श्रीराम गीत
नैतिकतेची चर्चा करणे फार सोपे आहे. एक आदर्श असे समाजकारणी यांचे एक लाडके वाक्य होते. ‘संधीच मिळाली नाही म्हणून माझे ब्रह्मचर्य टिकले.’ त्या मानाने सचोटी पाळणे, सचोटीने वागणे हे बऱ्यापैकी सोपे असते. मात्र, एक सोपा निकष लावला तर नैतिकतेच्या संदर्भात फार तात्विक बागुलबुवा न करताही त्याची संकल्पना स्पष्ट होऊ शकते. किमान ५० वर्षे चालू असलेला एखादा व्यवसाय जर आपण पाहिला, एखादी भारतीय वा जागतिक दर्जाची कंपनी पाहिली तर त्यांच्या संस्थापकांपासून आजवरच्या संचालकांपर्यंत त्यांनी वैयक्तिक नैतिकतेचे निकष कठोरपणे अंमलात आणले दिसतात.
नैतिकता शिकवता येते का?
बहुदा याचे उत्तर नकारार्थी असावे. काही उदाहरण देतो. भारताची पोलादी चौकट म्हणून ओळखली जाणारी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विससाठी भरती करताना नैतिकतेचा एक पेपर द्यावाच लागतो. त्यातून व मुलाखतीतून तावून सुलाखून निघालेला प्रशासक पुढे काय करतो हे वेगळे सांगायची गरज नाही. वैद्याकीय व्यवसायाची सुरुवात एक शपथ घेऊन केली जाते. त्याबद्दल आज समाज व्यवस्थेत काय बोलले जाते त्याचाही उल्लेख करण्याची गरज नाही. न्यायव्यवस्था निवडणाऱ्या कॉलेजियममधील भांडणे आता चव्हाट्यावर येऊन वृत्तपत्रात वाचायला मिळतात. समाज घडवणाऱ्या शिक्षण पद्धतीतील भ्रष्टाचार गेली अनेक दशके जाहीर आहे.
हेही वाचा >>> GIC Recruitment 2023: ८५,००० महिना पगाराची नोकरी शोधत आहात? मग उशीर न करता ताबडतोब करा अर्ज
उत्तम करिअर म्हणजे उत्तम नैतिकता
हे सूत्र मात्र ज्या ज्या लोकांनी लक्षात ठेवले आणि प्रत्यक्ष जगले त्यांची कारकीर्द कायमच झळाळती राहिली लक्षात राहिली व इतिहासात त्याची यथायोग्य नोंद केली गेली आहे. हे केवळ आपल्या देशात घडते असे नसून सर्व जगात हाच न्याय लावला जातो. अशा लोकांची संख्या भले लाखात एक असली तरी उरलेले सारे त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून बघत असतात. रामाचा आदर्श मानला जातो… पण कृष्णाचे सत्य हे व्यवहारात वापरले जाते. या दोन्हीमध्ये नैतिकतेचे आचरण करणे शक्य असते. त्या आचरणाची यथायोग्य किंमतही आयुष्यात चुकवावी लागते. हे सारे अमलात आणणे, दैनंदिन जीवनात जगणे किती कठीण आहे ते फक्त एका उदाहरणातून स्पष्ट करतो.
१) मी कधीही चोरी करणार नाही.
२) मी चोरी करताना पाहिले तर चोराला पकडून देईन.
३) चोरी करताना मी पाहिले आहे. पण भीतीमुळे मी तशी साक्ष देणार नाही.
४) खोटा चोरीचा आळ माझेवर आला तर समाजाला न घाबरता निर्भयपणे मी त्याला सामोरा जाईन. माझे निरपराधी पण शाबित करीन.
अशा नैतिकतच्या प्रसंगानुरूप संकल्पना बदलतात. वाहनाचा हातून घडलेला अपघात, पोलिसी वा सैनिकी कर्तव्य करत असताना हातून झालेली हत्या, उच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मध्ये रूपांतरित करणे ही ठळक उदाहरणे सांगता येतील. नैतिकतेचा अभिमान जरूर असावा पण जेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात होते त्या वेळेला तो समाजाला सहन होत नाही. ही सुरीच्या धारेवरचीच कसरत असते. मात्र ज्यांना लखलखीत आदर्श करिअर करायची आहे त्यांनी याचे आचरण शालेय जीवनापासूनच करायचे असते.
सचोटीने वागावे.
हे त्या मानाने फार सोपे असते. कारण मी कसा वागणार? माझे वर्तन कसे असणार? विपरीत परिस्थितीत सुद्धा मी त्याला तोंड कसे देणार? हे सारे निर्णय सचोटीने वागायचे ठरवलेली व्यक्ती स्वत:च घेत असते. पुन्हा आपण ते उदाहरणातूनच पाहू यात.
मी कधीही चोरी करणार नाही किंवा चोरीच्या व्यवहाराशी संबंधित वस्तूंची खरेदी विक्री करण्यात सहभाग घेणार नाही. ही सचोटीची मर्यादा राहते. दुसरे उदाहरण म्हणजे मी लाच घेणार नाही व लाच देणार नाही मग भले तर त्याचा माझ्या व्यवसायावर करिअरवर परिणाम झाला तरी चालेल. सचोटीने वागणाऱ्या अशा व्यक्तींकडे समाज कौतुकाने नक्कीच पाहतो. मात्र वेळ प्रसंगी त्यांची अडचण होत असल्यास त्यांना तात्पुरते बाजूला सारायला राजकारणी असोत किंवा कार्पोरेट जगत असो कचरत नाही. पण त्याच वेळी त्या व्यक्तींकडे आदराने जरूर पाहिले जाते. त्याचा कोणत्याही उत्तम करिअरचे स्पर्धेत धावण्यासाठी फायदाच होतो.
सचोटीने व्यवहार करणाऱ्या विविध व्यवसायातील उत्तम करिअर केलेल्या अनेक लोकांची यादी सहजपणे माझ्या डोळ्यासमोर आत्ता येत आहे. मात्र प्रत्येक व्यवसायातील नैतिकता कठोरपणे जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून अंमलात आणणाऱ्या व्यक्तींची नावे आठवावी लागत आहेत.
व्यवहार, मूल्य विचार, सचोटी नक्की हवी. नैतिकता ज्याला जशी व जितकी संभाळता येईल तितकी मात्र गरजेची.
सदर समाप्त