Rajni bector Success Story : तुम्ही आजवर सावित्री जिंदाल, किरण मुझुमदार शॉ, फाल्गुनी नायर, इंदिरा नूयी, सुधा मूर्ती, विनिता सिंग, नमिता थापर यांसारख्या यशस्वी महिलांबद्दल अनेकदा वाचले आणि ऐकले असेल. या सर्व महिलांनी भारतीय व्यावसायिक जगतात उंच भरारी घेतली आहे. पण, याच महिलांप्रमाणे भारतात इतर अनेक महिला आहेत ज्यांनी उद्योग क्षेत्रात आपले नाव कमावले आहे, खडतर परिस्थितीचा सामना करत या महिलांनी व्यावसायिक जगतात पाऊल ठेवले. मोठे उद्योग स्थानप केले आणि ते यशस्वीरित्या चालवले. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जिने अवघ्या २०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तिच्या कंपनीची मार्केट कॅप ८००० कोटींहून अधिक आहे. या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव आहे रजनी बेक्टर.
रजनी बेक्टर या श्रीमती बेक्टर फूड स्पेशालिटी लिमिटेडच्या संस्थापक आणि मानद अध्यक्ष आहेत. व्यावसायिक जगतात त्यांचे स्थान इतके उंच आहे की, त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तुम्ही क्रेमिका बिस्किटे आणि इंग्लिश ओव्हन ब्रेड हे नाव ऐकले असेल किंवा खाल्लेही असेल. पण, मिसेस बेक्टर हे नाव काय आहे किंवा ते कोणाचे आहे, याबद्दल अनेकांना माहीतदेखील नसेल.
देशाच्या फाळणीनंतर एका झाडाखाली घालवले सात दिवस
रजनी बेक्टरचा जन्म १९४० मध्ये कराची (आता पाकिस्तानमध्ये) झाला होता. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. देशाची फाळणी झाल्यावर त्यांचे कुटुंब भारतात येऊन दिल्लीत स्थायिक झाले. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत रजनी बेक्टर यांनी फाळणीच्या वेळीने त्यांनी अनुभवलेल्या वेदनादायी अनुभव सांगितले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, “फाळणीनंतर आम्हाला सांगण्यात आले होते की, पठाणकोटमध्ये ट्रेन उपलब्ध होईल, पण सात दिवस तेथे कोणीही आले नाही. आठवडाभर एका झाडाखाली थांबावे लागले. त्यानंतर एक मालगाडी आली, यावेळी मी खूप मृतदेह पाहिल्याचे आठवते. पंजाबच्या इतर भागांतून जात असताना अनेकांनी आम्हाला खायला आणि प्यायला लस्सी देऊन मदत केली. मी खूप लहान होते, त्यावेळी मी माझ्या आईला विचारले – ते आपल्या सर्वांना हे सर्व का देत आहेत? ते आपल्याला ओळखतात का?”
More Success Stories Read Here : मित्रांच्या सोबतीने बदललं आयुष्य! बालपणी शाळेची फी भरायलाही नव्हता पैसा, आज ५५ हजार कोटींचे मालक; कोण आहेत जयंती कनानी?
१९५७ चा तो काळ, जेव्हा रजनी केवळ १७ वर्षांच्या होत्या, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झाले नव्हते, तेव्हाच त्यांचे लग्न पंजाबमधील एक व्यापारी धरमवीर बेक्टरशी लावून देण्यात आले, लग्नानंतर त्या लुधियानाला स्थायिक झाल्या. यावर त्या सांगतात की, “तेव्हा लुधियाना खूप लहान शहर होते. दिल्लीच्या तुलनेत ते खूपच मागासलेले होते. संपूर्ण शहरात फक्त चार कार होत्या. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांना खूप विचित्र वाटायचे.
लग्नानंतर सुरू केली एक छोटी क्रीम मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी (Success Story Of Millionaire Rajni Bector)
लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली. मुलांचे संगोपन करताना त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठातून (PAU) बँकिंगचे शिक्षण घेतले. त्यांना बँकिंग क्षेत्राची पूर्वीपासूनच आवड होती. एका छोट्याश्या शहरातील बँकिंगमध्ये इतकी हुशार महिला कामाला असणे ही त्यावेळी एक मोठी गोष्ट होती. हिरो मोटोकॉर्पचे ब्रिजमोहन मुंजाल यांसारख्या बड्या लोकांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. यावेळी रजनी बेक्टर यांना काहीतरी वेगळे काम करायचे होते.
खूप विचारमंथन केल्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी २०,००० रुपये गुंतवले आणि एक लहान क्रीम उत्पादन युनिट सुरू केले. त्यांनी क्रिमिका नावाच्या कंपनीची स्थापना केली. क्रिमिका हे नाव क्रीम का वरून घेतले होते. त्यांनी बनवलेले पदार्थ झपाट्याने प्रसिद्ध होऊ लागले. तेव्हाची प्रसिद्ध क्रीम कंपनी क्वॉलिटी यामुळे कुठे तरी मागे पडत होती. १९८५ मध्ये त्यांनी पंजाबमध्येच ब्रेड मॅन्यूफॅक्चरिंग युनिट स्थापन केले आणि ब्रेड बनवण्यास सुरुवात केली, ज्याला आज आपण बन (bun) म्हणून ओळखतो. पंजाबमध्ये त्याला डबलरोटी म्हणतात. सुरुवातीला हे युनिट रोज ५००० ब्रेड बनवत होते. पण, १९८९ मध्ये ब्रेड बनवण्याची हीच संख्या ५०,००० पर्यंत वाढवण्यात आली. सहाजिकच मागणीही १० पटीने वाढली होती.
२०२० मध्ये आला कंपनीचा आयपीओ
१९८५ मध्ये कंपनी कायदा १९५६ अंतर्गत क्रेमिका कंपनीची खाजगी लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालेला प्रवास थांबला नसून आजतागायत सुरू आहे. १९९६ मध्ये रजनी बेक्टर यांच्या कंपनीने मॅकडोनाल्डला बर्गर बन पुरवठा करण्यास सुरुवात केली, यामुळे त्यांचा व्यवसाय एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचला. २००१ मध्ये नोएडा, उत्तर प्रदेश येथे त्यांच्या कंपनीचे एक उत्पादन युनिट स्थापन करण्यात आले, ज्याने उत्पादन वाढवले. यानंतर २००७ मध्ये नोएडा प्लांटचा विस्तार करून उत्पादन क्षमता आणखी वाढवण्यात आली. २०१० ला रजनी बेक्टरच्या कंपनीने मॅकडोनाल्डला ओरिओसचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या उत्पादन लाइनमध्ये आणखी एक लोकप्रिय उत्पादन जोडले. शेवटी २०२० मध्ये कंपनीचा IPO आला, ज्याने त्यांच्या व्यवसायाला एक नवी दिशा मिळाली.
आज कंपनीचे मार्केट कॅप ८३३९.७३ कोटी रुपये
आज त्यांची कंपनी भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप ८३३९.७३ कोटी रुपये इतके आहे. Phenology वर, कंपनीला ५ पैकी ४ स्टार दिले गेले आहेत, जे खूप चांगले मानले जाते. २०२० मध्ये कंपनीने ७६२.१२ कोटी रुपयांची विक्री केली. २०२१ मध्ये ८८०.७३ कोटी रुपये, २०२२ मध्ये ९८८.१७ कोटी रुपये आणि २०२३ मध्ये १४०० कोटी रुपयांच्या विक्रीचा विक्रम केला. ११ जुलै २०२४ रोजी मिसेस बेक्टरचे शेअर्स बीएसईवर १४१४.५५ रुपयांवर बंद झाले, तर एनएसईवर ते १४१५.३५ रुपयांवर बंद झाले.