राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर एकमध्ये शेतीच्या भौगोलिक, हवामानविषयक बाबी भूगोल घटकाबरोबर समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील मृदा आणि जलव्यवस्थापन या मुद्यांच्या तयारीबाबत आपण मागील लेखामध्ये पाहिले. या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर एकमधील परिसंस्था आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्यांच्या तयारीबाबत पाहू.

कृषि परिसंस्था असे अॅग्रो इकॉलॉजी या शब्दाचे भाषांतर मराठी अभ्यासक्रमामध्ये असले तरी प्रत्यक्षात कृषि परिस्थितिकी अशी कृषि विज्ञानातील शाखा अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यायला हवे. पर्यावरण विषयातील मूलभूत मुद्यांच्या आधारे शेती कशा प्रकारे करता येईल हा या शाखेचा अभ्यासविषय आहे. त्यामुळे आधी पर्यावरण विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेऊन मग त्यांचा कृषि घटकाच्या संदर्भातअभ्यास करणे ही स्ट्रॅटेजी असणे आवश्यक आहे.

परिसंस्थेची संकल्पना समजून घेताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक, त्यांचे परिसंस्थेतील कार्य (उदा. उत्पादक/ भक्षक/ विघटक) समजून घ्यावे. परिसंस्थेची रचना अभ्यासताना वेगवेगळे घटक कोणत्या स्तरावर येतात व त्यांची त्यात्या स्तरावरील भूमिका/ उपयोग/ आवश्यकता काय आहे हे समजून घ्यावे. या आधारे ऊर्जा प्रवाह समजून घेणे सोपे होते. परिसंस्थेचे एक घटक म्हणून कार्य, निसर्गातील महत्त्व, तिच्या संवर्धनाची आवश्यकता, तिचे मानवासाठी महत्त्व हे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत. त्यांचा याच क्रमाने अभ्यास केला तर बहुविधानी प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरते.

जमिनीवरील परिसंस्थांमध्ये वेगवेगळ्या हवामान प्रदेशात वेगवेगळ्या परिसंस्था असतात. जंगल, गवताळ प्रदेश, टुंड्रा आणि वाळवंट या परिसंस्थांचे प्रकार पुढील मुद्यांच्या आधारे तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासल्यास फायदेशीर ठरते.

परिसंस्थेतील हवामानाची वैशिष्ट्ये, आढळणाऱ्या मृदांचे प्रकार, वनस्पतीं आणि प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन इत्यादी

पाण्यातील परिसंस्थांचे गोड्या पाण्यातील व समुद्री पाण्यातील असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येईल

पाण्याचा प्रकार (वाहते/ साठलेले) किंवा स्थान (खोल समुद्र / किनारी प्रदेश), पाण्यातील क्षार/ मीठाचे प्रमाण, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये पाण्याच्या क्षारता व खोलीनुसार झालेले अनुकूलन

परिसंस्थेतील उर्जा प्रवाह अभ्यासताना अजैविक घटकांपासून जैविक उत्पादक घटकांपर्यंत व त्यानंतर अन्न जाळ्यामध्ये व विघटनानंतर पुन्हा अजैविक घटकांपर्यंत असे ऊर्जेचे वहन नीट समजून घ्यायला हवे. त्यासाठी अन्न साखळी व अन्न जाळे या संल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. प्रत्येक टप्प्यावरील ऊर्जेचा किती भाग पुढील टप्प्यामध्ये जातो हे समजून घेणेही आवश्यक आहे.

जैवविविधता ही संकल्पना समजून घेताना त्यातील महत्वाचे घटक, त्यांचे महत्व, जैवविविधतेच्या संवर्धनाची आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनाची आवश्यकता हे मुद्दे पहायला हवेत. जैवविविधतेस असलेले धोके, त्यामागील कारणे, तिच्या नाशाचे परीणाम, जैवविविधता संवर्धन करण्यासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न, त्यामध्ये कार्यरत संस्था/ संघटनांची रचना, कार्ये, यश हे मुद्दे अभ्यासणे आवश्यक आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार, त्यांचा वापर, महत्व, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता या बाबी उदाहरणांसहित समजून घ्याव्यात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका/ जबाबदारी हा विश्लेषणात्मक मुद्दा हे. याबाबतचे मुद्दे विविध स्त्रोतांतून अभ्यासआयला हवेत.

पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी या परस्परसंबंधित आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यामध्येच आर्थिक पैलूही लक्षात घेणे आवश्यक आहे. शेतीतील प्रक्रिया (उदा. सिंचन आणि) परिसंस्था किंवा एकूणच पर्यावरण यांचा एकमेकांवर होणारा परिणाम व्यवस्थित समजून घ्यायला हवा. अन्न सुरक्षा, उपजिविका इत्यादी सामाजिक आर्थिक घटक आणि पिक उत्पादन यांमधील परस्परसंबंध बारकाईने अभ्यासायला हवेत.

कार्बन क्रेडीट ही संकल्पना अभ्यासताना कार्बन उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन करण्यासाठी अनुज्ञेय मर्यादा (कार्बन क्रेडीट), त्यांच्या मर्यादेबाहेर कार्बन उत्सर्जन करण्यासाठी कार्बन क्रेडीट्सची देवाण घेवाण हे मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. याबाबतच्या IPCCCमधील ठराव आणि निर्णय तसेच चालू घडामोडींची माहिती असायला हवी. कार्बन उत्सर्जन शोषून घेण्याच्या कार्बन जप्ती (Sequestration) या संकल्पनेचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा. कार्बन शोषून घेणारी माध्यमे व त्यामागील प्रक्रिया समजून घ्याव्यात. कार्बन जप्तीचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व समजून घ्यायला हवे. त्यासाठीचे उपाय/मार्ग माहीत करून घ्यावेत.

पर्यावरणीय नितीतत्त्वेे ही पर्यावरण संवर्धन व सुरक्षेतील मानवाची भूमिका व जबाबदारी अशा दृष्टिकोनातून अभ्यासायची आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्यावरणीय समस्यांबाबत पर्यावरणीय नितीतत्त्वे उदाहरणांच्या माध्यमातून समजून घ्यायला हवी. कृषि, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश (होलोकॉस्ट) परिणाम अभ्यासताना या सर्व मुद्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांचे स्राोत, या समस्या कमी करण्यासाठीचे उपाय, करण्यात येणारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न असे मुद्दे पहावेत.

steelframe. india@gmail. com

Story img Loader