फारुक नाईकवाडे
वनसेवा मुख्य परीक्षेतील पारिस्थितिकी तंत्र, त्याच्याशी संबंधित कृषी विषयक घटक, जैवविविधता आणि तिचे संवर्धन व भारतातील स्थानिक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती या मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
पारिस्थितिकी तंत्र
या घटकातील अन्नसाखळी, अन्न जाळे, कार्बन व नायट्रोजनची जैवरासायनिक चक्रे आणि कृषी घटकातील खते, वनस्पतींवरील रोग, कीटकनाशके आणि घातक वनस्पती/ तण या मुद्दय़ांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले दिसून येतात. अन्नसाखळीमधील प्रत्येक टप्प्यावरील सजीवांची वैशिष्टय़े, प्रत्येक टप्प्यावर होणारे ऊर्जेचे हस्तांतरण, जैव विशालन या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. अन्न जाळे व त्याचे प्रकार आणि त्यातील वेगवेगळय़ा टप्प्यांवरील सजीव यांचा आढावा घ्यायला हवा.
वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे व त्यांच्या अभावामुळे / अतिरिक्त प्रमाणामुळे होणारे रोग व त्यावरील उपाय हे मुद्दे टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासता येतात. सेंद्रीय व रासायनिक खतांच्या वापराबाबत तुलनात्मक अभ्यास करायला हवा. पोषक तत्त्वांच्या प्रमाणाच्या आधारे रासायनिक खतांचे प्रकार, त्यांच्या वापराच्या पद्धती, अति वापरामुळे होणारे परिणाम व उद्भवणाऱ्या समस्या हे मुद्दे समजून घ्यावेत. जैविक व रासायनिक कीटकनाशके, किडनाशके व तणनाशके यांचा समाविष्ट घटक, वापराच्या पद्धती, वापराचे दूरगामी परिणाम, समस्या या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.
वनस्पती व कृषी उपयोगी तसेच अन्य पाळीव पशूंचे आजार अभ्यासताना रोगाचेकारक घटक (जीवाणू जन्य/ विषाणूजन्य/ बुरशीजन्य/ पोषक तत्वांचा अभाव किंवा अतिरीक्त प्रमाण), रोगाची लक्षणे, त्यावरील उपचार व उपाय या मुद्यांचा समावेश करावा. घातक वनस्पती/ तण हा घटक भारताबाहेरील स्थानिक प्रजातींचा भारतात झालेला प्रादुर्भाव, त्याचा इतर वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणाम, असल्यास भारतीय जैवविविधतेस निर्माण होणारे धोके, त्यांच्या वाढीवरील उपाय या मुद्यांच्या आधारे अभ्यासायला हवा.
जैवविविधता
जैवविविधता या संकल्पनेमध्ये समाविष्ट घटकांचा व्यवस्थित आढावा घेणे आवश्यक आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासासाठी कारणीभूत आर्थिक व पर्यावरणीय कारकांचा अभ्यास आवश्यक आहे. शेती, गृहनिर्माण, खाणकाम, पायाभूत सुविधांचा विकास, युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्ती, निर्वनीकरण या मानवनिर्मित कारकांचा स्वरूप. कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा. यामध्ये घनकचरा आणि मलनि:स्सारण या घटकांचा समावेश करावा.
जनुकीय बदल, घातक प्रजातींचा प्रादुर्भाव, गंभीर रोगकारक सूक्ष्मजीव, नैसर्गिक आपत्ती, भूरासायनिक/ तापमानसंबंधी/ जलशास्त्रीय बदल या पर्यावरणीय घटकांचाही स्वरूप, कारणे, परिणाम, व्याप्ती, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा. मानवी आरोग्य, कृषी, इतर आर्थिक प्रक्रिया, हवामान संतुलन यामध्ये जैवविविधतेचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्या व राखीव वने /उद्याने/ अभयारण्ये यांच्या अभ्यासाबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे.
भारताच्या स्थानिक सजीव प्रजाती
भारताच्या महत्त्वाच्या स्थानिक वन्यप्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा – आढळाचे ठिकाण, तेथील भौगोलिक परिस्थिती, त्यामुळे झालेले अनुकूलन, असल्यास त्यांचेसाठी राखीव असलेली वने / उद्याने किंवा अभयारण्ये, त्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्न, शासकीय योजना, लोकसहभागाचे उपक्रम, भारताच्या महत्त्वाच्या स्थानिक पाळीव पशुंच्या प्रजातींच्या अभ्यासामध्ये आढळाचे ठिकाण, तेथील भौगोलिक परिस्थिती, त्यामुळे झालेले अनुकूलन, त्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्न, शासकीय योजना, त्यांचे आर्थिक महत्त्व या मुद्यांचा समावेश करावा.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने चराऊ कुरणे व पशुखाद्य यांच्या आर्थिक बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे.भारतातील महत्त्वाच्या स्थानिक वनस्पती प्रजातींचा अभ्यास आढळाचे ठिकाण, आवश्यक अनुकूलन, पारिस्थितिकी तंत्रातील महत्त्व या मुद्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून करावा. अनुकूलनाचा विचार करताना मुळे, खोड, पाने, फुले, फळे, बिया, उंची, विस्तार यांमध्ये निर्माण झालेली वैशिष्टय़े समजून घ्यावीत. यामध्ये खारफुटी वनस्पतींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
भारतीय वनांमधील महत्त्वाच्या वृक्ष प्रजाती, त्यांचा वनोत्पादनामधील सहभाग, महत्त्व, इमारती लाकूड व अन्य आर्थिक महत्त्वाच्या उत्पादनांमधील महत्त्व व वनाधारित उद्योग अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाव्यात. औषधी वनस्पतींच्या प्रजाती, त्यांच्यापासून होणारे औषधी उत्पादन व त्यांचे आर्थिक महत्त्व, इंधन / ऊर्जा निर्मितीसाठी होणारी ऊर्जा वनस्पतींची लागवड, तिचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व या मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे. भारतातील वनांचे प्रकार, वैशिष्टय़े, भौगोलिक वितरण व त्यावर परिणाम करणारे हवामानशास्त्रीय घटक (उंची, तापमान, पर्जन्यमान, आद्र्रता इत्यादी), यांचा तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे व्यवहार्य ठरते. नकाशासमोर ठेवून उजळणी केल्यास फायद्याचे ठरते.