फारुक नाईकवाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास’ गट ब आणि गट क सेवांच्या पूर्व परीक्षांची काठिण्य पातळी वेगळी होती. त्यामुळे गट ब आणि गट क सेवांच्या पूर्व परीक्षांच्या मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीसाठी आवश्यक आहे. या विश्लेषणावरून साधारणपणे या घटकावर १५ प्रश्न विचारले जातील असे गृहीत धरून तयारी करायला हरकत नाही. आधुनिक भारताच्या इतिहासाचे दोन भाग स्पष्टपणे लक्षात घ्यावे लागतात – स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर. यातील स्वातंत्र्यपूर्व कालखंडावर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात:

स्वातंत्र्यपूर्व इतिहास :

यामध्ये ब्रिटिशांचे राजकीय धोरण, त्यांचे विविध नागरी व राजकीय निर्णय / कायदे, महत्त्वाचे व्हाईसरॉय / गव्हर्नर जनरल व त्यांचे ठळक निर्णय या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

१८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मैलाचा दगड आहे. त्यामुळे या बाबतचे सर्व मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. सहभागी सामाजिक प्रवर्ग, त्यामागची कारणे, उठावाची सामाजिक – राजकीय कारणे, तात्कालिक कारणे, व्याप्ती, विविध नेते, त्यांचे कार्यक्षेत्र व उठावादरम्यान वा नंतरची त्यांची स्थिती, महत्त्वाच्या घोषणा.

ब्रिटिशांच्या धोरणांवर भारतीयांच्या प्रतिक्रिया, राजकीय संस्था / संघटनांची स्थापना आणि कार्ये यांचा आढावा घ्यावा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तीन ठळक कालखंड, त्यांतील महत्त्वाची अधिवेशने व ठराव, आंदोलने, त्यांचे स्वरूप व परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.

काँग्रेसच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, मवाळ व जहाल कालखंडाची तुलना, महत्त्वाचे नेते, महात्मा गांधीजींच्या कालखंडातील तीन महत्त्वाचे टप्पे व चळवळी, त्याला समांतर इतर राजकीय संघटनांच्या चळवळी, मागण्या, महत्त्वाचे नेते यांचा बारकाईने अभ्यास करायला हवा.

सशस्त्र / क्रांतिकारी चळवळींचे दोन कालखंड, त्यांतील महाराष्ट्र, पंजाब व बंगालमधील क्रांतिकारक, त्यांच्या संघटना, महत्त्वाच्या घडामोडी, दैनिके / नियतकालिके, पुस्तके यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील. यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीतील वैशिष्टय़पूर्ण बाबी समजून घ्याव्यात. उदाहरणार्थ साता-याचे ‘पत्री’ सरकार, नाटकांचा प्रचारासाठी उपयोग.

या कालखंडातील महाराष्ट्रातील नेते, घडामोडी, आंदोलने, राजकीय संस्था यांचा जास्त बारकाईने आढावा घ्यायला हवा. नागपूरचा झेंडा सत्याग्रह यांसारखे महाराष्ट्रातील वैशिष्टय़पूर्ण योगदान माहीत असायला हवे.

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास :

या विभागामधे घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलिनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका यांचा थोडक्यात आढावा घ्यायला हवा.

स्वतंत्र भारतातील महत्त्वाची आर्थिक व सामाजिक धोरणे, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील निर्णय, महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षी योजना / प्रकल्प (विशेषत: महाराष्ट्रातील) यांचा आढावा घ्यायला हवा.

या कालखंडातील महत्त्वाच्या राजकीय चळवळी, महत्त्वाच्या राजकीय पक्षांची स्थापना, वाटचाल समजून घ्यायला हवी.

पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, आणीबाणी या बाबींचा आढावा घ्यावा.

स्वातंत्रोत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळी महत्त्वाच्या ठरतात.

मराठी साहित्य संमेलने, भाषावार प्रांत रचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.

एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन:

देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पैलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान, असल्यास विवाद/लोकापवाद.

सामाजिक प्रबोधनाबरोबरच धार्मिक सुधारणांचाही यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

या विभागाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे इंडियाज स्गल फॉर इंडिपेन्डन्स हे पुस्तक अभ्यासोपयोगी आहे.

त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चर्चेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.

महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मुंबई प्रांतातील घडामोडी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठवाडा मुक्ति संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वतंत्र विदर्भाची मागणी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊन तयारी करायला हवी.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc mantra history of modern india of examinations of question papers analysis ysh