बारावीनंतर मुलीनं इंजिनीअरिंग करावं असं मीनलच्या आईला वाटत होतं, पण तिच्या वडिलांनी मात्र डॉक्टरीचा मार्ग सुचवला. मुलीने हे दोन्ही रस्ते धुडकावले आणि प्राध्यापक व्हायचे ठरविले. ते का हे कळायला पाच वर्षे जावी लागली, असं तिच्या आईचं म्हणणं…

पुण्याजवळच औंध तसं खेडच समजलं जायचं. त्या औंधात माझा जन्म झाला आणि शाळा शिक्षण तिथंच झाल. औंधाहून बस निघाली की उजव्या हाताला राजभवनचे न संपणारे कंपाउंड तर डाव्या हाताला विद्यापीठाचे भले मोठे आवार. मधला सारा सुनसान रस्ता. आता हे कोणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही इतके औंध बदलले आहे. शाळेत मी हुशार होते, शास्त्र आणि गणितात उत्तम मार्क असत. दहावीनंतर शिकायला जवळच खडकीच्या कॉलेजात जायचं का पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये याचं उत्तर मीच दिलं, मला शिकायला पुण्यातच जायचंय. मराठी माध्यमात शिकलेली, औंध गावातून आलेली मुलगी पुण्यातल्या नामवंत कॉलेजच्या वातावरणात प्रथम भांबावली आणि नंतर बहकली. इंग्रजीतून विषय न कळल्यामुळे मार्क खाली गेले. भटकण्यात वेळ गेल्यामुळे अभ्यास झालाच नाही. त्याच कॉलेजातून कशीबशी बीएससी पूर्ण केली. माझ्या नशिबातली खडकी चुकायची नव्हती म्हणून बीएड झाले आणि बीएड झाल्या झाल्या खडकीतच नोकरी पण मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापकांची ओळख माझ्या भावी नवऱ्याच्या आई-वडिलांशी होती. त्यातून लग्न ठरले आणि मी मराठीच्या लेक्चररची बायको बनले. ही १९८० सालातली सफल सुफल कहाणी आहे.

मीनलचा जन्म, बदलीचे चक्र

वर्षभरातच मीनलचा जन्म झाला. सरांच्या बदलीमुळे,घरात पण मी यांना सर म्हणलेले आवडते, तिच्या चार गावच्या चार शाळा झाल्या. प्रत्येक गावी मला बदली शिक्षिकेची नोकरी मिळत गेली. नवऱ्याच्या संस्थेचे जाळे इतके मोठे होते की प्रत्येक गावात पहिलीपासून पदवीपर्यंतच्या सर्व शिक्षणाची सोय एकाच आवारात होई. माझ्या नवऱ्याचा मराठी विषय आणि त्याची लेक्चररशिप हा गावाकरता खूप कौतुकाचा विषय असेल. पण का कोणास ठाऊक मला त्याच कौतुक कधीच वाटले नाही. मराठी वाचायला आवडणे, मराठी लेखकांची माहिती असणे, मराठी पेपरमधील विविध बातम्या, अग्रलेख वाचणे हे सारे मी मराठी शाळेत असल्यापासून आणि पुण्यातच असल्यामुळे करतच आले होते. काही वेळा असे लक्षात येई की मी ज्या लेखकांचा उल्लेख करते आहे त्यातील एकही पुस्तक माझ्या नवऱ्याने वाचलेले नाही. असे दोन-चार वेळा झाल्यानंतर आमच्यात अबोला व त्याचे दुराव्यात रूपांतर होते आहे असे मला जाणवले. तेव्हापासून माझा नवरा व त्याची नोकरी ही माझ्यापेक्षा उच्च दर्जाची, जास्त पगाराची आहे आणि माझ्यासारख्या माध्यमिक शिक्षिकेपेक्षा त्याला जास्त कळते हे मी मनोमन मान्य करून टाकले. शालेय वातावरणात मुलेपण कशी फुलासारखी असतात. सर्व विषयांसंदर्भात त्यांच्याशी छान गप्पा होऊ शकतात.तर या उलट मराठी विषय घेणारी कॉलेजमधली मुले ही मात्र दुसरं काही जमत नाही म्हणून मराठी, भूगोल व इतिहास घेणारी असतात हे वास्तव नजरेआड करून कसे चालेल बरे? माझ्या शास्त्र विषयाचा तो जरी दुस्वास करत नसला तरीही तुला कळते ते तुझ्याच शाळेपुरते असा मात्र त्याच्या वागण्यात अविर्भाव कायमच असे.

बारावीनंतर मीनलला इंजिनीयर करू असे मी जेव्हा सुचवले तेव्हा मात्र त्याने या ऐवजी डॉक्टरीचा मार्ग सुचवला. पण आमच्या अतिशहाण्या लेकीने दोन्ही रस्ते धुडकावले आणि साधा सरळसोट रस्ता पत्करला. तो का ते कळायला मात्र पाच वर्षे जावी लागली. मुलगा आईवर जातो व मुलगी बापावर म्हणतात ते मीनल एमएस्सी झाल्यावर शब्दश: खरे ठरले. तिने पीएचडीचा निर्णय आमच्या तोंडावर मारला. लहानपणी शाळेतून पुण्याला सुट्टीच्या दिवशी जाताना विद्यापीठाच्या आवारात जायचीही आम्हाला भीती वाटायची. याचा छोटा अनुभव फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला तेव्हा घेतला होताच. पुण्यातले ते एक छोटे विद्यापीठ म्हणायला हरकत नाही असं त्याच वातावरण आणि साऱ्या इमारती आणि मोठ्ठे आवार. मराठी बोलायला, मराठी माणसाला, आणि मराठी दिसण्याला तिथे किंमतच नव्हती. त्यामुळे मीनलने तुमची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठात प्राध्यापक बनायचे असे सांगितल्यानंतर आता आपल्या पोरीच्या आयुष्याचे तीन तेरा वाजले अशी खूण गाठ मनाशी बांधून मी माझे तोंड बंद केले होते.

एकदा मीनलला मी ऐकवणार होते की, ‘‘अगं पीएचडी झालेली निदान पाच नाव तर शोधून काढ. मग त्या रस्त्याला जाण्याचा विचार कर.’’ आता सारंच जाऊ द्यात. युरोपमध्ये कुठेतरी असलेली मीनल सुखात आहे. वर्षातून एकदा चार दिवस भेटते आहे. अधूनमधून वडिलांना फोन करतीय यातच माझं समाधान. आता आमच निवृत्तीनंतरचं आयुष्य असंच जाणार आहे. (क्रमश:)