्यात. उत्तरपत्रिकेवर बारकोड स्टिकर व हॉलोक्राफ्ट स्टिकर योग्य ठिकाणी चिकटवावं. उत्तरपत्रिकेवर योग्य ठिकाणी स्वतःची सही करावी. उत्तरपत्रिकेवर कुठेही स्वतचं नाव, पत्ता, फोन नंबर, जात, धर्म इत्यादी गोष्टी लिहू नका.
प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्याआधी समास आखून घ्या. अक्षर शक्य तितकं नेटकं व स्वच्छ काढा. एखादं उत्तर बदलायचं असल्यास जुन्या उत्तरावर काट मारून नवीन उत्तर लिहा. परीक्षेच्या काळाचंही व्यवस्थित नियोजन करा.
आधी सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा. जो प्रश्न सोपा वाटत असेल, तो आधी सोडवा. पहिल्या अर्ध्या ते एक तासामध्ये गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरं लिहा. यासारखे पैकीच्या पैकी गुण मिळवणारे प्रश्न सोडवा. त्यानंतर थोडक्यात उत्तरं द्या. नंतर निबंधासारख्या दीर्घोत्तरी प्रश्नांकडे जा. थोडा विचार करून लिहिण्याची उत्तरं शक्यतो नंतर लिहावीत.