भूरूपशास्त्र

प्राकृतिक भूगोलामधील संकल्पना व मुद्द्यांचा अभ्यास हा मूलभूत आयाम आणि भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. त्यातही या घटकांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ जास्त महत्त्वाची आहे. या घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्यावरच त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीचे अंतरंग- रचना आणि घटना -अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे हे मुद्दे भूमीस्वरुपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणून अभ्यासायचे आहेत. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना तिच्या अंतर्भागाची रासायनिक व भौतिक रचना, त्यांची वैशिष्ट्ये, वितरण आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अंतर्गत शक्ती असे मुद्दे यामध्ये पहायला हवेत. खडक, खनिजे यांचा परिणामही व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवा.

या व्यतिरीक्त भूमीस्वरूपांच्या विकासावर ज्या घटकांचा परिणाम होतो, ज्यांची महत्त्वाची भूमिका असते त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ स्राोताचा उठाव/उंची, खडकांची भौगोलिक रचना, हवामान, ऊर्जा, जैविक क्रिया आणि मानवी क्रिया यांचा समावेश होतो. या घटकांचा भूरुप निर्मितीवरील परिणाम समजून घ्यायला हवा.

भूरूपचक्रांची संकल्पना हा मुद्दा बहिर्गत शक्तींचे कार्य या घटकांतर्गत येईल. यामध्ये नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरूपे अभ्यासायची आहेत. या कारक घटकांच्या विदरण आणि संचयनाच्या कार्यातून विकसित होणारी भूरूपे आणि त्यामध्ये समाविष्ट भूरूपीकीय प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास भूरूपांच्या आकृत्यांसह टेबलमध्ये नोट्स काढाव्या. त्यामुळे आकृत्यांचा प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल.

भारतीय उपखंडाची उत्क्रांती कशी झाली याचा भूरूपशात्रीय मुद्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग- हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, वाळावंट, किनारी प्रदेश व बेटे यांचे स्वरुप, विस्तार, रचना, वैशिष्ट्ये, भौगोलिक व हवामानशास्त्रीय महत्त्व, आर्थिक महत्त्व हे पैलू अभ्यासायला हवेत. यामधील नदीप्रणाली व पर्वतप्रणालींचा अभ्यास दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम अशा क्रमाने केल्यास परिणामकारक ठरेल.

महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपीकीय वैशिष्ट्ये अभ्यासताना नदी व पर्वत प्रणालींचा उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने सलगता लक्षात घेऊन अभ्यास करावा. या ठळक भूरुपांनंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृष्ये/भूमीस्वरूपे – टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण यांचा आढावा घ्यावा. यामध्ये अशा भूरूपांचे स्थान, वैशिष्ट्ये, भौगोलिक तसेच पर्यटनातील महत्त्व असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

हवामानशास्त्र

वातावरण – वातावरणाची संरचना, घटना व विस्तार अभ्यासताना त्याचे ऋतू व हवामानावरील परिणाम समजून घ्यायला हवेत.

हवा व हवामानाची अंगे (Elements of weather and climate) अभ्यासताना तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वायुदाब, वारे हे महत्वाचे घटक व त्यांचा हवामानावरील परीणाम यांतील संकल्पनात्मक भाग महत्वाचा आहे. कार्यकारण संबंध जोडून या संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सौर ऊर्जा- पृथ्वीपृष्ठारील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊर्ध्व व क्षितिजसमांतर वितरण या मुद्द्यांचा अभ्यास उष्णतेच्या संतुलनावर परिणाम करणारे घटक, संतुलनाचा परिणाम, तापमानाच्या वितरणास कारक घटक व त्याचा परिणाम समजून घेऊन करावा.

हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे यांचे कारक घटक व परिणाम समजून घ्यावेत.

मोसमी वारे(मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडीत समस्या यांचा महाराष्ट्रापुरता भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असला तरी भारतीय पर्जन्याचा आढावा घेणे या मुद्याच्या आकलनासाठी आवश्यक आहे.

मान्सूनची निर्मिती, ऋतूंची निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. वेगवेगळ्या घटकांमध्ये समाविष्ट भौगोलिक प्रक्रियांच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्देसमजून घ्यायला हवेत-

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया ( current events)

steelframe. india@gmail. com