फारूक नाईकवाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारांना घटक विषयांचे पारंपरिक ज्ञान असणे आणि त्या त्या विषयाची समज असणे अपेक्षित असले तरी त्यापुढे जाऊन त्यांना आपल्या परिवेशाबाबत अद्ययावत माहिती असणे आणि तिच्याबाबत त्यांनी जागरूक असणेही आयोगाला अपेक्षित आहे. चालू घडामोडी या घटकाबाबत मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते की जागतिक आणि भारतातील चालू घडामोडी असे ढोबळ वर्गीकरण केलेले असले तरी या घटकामध्ये महाराष्ट्राशी संबंधित मुद्दय़ांवरही प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील मुद्दय़ांचा अभ्यास करताना त्याच्याशी समांतरपणे राज्यातील मुद्देही पहायला हवेत. उदाहरणार्थ राज्यस्तरावरचे विविध क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, संमेलने, शासकीय उपक्रम, व्यक्तिमत्वे इत्यादी.

जागतिक चालू घडामोडी

यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, विज्ञान, व्यक्तीविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.

विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत/ महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पहाव्यात.

चित्रपट, संगीत, पत्रकारीता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.

नैसर्गिक आपत्ती, वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक/ खगोलशास्त्रीय / लक्षणीय पर्यावरणीय घटना यांबाबत मूलभूत व संकल्पनात्मक माहिती करून घ्यावी.

खगोलशस्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्ययावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांवा आढावा घ्यावा.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, परिषदा त्यांमधील भारताची भूमिका, झालेले ठराव / निर्णय, व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यावा.

भारतातील चालू घडामोडी:

राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारीता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.

चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

भारताचे द्वीपक्षीय तसेच संघट्ना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पहायला हव्यात.

नैसर्गिक आपत्ती, वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक घटना, त्यांची वैशिष्टय़े समजून घ्यावीत.

आर्थिक विकास दर, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्देशांक, जनगणना, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.

विविध शासकीय योजना, त्यांच्या तरतुदी, लाभार्थी यांचा आढावा घ्यायला हवा.

अभ्यासासाठी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिका अभ्यासणे आवश्यक आहे. त्याकरता प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील बातमी आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ’माहिती’ यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.

बरेच वेळा एकाच मुद्दय़ाबाबतची/ घडामोडींची माहिती वेगवेगळय़ा दोन-तीन संदर्भ पुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो असा अनुभव येतो. त्यामुळे चालू घडामोडींच्या तयारीसाठी नेमका आणि खात्रीशीर पर्याय कोणता याबाबत उमेदवार गोंधळात असतात. यावर एखादे दुसरे गाईड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही. आणि माहितीस्त्रोत म्हणून एकाच संदर्भ पुस्तकाचा वापर करणे ही उपयोगाचे ठरत नाही. असा रट्टामारु अभ्यास करून स्पर्धेत टिकणे कठीण आहे हे जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की लक्षात येते. यासाठी इंग्रजी संदर्भ पुस्तके वापरणाऱ्या उमेदवारांनी इंडिया ईयर बुक, आर्थिक पाहणी अहवाल व अर्थ संकल्प यांची प्रत्यक्ष डॉक्युमेंट्स पहावीत. राज्याच्या अर्थ संकल्प व आर्थिक पाहणी अहवाल मराठी व इंग्रजीतून उपलब्ध होतो. नव्या योजना, कायदे यांचा अभ्यास करण्यासाठी योजनेची वेबसाईट व कायद्याची मूळ प्रत पहावी. बाजारात उपलब्ध स्त्रोतांमधून पुरस्कार, स्पर्धा, नवे शोध, संमेलने अशा पद्धतीची पूर्णत: वस्तुनिष्ठ मुद्दय़ांची तयारी होऊ शकेल. पण विश्लेषणात्मक मुद्दय़ांसाठी मूळ दस्तावेज, अधिकृत संकेतस्थळे यातून तयारी करणे जास्त उपयोगी ठरते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc mantra services main exam combined paper current affairs ysh
Show comments