Yati Gaur and Butter’s journey :आपल्यातील अनेकांना प्रवास करायला भरपूर आवडते. म्हणून वर्षातून एकदा का होईना आपण मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जातोच. काही जण ट्रेन, बाईक, तर बसने किंवा स्वतःच्या चारचाकी गाड्या घेऊनसुद्धा फिरायला जातात. पण, आज आपण अशा एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यानं पायी चालून देशभरात १३ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पूर्ण केला आहे.
२८ वर्षीय यती गौर नोएडाचा रहिवासी आहे. तसेच तो सिनेसृष्टीतील माजी विद्यार्थी आहे. विविध देश, तेथील लोकवस्तीबद्दल जाणून घेण्यासाठी तो दोन वर्षांपासून त्याची मैत्रीण बटर (श्वान)बरोबर भारतभर फिरत आहे. चारधाम यात्रेतील चारही धाम आणि भारतातील १२ ज्योतिर्लिंगांना पादाक्रांत करणं हे ‘भारतातील सर्वांत लांब वाटचाल’ (‘longest walk of India) म्हणून नावाजलेल्या त्यांच्या प्रवासाचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत त्यांनी १३ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पायी चालत पूर्ण केला आहे.
भारतभर का फिरायचे?
प्रत्येकाकडे एक विशेष कौशल्य असते आणि ते कौशल्य अधिकाधिक विकसित करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्या दृष्टीनं तो आयुष्यात एक उद्देश किंवा महत्त्वाकांक्षा ठेवून मार्गक्रमण करीत असतो. यती गौरव या तरुणाकडे चालण्याचं विशेष कौशल्य आहे. यती गौरव लहानपणी स्वतःच्या पालकांशी वाद घालून खूप दूरवर चालायला जायचा. कारण- त्याला एकांतात राहणं आवडायचं. २०२० मध्ये महामारीच्या काळात यतीनं अधिक गंभीर आव्हानं स्वीकारली- तो दिल्ली ते केदारनाथ चालत गेला. नंतर दिल्ली ते केदारनाथ, तुंगनाथ, बद्रीनाथ या ठिकाणापर्यंत पायी चालत जाण्यात त्याला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला.
पण, ही तर फक्त सुरुवात होती. कारण- पुढील दोन वर्षांत यती वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरला. राजस्थान, जयपूर, पुष्कर, उदयपूर, बारमेर व चित्तोडगड ही शहरं पालथी घालत त्यानं ८०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तसेच हा प्रवास करता करताना त्याला आई गमावलेली बटर (श्वान) सापडली आणि तिला त्यानं घरी आणलं.
या प्रवासात ‘बटर’ कशी सामील झाली?
यती गौर वर्षानुवर्ष एकटाच पायी प्रवास (Journey) करीत होता. पायी चालण्यामुळे यती गौरला देशभरातील लोकांशी संवाद साधता आला आणि इतर कोणत्याही प्रकारच्या प्रवासानं यती गौरला भारताची ही बाजू एक्सप्लोर करता आली नसती असे त्याचे म्हणणे आहे. जेव्हापासून बटर व गौरची भेट झाली तेव्हापासून प्रवासाला जाताना बटरला एकटीला घरी सोडून जाणं त्याच्यासाठी कठीण होत गेलं. तेव्हा यती गौरच्या आईनं त्याला सांगितलं, “तिला तुझी खूप आठवण येते; तिला तुझ्याबरोबर घेऊन जा.'” मग या प्रवासात बटर यतीची साथीदार बनली. पण, यतीनं तिला स्वतःबरोबर घेऊन जाण्यापूर्वी प्रशिक्षण दिलं. तिला लांब पल्ल्याच्या चालण्याची सवय लागावी यासाठी त्यानं उत्तराखंडमधील आव्हानात्मक ट्रेकची मालिका सुरू केली.
यती आणि बटलर यांच्या या पायी प्रवासात ( Journey) आरामासाठी त्यांना मंदिरांमध्ये आश्रय मिळे; तर स्थानिक लोक खायला अन्नसुद्धा देत. या प्रवासात कालांतरानं त्याचं बटरबरोबरचं नातं अधिकच घट्ट होत गेलं. यतीच्या ३५ किलोग्रॅमच्या बॅकपॅकमधील बहुतेक जागा बटरच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींनी अडवली होती. त्यांच्या एका सहलीत बटर जखमी झाल्यानंतर प्राण्यांना प्राथमिक उपचार कसा द्यावा हे यतीनं शिकून घेतलं. त्यामुळे आता यती प्राण्यांची नियमित रक्त तपासणी, लसीकरणाद्वारे बटरच्या आरोग्याचं बारकाईनं निरीक्षण करू शकतो, असं त्यानं स्पष्ट केलं आहे.
अशा कठोर निर्णयात व कठीण प्रवासात आर्थिक नियोजन, भावनिक पाठबळाची खूप जास्त गरज असते आणि यती या बाबतीत भाग्यवान निघाला. कारण- त्याचे आईवडील, भावंडं यांनी त्याला आवश्यकतेनुसार मदत केली. त्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी त्याला त्यांनी मोकळं सोडलं, अशा प्रकारे यती गौरव यानं त्याची प्रवासगाथा सांगितली आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवर बटरबरोबरचे काही हृदयस्पर्शी क्षणसुद्धा आहेत.