राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम वढरउच्या पॅटर्ननुसार होणार असल्याची अधिसूचना जून २०२२ मध्ये प्रसिद्ध झाली तेंव्हापासून ‘तयारी करणारे आणि तयारी करवून घेणारे’ सर्वच जण नव्या तयारीला लागले खरे, पण त्याचा नेमका मूहूर्त कधी याची प्रतीक्षा काही संपत नव्हती. नवीन वर्षात नव्या पॅटर्ननुसार परीक्षा होईल किंवा नाही देव जाणे पण किमान जाहिरात तरी प्रसिद्ध होईलच अशी आशा आहे.
गेल्या ५० वर्षात परीक्षा पद्धतीत आयोगाने अनेक धोरणात्मक बदल केले. UPSC च्या धर्तीवर राज्यसेवा परीक्षा पद्धती हा निर्णय आयोगाचा गुणात्मक दर्जा वाढवणारा पुढचा टप्पा आहे. नियोजित बदलांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाला जय्यत तयारी करावी लागणार आहे. प्रश्नपत्रिकेतील चुका, मराठी, इंग्रजी भाषांतराचा घोळ, कधी प्रश्न चुकीचे असतात; त्यामुळे परीक्षेनंतर बऱ्याचदा प्रश्न रद्द करावे लागले आहेत. प्रश्नपत्रिकेचा दर्जा टिकवून ठेवणे हे आजही आयोगाला अवघड जाते हे आपण प्रत्येक परीक्षेत पाहतो. नव्या पॅटर्नमध्ये अशा चुका परवडणाऱ्या नाहीत.
डिसेंबरमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. प्रश्नांचा दर्जा पाहता कळत नव्हते प्रश्नपत्रिका राज्य सेवा परीक्षेची की गट ब, गट क परीक्षेची! हर्षवर्धनने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? १८५७ च्या ऊठावामध्ये कानपूरचे नेतृत्व कोणी केले? राज्यघटनेतील कोणती कलमे देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? अर्थशास्त्र हे कुबेराची पुजा करणारे शास्त्र आहे असे कोणी म्हटले? असे एका शब्दात उत्तरे द्या किंवा एका वाक्यात उत्तर द्या अशा टाईपचे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विचारले गेले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे प्रश्न वगळता इतर सर्व विषय घटकांवरचे प्रश्नांचे स्वरूप ’चला GS- GS खेळू या’ असेच होते. मी नेहमी म्हणतो, आयोगाचे काम परीक्षा घेणे आणि उमेदवारांचे काम परीक्षा देणे. प्रश्नपत्रिकेचा दर्जा, प्रश्नांची काठिण्य पातळी काय असावी, कशी असावी हे ठरविणे आयोगाचे काम. याविषयी आपली तक्रार असताच कामा नये. पण मुद्दा हा की, यातून उमेदवारांनी बोध काय घ्यायचा?
सर्वसाधारणपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन केले जाते की, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे नीट विश्लेषण करा, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात याचा नीट अभ्यास करा आणि मग अभ्यासाची दिशा ठरवा. अभ्यासाचा भाग म्हणून प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आवश्यकच आहे. हे ठीक. पण राज्यसेवा २०२३ च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करता पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी उमेदवारांनी काय दिशा ठरवावी?
मुळात एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. प्रश्नपत्रिका सेट करायचे असे कुठले ‘सिद्ध शास्त्र’ नाही. आयोगाची प्रश्नपत्रिका ही कोणा एका तज्ञाकडून तयार केली जात नाही. वेगवेगळ्या तज्ञांकडून तयार करण्यात आलेले प्रश्न एकत्र करुन एक Question Bank तयार होते. आणि त्यातून randomly प्रश्न निवडून शेवटी प्रश्नपत्रिका तयार होते.
त्यामुळे प्रश्नाचा मुद्दा, स्वरूप, दर्जा, काठिण्य पातळी याचे विश्लेषण महत्त्वाचे असले तरी त्यावरच अभ्यासाच्या दिशेची पूर्ण भिस्त ठेवून चालत नाही. आणि ‘अपेक्षित’ चे अंदाज बांधणे तर त्याहून चालणार नाही. हवामानाचा अंदाज, मान्सूनचा अंदाज याला एक शास्त्रीय बेस असतो. अंदाज कधी खरे ठरतात, कधी चुकतात पण शास्त्र म्हणून आपण ते मानतो. संपूर्ण तयारी करताना ‘मी फक्त फुल टॉस बॉलवर सिक्स मारायची प्रॅक्टिस करतो.’ याला तयारी म्हणत नाहीत. कधी बाऊन्सर, कधी यॉर्कर तर कधी गुगली… समोरून येणाऱ्या प्रत्येक चेंडूसाठी मी तयार आहे या अवस्थेला संपूर्ण तयारी म्हणतात. म्हणून भक्कम तयारीसाठी अभ्यासाला पर्याय, जास्त अभ्यास.
हेही वाचा :
उत्तर प्रदेश, बिहार अशा हिंदी भाषिक राज्यांच्या लोकसेवा आयोगांचे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती या नेहमीच UPSCच्या अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीप्रमाणेच होत्या व वढरउ ने केलेल्या बदलांनुसार त्या सुधारीत करण्यात येतात. किंबहुना या राज्यांतील विद्यापीठांमध्येही शैक्षणिक अभ्यासक्रम UPSC च्या अभ्यासक्रमास अनुरूप असेच ठरविण्यात येतात. त्यामुळे या राज्यातील उमेदवारांसाठी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची एकाच वेळी तयारी करणे खूप सोयीचे आणि यशदायी असते. एकाच तयारीमध्ये एकापेक्षा जास्त परीक्षा देता येणे, करिअरच्या जास्त संधी उपलब्ध होणे याला ‘पॉप कॉर्न इफेक्ट’ म्हटले जाते. तो या हिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांना नेहमीच मिळत आला आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र याबाबत खूप उशीराने का होईना पण सुरुवात झाली आहे. आणि याचे गुणात्मक फायदे भविष्यात नक्कीच बघायला मिळतील.
steelframe.india@gmail. com