डॉ श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर या चारीचे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. या लेखात स्पोर्ट्स मॅनेजमेंट करिअरबद्दल आईचा दृष्टिकोन.
निशिगंधाचे फूल मला लहानपणा पासून आवडणारे. पण मुलगी झाली तर तिचे हे नाव ठेवावं असं काही माझ्या डोक्यात आलं नव्हतं. पण ते तिच्या आत्याच्या डोक्यात आलं आणि तिने माझ्या मुलीच्या कानात बारसे करताना निशिगंधा म्हणून सांगितल्यावर मी मनातून मोहोरून गेले होते. चारच दिवसांनी मुलीला कौतुकाने मांडीवर घेऊन तिच्या बाबांनी तिला ‘निशी’ म्हणून हाक मारल्यावर मी जरा चकितच झाले. लेकीचं आणि बाबाचं गुळपीठ त्या दिवशीपासून जमलं ते जमलंच. निशिगंधाचा दुसरा वाढदिवस होता. माझ्या तुटपुंज्या पगारातून तिला काय भेट आणायची असा मी विचार करून न परवडणारी बार्बी डॉल घेऊन आले. संध्याकाळी बाबा आला आणि त्याने एक साधीशी प्लास्टिकची क्रिकेटची बॅट आणली होती. मी आणलेल्या बार्बीकडे ढुंकूनही न पाहता निशिगंधाने ती बॅट घेतली. माझ्या बाबानी बघ काय आणलय म्हणून माझ्याकडे कौतुकाने धावत आली. खरंतर त्या वेळेला तिला बॅटचे करायचे काय, हे सुद्धा कळत नव्हते. पण बाबांनी छोटासा रबरी चेंडू काढून तिच्याकडे टाकल्यावर त्या बॅटने तिने असा काही फटकारला की मी बघतच राहिले. क्रिकेट प्रेमी माझा नवरा ते दृश्य बघून आनंदाने नाचायचा फक्त बाकी राहिला होता. पण हे गमतीचे प्रकरण नंतर माझ्याच डोक्यावर बसेल एवढेच नव्हे तर संसारासाठी मला दरमहा नवऱ्याकडून मिळणाऱ्या पैशातही वाटा मागेल असे चुकूनही वाटले नव्हते. घरात किंवा एखाद दिवशी बागेत गेल्यावर हिरवळीवर चालणारे बाप -लेकीचे क्रिकेट ती दुसरीत गेली त्या दिवशी मात्र वेगळेच वळण घेऊन माझ्या मनात व जीवनात खळबळ माजवणारे ठरले.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. मधील संधी
क्रिकेटमय जग
शाळा संपली की क्रिकेट, मोकळा वेळ मिळाला की क्रिकेट, या खोलीतून त्या खोलीत जात असताना सुद्धा हातात बॅट घेतल्यासारखा स्टान्स घेत माझ्याकडे बघणे, साऱ्या घरभर चेंडूमुळे पाडलेल्या वस्तूंचा पसारा, रात्री अंधारात पायाखाली कधी चेंडू येऊन पडू याची कायम भीती, आसपासच्या शेजारी मंडळींची चेंडूमुळे होणाऱ्या नुकसानीच्या तक्रारींना तोंड देण्याकरिता सामोरे जायला मलाच कायम भाग पडत होते. आयपीएलचा मौसम असो किंवा एखादी क्रिकेटची टेस्ट मॅच बाप-लेक सोफा त्यांच्याच एकट्याचा, मालकीचा असल्याप्रमाणे हातातील रिमोट पाठीमागे लपवून माझी टिंगल करत टीव्ही बघत असत. मुली क्रिकेट खेळतात हे फक्त पेपरात वाचण्यापलीकडे मी क्रिकेट ग्राउंड वर प्रत्यक्ष खेळणारी मुलगी पाहिलीच नव्हती. त्यामुळे माझ्या पोटात या साऱ्याचा प्रचंड गोळा सतत बसलेला होता.
माझ्या नवऱ्याला म्हणजे महेशला काही सांगायची सोयच नाही. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही चर्चेद्वारे एकमेकांच्या संमतीने सोडवत आलेलो. आमच्या दोघांची लग्ना आधी तीन वर्ष ओळख पण होती. त्याला क्रिकेट आवडते हे माहीत असले तरी असे वेड असेल असे कधी जाणवले नव्हते. महेशला क्रिकेट आवडणे आणि त्यासाठी त्याने निशीला भरीस घालणे यातील मोठाच फरक मला सतत बोचत असे. निशी आता लहान आहे. मोठी होईल तेव्हा यात बदल होईल अशी आशा मी बाळगून होते. पण ती सुद्धा निशीने मोठ्या शाळेत प्रवेश घेतला आणि पूर्णपणे फोल ठरली.
हेही वाचा >>> RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदासाठी होणार मेगा भरती; उमेदवार ‘या’ तारखेपासून करू शकतात अर्ज
अनाकलनीय क्षण
ती संध्याकाळ मला जशीच्या तशी आठवत आहे. दाट काळेभोर जावळ असलेली निशी बाबाच्या मागे बसून टाटा करून गेली व परत आली ती माझीच निशी का, असे मला वाटले. बोटानेच भांग जेमतेम पडेल अशी कटिंग करून दोघे परत आले होते. हातातील क्रिकेटची कॅप तिने डोक्यावर घातली आणि मला प्रेमाने मिठी घातली. माझे दोन्ही हात तसेच मागे राहिले. तिला जवळ न घेता… तिच्या जन्मापासूनची अशी पहिलीच वेळ. क्रिकेट करता पाण्यासारखा खर्च सुरू झाला तो पाचवीपासूनच. क्लबची फी, जाण्यासाठीची रिक्षा, क्रिकेटचे संपूर्ण स्वत:चे किट, दर महिन्याला होणाऱ्या मॅचेसचा प्रवास खर्च, दिवसभराचा जेवण खाण्याचा खर्च वेगळाच. यामध्ये महेशचा उत्साह दांडगा असला तरी त्याचा पगार त्याला पुरेसा कधीच पडणार नव्हता. विविध गोष्टींचे हप्ते भरताना आधीच आमची दमछाक होत होती. चांगली शाळा पाहिजे म्हणून तिची वर्षाची फी एक लाख, तर चांगले क्रिकेट खेळायचे म्हणून त्याचेही वर्षाचे एक लाख, हा खरं तर श्रीमंत लोकांना परवडणाराच खेळ. महेश व निशी पायी मी त्याच्यात ओढली गेले होते आणि सुमारे सहा वर्षे या साऱ्या खर्चाच्या ओझ्या पायी घराच्या विविध प्रसंगातील खर्चाला आवर घालण्यामुळे आनंदाच्या छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही सारेच मुकत होतो. याबद्दल चुकून सुद्धा तोंडातून शब्दही काढण्याची मला हिंमत नव्हती.
निशी पुढे जाऊन काय काय करेल याची स्वप्ने महेश रंगवत होता तर निशी त्या स्वप्नातच दंग झालेली होती. निशी दहावीत गेली तेव्हा साऱ्या दहावीत गेलेल्या मुलांच्या पालकांप्रमाणे माझीही अवस्था होती. ती कशी असते ते सांगायचीही गरज नाही. सुदैवाने अभ्यासाच्या दडपणाखाली का होईना ते वर्ष निशीने मनावर घेऊन पण क्रिकेटचा चेंडू समोर ठेवूनच अभ्यास केला. पेपरमध्ये निशीचे नाव चुकून माकून कधी आले तर माझे ‘निशीची आई’ म्हणून कौतुक होत असे. पण त्या कौतुकाचा आनंद मिळण्याऐवजी पोटातील भीतीचा गोळा अधिकच वाढत असे. एखाद्या खेळाडूला वगळले तर त्यावर होणारी चर्चाच माझ्या डोळ्यासमोर नेहमी येई.
निराशेचा काळ
अखेर ती वेळ आलीच. ती आठवण सुद्धा आता नको वाटते. निशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत असा तिच्या कोचचा फोन आला. चेंडू लागून बरगडी फ्रॅक्चर झाल्यामुळे झोपायची, हालचाल करायची सारीच पंचाईत. तिची चिडचिड, नंतर खेळातून वगळले गेल्यामुळे झालेला संताप. माझ्याकडून करू नये तो झालेला उल्लेख. मुलांकरता आपण काय काय केले हा उल्लेख चुकून सुद्धा करू नये, हे माझे भान कधी सुटले कळलेच नाही. महेश दगडासारखा गप्प होता पण निशी ने मात्र दोन हातात तलवारी घेऊन माझे वर शाब्दिक हल्ला केला होता. मी तो सोसत राहिले आजवर. तिने कॉमर्सला प्रवेश घेतला असल्यामुळे जे जे करणे शक्य होते ते मी तिला सुचवे. पण प्रत्येक गोष्टीला ठाम नकार व माझ्याशी अबोला या पलीकडे कधी फारसे चांगले घडत नव्हते. कधी काळी खेळलेल्या खेळातून मॅनेजमेंट स्वरूपाची उत्तम करिअर होऊ शकते याची खरे तर मलाच काय महेशलाही कल्पना नव्हती. आजही निशी काय करते याबद्दल आमचे मित्र मंडळींना सांगितले तरी फार कळते अशातलाही भाग नाही. पण निशी विविध शहरात विमानाने जाते, मोठ्या हॉटेलमध्ये राहते, सर्व प्रकारच्या खेळाडूंना संभाळते, आणि त्या खेळांच्या आयोजनात तिचा मोठा सहभाग असतो एवढे मात्र सगळ्यांना समजते. नुकताच माझ्या वाढदिवसाला निशीने दिलेला चेक मी घरात फ्रेम करून ठेवला आहे. तो वटवण्याचे माझ्यात तरी धाडस नाही.