Success Story: अलीकडच्या काळात अनेक तरुण मंडळी नोकरी न करता स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करत आहेत. व्यवसायाच्या माध्यमातून चांगला नफा मिळवत आहेत. त्यामुळे सगळीकडे अगदी खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते अगदी मोठ्यामोठ्या कंपन्या सुरू करण्यात सर्वच क्षेत्रांत मोठी स्पर्धा सुरू आहे. तर काही जण कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरू करायचा या प्रश्नावर अडकून आहेत. तर आज आपण एक उद्योजक आणि इनोव्हेटर म्हणजे एक नवा उपक्रम प्रस्थापित करणाऱ्या रंजित वासिरेड्डी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी चार लाखांच्या भांडवलासह त्यांच्या कंपनीचा पाया रचला.
रंजित वासिरेड्डी यांनी रिअल इस्टेट उद्योगात तंत्रज्ञानाच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. रंजित वासिरेड्डी तेलंगणा राज्यातील खम्मम गावातील रहिवासी आहेत. सुरुवातीच्या आयुष्यात आर्थिक आव्हाने आणि मर्यादित संधींचा सामना करत असतानाही रंजित यांनी उद्योगासाठी अभ्यास करण्याची हिंमत दाखवली.
अगदी छोट्याश्या सुरुवातीपासून ते स्टार्टअप उभारण्यात त्यांचा प्रवास अगदीच उल्लेखनीय आहे. ग्रॅज्युएशननंतर करिअरचा मार्ग शोधणाऱ्या लोकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती. या दृढनिश्चयाने त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या निर्णय घेतला. पण, त्यांचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला होता.
रंजित यांना त्यांचा स्टार्टअप ‘इस्टेट देखो डॉट कॉम’ estatedekho.com लाँच करण्यासाठी निधी मिळवण्यात अडचण येत होती. कर्जाच्या मंजुरीसाठी बँकेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते तात्पुरते एका कंपनीत सामील झाले. आवश्यक कागदपत्रे हातात आल्यानंतर त्यांनी यशस्वीरित्या कर्ज मिळवले आणि चार लाखांच्या प्रारंभिक भांडवलासह त्यांच्या कंपनीचा पाया रचला.
कंपनीच्या स्थापनेनंतर estatedekho.com आतापर्यंत त्यांची वार्षिक कमाई जवळजवळ पाच कोटी आहे. सुरुवातीला कंपनीत फक्त चार कर्मचाऱ्यांचा ग्रुप होता, जो हळूहळू आता ७० हून अधिक कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तारला आहे. तसेच ही संस्था भारतातील अनेक शाखांमधून कार्यरत आहे. ही कंपनी विनामूल्य सल्लामसलत पोर्टल म्हणून काम करते. रिअल इस्टेट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करते. विनामूल्य सल्ला देण्याव्यतिरिक्त, estatedekho.com बिल्डर्स आणि चॅनेल भागीदारांसाठी एक एकत्रित मॉडेल म्हणून कार्य करतात, त्यांच्या “राइट पार्टी कॉन्टॅक्ट लीड्स” सेवेद्वारे लीड तयार करतात. तसेच प्लॅटफॉर्मचे सीआरएम टूल स्टेकहोल्डर्ससाठी लीड मॅनेजमेंट वाढवते.
रिअल इस्टेट तंत्रज्ञान क्षेत्रातील एक लीडर म्हणून रंजित वासिरेड्डी यांचे स्थान खूप खास आहे. रंजित वासिरेड्डी यांच्या छोट्याश्या प्रयत्नापासून ते उद्योजकीय यशापर्यंतचा त्यांचा हा प्रवास चिकाटी आणि स्वप्नांसाठी अथक प्रयत्न यांचा पुरावा आहे. त्यांची कहाणी सर्वच इच्छुक उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरते; जे जिद्दीने त्यांचा व्यायवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत.