मानवी हक्क घटकातील पारंपरिक आणि संकल्पनात्मक मुद्दे, आणि त्यांचे उपयोजन आणि विश्लेषण याबाबत आपण मागील लेखामध्ये पाहिले. अभ्यासक्रमामध्ये विविध व्यक्तिगटांचा उल्लेख आहे. या व्यक्तिगटांचे त्यांच्या आवश्यकता आणि परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर विशेष असे हक्क निर्माण होतात. त्यांच्या हक्कांचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत या लेखामध्ये पाहू.

अभ्यासक्रमामध्ये काही व्यक्तिगट स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. महिला, बालके, युवक, वृद्ध, अपंग व्यक्ति, सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, आदीम जमाती, कामगार, व आपत्तीग्रस्त/ प्रकल्पग्रस्त व्यक्ति असे हे व्यक्तिगट आहेत. या व्यक्तिगटांची वैशिष्ट्ये व त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, व्याख्या इत्यादी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर या व्यक्तिगटांच्या समस्यांचा मुद्देसूद अभ्यास सुरू करायला हवा.

या प्रत्येक व्यक्तिगटासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी प्रकारच्या समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रत्येक प्रकारासाठी समस्येचे स्वरुप, कारणे, परिणाम, उपाय, संबंधित संस्था, संघटना, आयोग, राबविण्यात येणाऱ्या योजना असे पैलू पहायला हवेत. समस्यांची कारणे व परिणामांबाबत अभ्यासक्रमाबाहेरचे आवश्यक वाचन स्वत:चे विश्लेषण, चिंतन असा अभ्यासाबाहेरचा अभ्यास आवश्यक आहे.

उपायांचा विचार करताना त्यात्या व्यक्तिगटांसाठी करण्यात आलेले विशेष कायदे, शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांचे प्रस्ताव तसेच घोषणा व करार यांचा समावेश करायला हवा. शासकीय योजनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत: शिफारस करणारा आयोग/ समिती, योजनेचा उद्देश, योजनेबाबतचा कायदा, पंचवार्षिक योजना, योजनेचा कालावधी, योजनेचे स्वरुप व बारकावे, लाभार्थ्यांचे निकष, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचे मूल्यमापन. मूळ कायदे वाचून त्यातील महत्त्वाच्या तरतूदींच्या नोट्स काढणे बहुविधानी प्रश्न सोडविण्यामध्ये उपयोगी ठरते. या पेपरमधील काही कायदे पेपर २ मध्येही समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचा एकत्रित अभ्यास उपयोगी ठरेल.

शासकीय उपाय तसेच भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था/ संघटनांचे कार्य हा पायाभूत अभ्यास झाला. या क्षेत्रातील ज्या अशासकीय संस्थांच्या कार्याबाबत राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा / उल्लेख होत असेल त्या संस्थांच्या कार्याची माहिती असणे आवश्यक आहे. मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित रास्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, त्यांचे स्वरूप, पुरस्कार मिळविणाज्या व्यक्ति / संस्था या बाबी पाहणेही आवश्यक आहे.

पेपर ४ मध्ये पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करताना या व्यक्तिगटांशी संबंधित कार्यक्रम, योजना किंवा धोरणाचा समावेश असेल तर त्या पंचवार्षिक योजनेचा संदर्भ देऊन त्या कार्यक्रम / योजना किंवा धोरणाचा त्यात्या व्यक्तिगटासाठीच्या नोट्समध्ये समावेश करावा.

सामाजिकदृष्टया मागासप्रवर्गांमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या/ विमुक्त जमाती (VJ/NT), इतर मागास प्रवर्ग (OBC) या सामाजिक घटकांचा स्वतंत्र व समांतरपणे अभ्यास आवश्यक आहे. या सामाजिक घटकांबाबत राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींचा नोट्समध्ये समावेश करावा व हे संदर्भ इतर विश्लेषणात्मक मुद्दयांचा अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवावेत. पूर्वी यामध्ये विशिष्ट वंचित प्रवर्गांचा स्पष्ट उल्लेख होता. आता हा उल्लेख काढण्यात आला आहे. त्यामुळे वंचित वर्ग म्हणून मान्यता मिळालेल्या सर्व वर्गांचा विचार करावा लागेल. सामाजिकदृष्ट्या वंचित असे शीर्षकात म्हटले असले तरी आर्थिदृष्ट्या मागास प्रवर्ग व राज्य आणि केंद्र शासनाच्या नियमांनुसार वंचित ठरवले गेलेले सर्व वर्ग विचारात घ्यावे लागतील. यामध्ये राज्य शासनाने घोषित केलेले विशेष मागास प्रवर्ग (SBC), आर्थिक व सामाजिक्दृष्ट्या मागास प्रवर्ग (ESBC/SEBC), केंद्र शासनाने घोषित केलेला आर्थिक मागास प्रवर्ग यांचा विचार करणे आवश्यक आहे. या मुद्याच्या अंतर्गत अल्पसंख्यांक समाजावरही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुठल्याही सामाजिक व्यक्तिगटामध्ये समाविष्ट नसलेला मात्र विशिष्ट हक्क असणारा एक गट म्हणजे ग्राहक. यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदींचा अभ्यास आवश्यक आहे. याकायद्याच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंच / संस्थांचा अभ्यास पुढील मुद्दयांच्या आधारे करावा : संस्थेतील विविध पातळया, प्रत्येक पातळीवरील मंचाची रचना, प्रत्येक पातळीवरील मंचाची कार्यपद्धती, प्रत्येक पातळीवरील मंचाचे अधिकार, जबाबदाऱ्या, कार्ये इत्यादी. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींचा अभ्यास पेपर २ मध्ये करण्यात आलेला असेलच. मात्र नोट्सचा वापर पेपर २ व ३ या दोन्हीसाठी करायला हवा. या संपूर्ण अभ्यासामध्ये प्रत्येक उपघटक / सामाजिक व्यक्तिगटाच्या हक्कांशी / गरजांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

steelframe. india@gmail. com