मागील लेखामध्ये (दि. १२ फेब्रुवारी) मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील प्राकृतिक भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. आर्थिक भूगोल घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये पाहू. या घटकातील आर्थिक व्यवसाय म्हणून शेती आणि मस्त्य व्यवसाय या मुद्द्यांचा अभ्यास कृषि घटकाच्या तयारीमध्ये करणे व्यवहार्य ठरेल. उर्वरित मुद्द्यांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खनिजे व ऊर्जा साधने

यामध्ये महाराष्ट्रातील साधनसंपत्तीचाच समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात उत्पादन होणारी प्रमुख खनिजे व ऊर्जा साधने माहीत करुन घ्यायला हवीत. खनिज/ऊर्जा साधन, त्याचा महाराष्ट्रातील साठा, त्याचे देशातील एकूण साठ्यातील प्रमाण व क्रमांक, उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा आणि क्रमांक, त्याचे आर्थिक महत्त्व, त्यांचा विविध उपयोगातील वापर आणि आवश्यकता या मुद्द्यांच्या आधारे तयारी करायला हवी.

हेही वाचा

खनिजांचे उत्खनन म्हणजे खाणींचे प्रकार, त्यांच्या पर्यावरणीय समस्या, त्यांतील कामगारांच्या समस्या, उत्पादकता हे मुद्देही बारकाईने अभ्यासायला हवेत.

वाहतूक

महाराष्ट्राच्या बाबतीत रस्ते, रेल्वे, सागरी व हवाई वाहतूक हे वाहतुकीचे प्रकार महत्वाचे आहेत. पण त्याच बरोबर देशातील अंतर्गत जलवाहतुकीचा आढावा घेणेही आवश्यक आहे.

या वाहतूक प्रकारांचा ब्रिटीश काळापासूनचा विकास समजून घ्यावा. या वाहतुकीच्या साधनांसाठी आवश्यक पायाभूत/ मूलभूत बाबी, अभ्यासायला हव्यात. या वाहतूक प्रकारांचे उपप्रकार, त्यांचा विस्तार, त्यांचा वापर/ उपयोजन, विविध उद्याोगांसाठीचे त्यांचे महत्व, प्रवासी वाहतुकीतील महत्त्व, त्यांच्या विकासासाठीचे केंद्र व राज्य स्तरावरील प्रकल्प/ योजना, संबंधित शासकीय अभिकरणे/ विभाग अशी विस्तृत माहिती असायला हवी. या मुद्द्यांच्या अद्यायावत आकडेवारीसाठी त्या त्या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालांचा संदर्भ घेता येईल.

आर्थिक विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास हे मुद्दे वाहतूक या मुद्यामध्ये समाविष्ट असल्याने वाहतुकीची साधने आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध व एकमेकांवर होणारा परिणाम अशा परीप्रेक्ष्यातून अभ्यासायला हवेत.

पर्यटन

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा अभ्यास स्थान, वैशिष्ट्ये, आर्थिक महत्त्व, वर्गीकरण, पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय आणि चालू घडामोडी या मुद्द्यांच्या आधारे करावा.

महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिध्द वने, उद्याने व सद्यास्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती असावी. किल्लेही त्यांच्या ठळक इतिहासासह स्थान, प्रकार, वैशिष्ट्य अशा मुद्द्यांच्या अनुषंगाने पाहावेत.

धार्मिक, वैद्याकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या संकल्पनांवर आधारित राज्यातील स्थळे व त्यांची वैशिष्ट्ये माहिती करून घ्यावीत.

पर्यटन क्षेत्रातील नव्या संकल्पना माहीत करून घ्यायला हव्यात.

केंद्र व राज्याच्या पर्यटनविषयक धोरणे व योजनांची अद्यायावत माहिती असायला हवी.

ज्ञानाधिष्ठीत आर्थिक व्यवसाय

इंग्रजी अभ्यासक्रमाचा मराठी अनुवाद करताना महाराष्ट्रातील आयटी पार्क्स हा मुद्दा समाविष्ट करायचा राहून गेला आहे. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करताना इंग्रजी अभ्यासक्रमच बघायला हवा.

इलेक्ट्रॉनिक व्यवसायांचे सर्वच प्रकार ज्ञानाधिष्ठीत नसले तरी त्यांचा विस्तृत अभ्यास करणे व्यवहार्य ठरेल. अभ्यास करताना त्यांचे प्रकार, या व्यवसायामध्ये समाविष्ट उत्पादने व सेवांचा आढावा घ्यावा. इलेक्ट्रानिक वस्तूंचे भारतातील उत्पादन, कच्च्या मालासाठी आयातीवरील अवलंबित्व, त्यांचा जीडीपी मधील व निर्यातीमधील वाटा, उत्पादनामध्ये अग्रेसर राज्ये, समस्या, कारणे, परिणाम व उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत. या व्यवसायातील सेवांमध्ये बी.पी.ओ उद्याोग, काही ज्ञानाधारीत स्टार्ट अप्स, त्यांची वैशिष्ट्ये, भारतातील विस्तार, भारतातील तसेच देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्टार्ट अप्सची थोडक्यात माहिती असे मुद्दे विचारात घ्यावेत.

राज्यातील आयटी पार्क्स, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र, भारतातील सिलिकॉन व्हॅली/माहिती तंत्रज्ञान केंद्र यांचा विकास, स्थाननिश्चितीमागील कारणे, यांमध्ये उपलब्ध सेवा व उत्पादने, त्यांचे आर्थिक महत्व, रोजगारनिर्मिती क्षमता अशा मुद्यांच्या आधारे अभ्यासावेत.

संगणक व जैव तंत्रज्ञान – CTBT (Computer Technology and Bio Technilogy) हा मुद्दा त्याचे ज्ञानाधारित स्वरूप लक्षात घेऊन अभ्यासायला हवा. यामध्ये या तंत्रज्ञानाच्या विकासाचा थोडक्यात आढावा, त्यांचे स्वरूप आणि प्रकार, त्यांचे विविध क्षेत्रामधील उपयोजन असे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये संशोधन व विकास आणि राज्यातील अशा संस्था असे दोन वेगळे मुद्दे आहेत. मराठीमध्ये भारतातील संशोधन व विकास संस्थेची भूमिका असा वेगळाच मुद्दा समाविष्ट आहे. तशी या तिन्ही मुद्द्यांमध्ये दुवा आहेच व तयारीही सलगपणे करता येऊ शकत.े त्यामुळे तिन्ही मुद्दे अभ्यासणे व्यवहार्य ठरेल. संशोधन व विकासामध्ये कार्यरत भारतातील संस्थांचा आढावा, नाव, बोधवाक्य, उद्देश, कार्यक्षेत्र, वाटचालीतील ठळक उपलब्धी, नियंत्रक/ नियामक यंत्रणा अशा मुद्द्यांच्या आधारे घ्यावा.

steelframe.india@gmail. com