मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. कला साधना हा छंदाचा भाग आहे. त्याला वाहून घेणे सामान्य माणसाला झेपत नाही, हे नृत्याचा छंद जोपासणाऱ्या नुपूरच्या आईचे मत…
माझं लहानपण अन् शिक्षण पुण्याच्या शिवाजीनगर भागात झाले. आई वडील दोघेही बँकेत नोकरी असलेले. मला दोन धाकटी भावंडे. तिघेही तसे हुशारच. पण सगळ्यात धाकट्या बहिणीचा ओढा कलाक्षेत्राकडे. तिने ठरवून ललित कला क्षेत्रातील पदवी घेतली. नंतर ती अभिनय व लेखनाकडे वळली. सध्या मालिका लेखनामध्ये तिचे नाव सुप्रसिद्ध आहे. आम्हा तीन भावंडांमध्ये छंदासाठी तिच्या नृत्यावर होणारा खर्च हा आमच्या घरातील कायमच चर्चेचा विषय होता. मात्र, आईचा तिला पाठिंबा मिळत असे. मधला भाऊ इंजिनीअर झाला. नंतर तो अमेरिकेला निघून गेला. दर महिन्याला एखादा फोन यापलीकडे त्याच्याशी आता संपर्क नाही.
नुपूरच्या जन्माच्या वेळी मी बाळंतपणाला माहेरी गेले होते. त्यावेळी या साऱ्या आठवणी पुन्हा उफाळून आल्या. बारशाच्या वेळी मावशी आणि आजीने नुपूर हे नाव सुचवले व ते माझ्या नवऱ्यालाही पसंत पडले. तो एकटाच मुलगा असल्यामुळे आत्याने नाव सुचवण्याचा विषय निघाला नाही.
लग्नानंतर प्रथम कोथरूडला व नंतर बाणेर येथे स्वत:च्या घरात नुपूरचे सारे आयुष्य गेले. अनेकदा तिच्याकडे पाहिले की ती मावशी सारखीच हट्टी आहे असे लक्षात येते. बीए ललित कला करत असतानाचा आनंद आणि प्रत्यक्ष कामाला लागल्यानंतर तिचे सारे अनुभव हा कायमच आई बरोबर चर्चेचा विषय असे. कधीकधी नको एवढे काम, तर कधी तीन तीन महिने बेकारीचे दिवस असा तिचा जवळपास चार वर्षे प्रवास मी पाहात होते. माझे लग्न ठरवून झाले, भावाने अमेरिकेतच एका मुलीशी लग्न केले आणि धाकटीने लग्नाचा विषय कायमच टाळला. ती कोणाबरोबर तरी लिव्हइन मध्ये राहते असे तिच्या वयाच्या तिशी नंतर आमचे कानावर आले.
हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : आयआयटी, मद्रासमधील ऑनलाइन कोर्सेस
नुपूरला डान्स क्लासला घालण्याचे आईने सुचवले होते, कारण सुट्टीचे महिन्यात घरात ठेवणे शक्य नव्हते. म्हणून मी ते मंजूर केले. क्लास आणि पाळणाघर यामध्ये तिची पहिली तीन-चार वर्षे अशीच गेली. त्यातून डान्स क्लास तिला इतका आवडायला लागेल याची सुतराम कल्पना आम्हाला दोघांनाही आली नव्हती. पण जेव्हा तिने तिची लहान मुलींना शिकवण्याकरिता ताई म्हणून नेमणूक झाल्याचे सांगितले तेव्हा नकळत का होईना तिच्या प्रगतीबद्दल आनंद झाला होता. त्यानिमित्त मी आणि श्रीधर, म्हणजे माझं नवरा दोघेजण तिच्या गुरु ताईंचे आभार मानायला क्लासमध्ये गेलो होतो, तेही तिला न सांगता. तिच्या प्रगती बद्दल, वाटचाली बद्दल आम्हाला त्यांनी अनेक गोष्टी ऐकवल्या. त्या श्रीधरला फारशा आवडल्या नव्हत्या, मात्र त्यात मला फारस वावग वाटल नव्हते. कारण बहिणीचा असाच प्रवास माझ्या डोळ्यासमोर होता.
अरंगेत्रम सोहळा
नुपूरचे अरंगेत्रम कधीतरी करायला लागणार याची मला कल्पना होतीच. असे सोहळे लहानपणापासून मी पाहातच आले होते. क्लासची छानशी जाहिरात करण्याचा तो एक मार्ग असतो हेही मला कळत होते. मात्र तो नुपूरच्या नृत्याच्या वाटचालीतील अखेरचा टप्पा असेल असे मी आणि श्रीधर मनाशी धरून होतो. छंद म्हणून नंतर तिने तो जोपासावा आणि स्वत:ची करिअर आमच्या प्रमाणे सायन्स घेऊन सुरू करावी. असे सारे तो सोहळा साजरा करतानाचे आमचे साधे विचार होते. तिचा अभ्यास खरोखरच चांगला होता. जाईल त्या क्षेत्रात यश मिळवेल असेही लक्षात येत होते. पण असा एखादा कार्यक्रम, त्यानिमित्त काढलेले शंभर एक फोटो, झालेले कौतुक मुलांच्या डोक्यात कुठेतरी खोलवर रुजून बसते याची पुसटशी कल्पनाही माझ्या व श्रीधरच्या मनात आली नाही.
निकालाने आणले वादळ
दहावीचा निकाल हा आनंदाचा भाग असतो, हे आमच्या घरात घडलेच नाही. गणितातील पैकीच्या पैकी मार्काचा आनंद, शाळेत संस्कृतला पहिली आल्याचे कौतुक या साऱ्यावर नुपूरने सांगितलेल्या, ‘मी नृत्यातच करिअर करणार’, या वाक्याने विरजण पडले. मामाने तुला तिकडे अमेरिकेत शिकायला बोलावले आहे या आमिषाचा सुद्धा तिच्या वरती काहीच परिणाम झाला नाही. श्रीधरचा संताप आवरताना माझीच पंचाईत होत होती. क्लासमध्ये जाऊन तो काही वेडवाकडे बोलणार तर नाही अशीही माझ्या मनात त्या महिनाभरात भीती होती. नुपूरने गणित घेऊन बीए करायचे ठरवले आहे हे म्हटल्यावर श्रीधर जरा शांत झाला. गणितातून काहीतरी आयटीचा रस्ता निघेल हे त्याला चांगले माहिती होते. त्याच्या कंपनीत अशी काही माणसेही माहिती होती. गणित चांगले असून तिने घेतल्यामुळे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशी आमची दोघांची स्थिती नुपूरने करून सोडली होती. पण हाही आनंद फारसा टिकला नाही. पदवीनंतर तिने पूर्णवेळ गुरूंच्या बरोबरीने ‘नुपूरालय’, मध्ये वेळ घालवायला सुरुवात केली. श्रीधर व नुपूर मध्ये पुन्हा एकदा त्याची ठिणगी पडली होती. लहानपणापासून नृत्यावर तिच्यासाठी केलेला खर्च सुद्धा तिला ऐकवून झाला. पण हसण्यावारी नेऊन तो विषय ती संपवत असे. उत्तरा ऐवजी तिचे असे हसणे आमच्या जिव्हारी लागे. या विषयावरून एकमेकांना दोष देणे सुद्धा आम्ही बंद केले. नियतीच्या हाती काय घडेल ते पाहू, असे म्हणून हा विषय आम्ही बंद केला होता आणि नियतीने तिलाच झटका दाखवला. गुरूंचे अचानक निधन, क्लास बंद पडणे, सगळीकडून कोंडी होणे याचा अनुभव ती प्रथमच घेत होती. पण लवकरच ती त्यातून सावरली. धाकट्या बहिणीने जसे लिव्हइन मध्ये राहणे सुरू केले तसे न होता नुपूरने एक जीवन साथीदार निवडला. त्याचा तिच्या व्यवसायाला छान हातभार लागतो आहे हीच आता आमच्या समाधानाची गोष्ट. कला साधना हा छंदाचा भाग आहे असे श्रीधरचे कायमचे म्हणणे. त्याला वाहून घेणे सामान्य माणसाला झेपत नाही. हे आता मलाही पटायला लागले आहे. तुम्हाला?