नव्या पॅटर्नला सामोरे जाताना जुन्या काही सवयी सोडाव्या लागतील. नवे बदल स्वीकारावे लागतील. राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. जुन्या पॅटर्नप्रमाणे होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा असेल. नव्या पॅटर्नप्रमाणे होणाऱ्या परीक्षेची जाहिरात या वर्षात अपेक्षित आहे. एप्रिलच्या मुख्य परीक्षेसाठी काही हजार उमेदवार पात्र ठरतील. ही मुख्य परीक्षा हेच या उमेदवारांचे पहिले प्राधान्य हे असणार आहे. याशिवाय नव्या जुन्या सर्व उमेदवरांना नव्या पॅटर्नच्या नव्या अॅप्रोचसाठी सज्ज व्हावे लागेल.
उमेदवारांमध्ये कोणती कौशल्ये, कोणती अभिवृत्ती आणि गुण असले पाहिजेत हे तपासायचे निर्णय आयोग घेतो. त्यासाठी कोणत्या प्रकारे परीक्षा घ्यायची हेही आयोगच ठरवतो. त्यामुळे आयोगाने कोणत्याही पद्धतीने घ्यायची म्हटली तरी अधिकारी व्हायचे तर परीक्षा देणे याशिवाय वेगळा कोणता पर्याय उपलब्ध असतो? कम्फर्ट झोनबाहेर काही सामोरे आले तर त्याबाबत तक्रार करण्यातून साध्य काहीच होणार नाही. त्यापेक्षा प्रत्येक आव्हान ही आपल्या क्षमता दाखवून देण्याची संधी मानून त्याला सामोरे गेले पाहिजे. ज्या अधिकारी पदावर आपण पोहोचणार आहोत, त्यासाठी प्रयत्न करत आहोत तिथे पोहोचल्यावर रोज नवनवी आव्हाने सामोरी येणार आहेत. तिथे कोणताही ठरलेला सिलॅबस नसतो आणि ठरलेल्या चाकोरीतून रोजचा दिवस जाणार याची खात्री नसते. मग त्यावेळी कुठे तक्रार करणार? त्यामुळे बदललेल्या परिस्थितीचे विश्लेषण करुन तिला सामोरे जायला हवे.
हेही वाचा : JEE Main 2025च्या संयुक्त प्रवेश परीक्षा सत्र एकचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होईल परीक्षा
सर्वात मोठा बदल आहे तो परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप. दोन तासात १५० गुणांसाठी १५० गोळे रंगवायचे आणि तीन तासांत २५० गुणांसाठी काही हजार शब्द लिहायचे यामध्ये खूप मोठा फरक आहे. आत्ताच्या पद्धतीमध्येही किमान १२० गोळे रंगवायचे म्हटले तरी घटकविषयाच्या दिलेल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीतील १२० मुद्द्यांबाबत किमान प्रत्येकी तीन ते चार आयाम नेमकेपणाने माहित असणे आणि ते ऐन परीक्षेच्या काळात आठवणे हे मोठे आव्हान असते. मुद्दा माहीत असला म्हणजे भागले असा आत्ताचा अभ्यासाचा अॅप्रोच यापुढे कामी येणार नाही. केवळ पाठांतर आणि स्मरणशक्तीच्या जोरावर निभावणे आता शक्य नाही. यापुढे विश्लेषण करणे, माहितीचे उपयोजन करणे आणि ते योग्य शब्दांत मांडणे अत्यंत आवश्यक असेल. त्याच बरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की, नव्या पद्धतीमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमातील २० मुद्द्यांबाबत किमान दहा आयाम माहीत असले तर त्यामध्ये आपली निरीक्षणे, विश्लेषण आणि विचार मांडण्याची संधीही असणार आहे.
वर्णनात्मक परीक्षा ही काही खूप अनोळखी बाब नाही. पदवीपर्यंतच्या सर्वच परीक्षांमध्ये वर्णनात्मक उत्तरे आपण सर्वांनीच लिहिलेली आहेत. आता उत्तरे ही वेगळ्या अॅप्रोचने लिहीणे अपेक्षितआहे. उमेदवारांची लिखाणाची, त्यातही वेगाने लिहिण्याची सवय जवळपास मोडलेली आहे. मुद्देसूद व परिणामकारक उत्तर लेखनासाठी आवश्यक कौशल्ये पदवी परीक्षेनंतर वापरलेलीच नाहीत. त्यामुळे लेखनाचा नियमित सराव हा यापुढे अत्यंत महत्वाचा असणार आहे. तयारीची सुरुवात करणाऱ्या उमेदवारांना उत्तर लेखनाचा सराव लगेच शक्य नाही. त्यामुळे रोज नियमितपणे अर्धा तास संदर्भ पुस्तक किंवा वृत्तपत्रांतील संपादकीये यातील उतारे लिहिण्याचा सराव ठेवावा. जुन्या उमेदवारांनी त्यांच्या नोट्सवरून UPSC च्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा रोजचा सराव सुरू करावा.
वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीमध्ये कोणता ना कोणता पर्याय बरोबर असतोच. त्यामुळे सध्या उमेदवारांना स्मरणशक्तीच्या जोरावर उत्तरे शोधण्याची सवय आहे. पण यातून आपल्या व्यक्तिमत्वाची अन्य कौशल्ये दाखवून देण्याची संधीच उपलब्ध होत नाही. उमेदवारांची आकलन क्षमता, विश्लेषण क्षमता, एखाद्या मुद्द्याबाबत सारासार विचार करून सकारात्मक/ नकारात्मक बाजू लक्षात घेऊन निर्णय घेण्याची क्षमता, विचारांची स्पष्टता, विचार योग्य शब्दांत मांडण्याची क्षमता अशा बाबी तपासण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धत पुरेशी ठरत नाही. उमेदवारांमधील या अभिवृत्ती आणि कौशल्ये तपासण्यासाठी आयोगाने वर्णनात्मक पद्धतीचा स्वीकार केला आहे. उमेदवारांना आपल्या व्यक्तिमत्वाची ही वैशिष्ट्ये दाखवून देण्यासाठी नवीन पद्धत ही अत्यंत प्रभावी माध्यम असणार आहे.
आता प्रश्न उरतो तटस्थ मूल्यमापनाचा. काही वेळा एकाच उत्तराला एखादा पर्यवेक्षक खूप जास्त गुण देईल तर दुसरा पर्यवेक्षक जास्त कडक तपासणी करून कमी गुण देऊ शकतो. अशा वेळी उत्तरपत्रिका जास्त गुण देणा-या पर्यवेक्षकाकडे तपासण्यासाठी जाईल असे उमेदवार नशीबवान ठरणार. आणि काही अंशी तो अन्य उमेदवारांवर अन्याय ठरणार. ही रास्त भीती/शंका काही उमेदवारांच्या मनामध्ये असेल. आयोगाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी समितीने यावर उपाय सुचविल्याचे म्हटले आहे. सध्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी वापरण्यात येणारी पद्धत आयोगाने स्वीकारावी अशीही शिफारस समितीने केलेली आहे. यामध्ये उत्तरपत्रिका स्कॅन करून एकाच वेळी एकापेक्षा जास्त पर्यवेक्षकांकडून तिचे मूल्यांकन करुन घेण्यात येते. त्यांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढून त्याचे गुणांकन करण्यात येते. अशा प्रकारे झालेले गुणांकन तटस्थ आणि व्यवहार्य असेल अशी अपेक्षा करता येईल.
steelframe.india@gmail.com