फारुक नाईकवाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनुष्यबळ विकासामधील महत्त्वाच्या संकल्पना आणि पारंपरिक मुद्दय़ांची तयारी कशी करावी याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. आरोग्य हा मनुष्यबळ विकासाचा जैविक आयाम आहे, ग्रामीण विकास हा यातील भौतिक पैलू आहे तर शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हा मूल्यात्मक आणि कौशल्यविषयक आयाम आहे. यातील शिक्षण या उपघटकाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

शिक्षण संकल्पनात्मक आयाम

सामाजिक बदनाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार करताना मूल्ये व नीतितत्त्वे जोपासण्यामध्ये शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ मनुष्यबळ विकासच नव्हे तर मानवी हक्कांची अंमलबजावणी ही शिक्षणाच्या माध्यमातून होते. या बाबत चिंतन व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.

हेही वाचा >>> महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, २७ सप्टेंबरपर्यंत करु शकता अर्ज

भारतातील शिक्षण प्रणाली

भारतातील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करताना याबाबत विविध आयोगांच्या शिफारसी व त्याप्रमाणे शिक्षण प्रणालीमध्ये करण्यात आलेले बदल यांची व्यवस्थित नोंद घ्यायला हवी. शासनाच्या आजवरच्या सर्व शैक्षणिक धोरणांचा आढावा घेणे आवश्यक आहे. पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण स्तरापर्यंतच्या प्रवेश, प्रवेश परीक्षा, कालावधी, परीक्षा पद्धती याबाबत मागील दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेले शासकीय निर्णय माहीत असायला हवेत. यासाठीचे महत्त्वाचे जुने कार्यक्रम व योजना माहीत असायला हव्यात.

शिक्षणाचा हक्क-२००९ मधील तरतुदी, अमलबजावणी यंत्रणा, लाभार्थ्यांचे निकष इ. मुद्दे अभ्यासायला हवेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ मधील उद्दिष्टे, तरतुदी माहीत असायला हव्यात.

व्यक्तिगटांचे शिक्षण

वेगवेगळय़ा व्यक्तिगटांच्या शिक्षणविषयक समस्या ‘मानवी हक्क’ घटकाचा अभ्यास करतानासुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. महिला, अपंग, सामाजिकदृष्टय़ा व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक व आदीम जमाती यांच्या शिक्षणामधील समस्या, त्यांची कारणे, त्यांच्याबाबत असल्यास घटनात्मक तरतुदी, आरक्षणे, शासकीय योजना व त्यांचे मूल्यमापन असा सर्व मुद्दय़ांचा संकल्पना व तथ्यांच्या विश्लेषणातून अभ्यास आवश्यक आहे.

शिक्षणापासून वंचित राहिल्यास या विशिष्ट वर्गावर होणारे परिणामसुद्धा पहाणे आवश्यक आहे. याबाबत सध्या बऱ्याच घडामोडी, निर्णय अशा घडामोडी घडत आहेत, त्यांचा नेमका आणि सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : सुशासनासाठीच्या शासकीय उपाय योजना

शिक्षण पद्धती किंवा प्रकार

औपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. अनौपचारिक व प्रौढ शिक्षणाची गरज, स्वरूप, परिणाम, समस्या व उपाय इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबतच्या विविध योजना व संस्थांचा आढावा घ्यायला हवा.

पारंपरिक व व्यावसायिक शिक्षणामधील फरक समजून घ्यायला हवा. पारंपरिक व पायाभूत शिक्षण हे मूल्य व नीतितत्त्वाची जोपासणी, मानवी हक्कांची अंमलबजावणी आणि पायाभूत कौशल्य व अभिवृत्तीचा विकास यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या प्राथमिक व पायाभूत शिक्षणाची पुढची पायरी म्हणून पारंपरिक महाविद्यालयीन किंवा तांत्रिक/ वैद्यकीय / व्यावयायिक शिक्षणाचा मार्ग खुला होतो. या बाबी लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षण या घटकाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात कोणत्या शैक्षणिक टप्प्यापासून होते हे लक्षात घ्यायला हवे. यातील विविध प्रकारचे अभ्यासक्रम प्रशिक्षण माहिती करून घ्यावेत, त्यांचे स्वरूप समजून घ्यायला हवेत. यामध्ये प्रवेशासाठीची पात्रता वयोमर्यादा शिक्षणाचा / प्रशिक्षणाचा कालावधी व रोजगाराची उपलब्धता व स्वरूप अशा मुद्दय़ांचा विचार करायला हवा.

प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीमधील समस्या

गळती, दर्जा, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादींचे स्वरूप, कारणे, परिणाम व उपायांचा अभ्यास गरजेचा आहे. शिक्षणाचे व्यावसायिकरण हा शिक्षाणावर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही पद्धतीने परिणाम करणारा मुद्दा आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम समजून घेणे आणि

नकारात्मक परिणामांची कारणे, स्वरूप, समस्या, संभाव्य उपाय हे मुद्दे पहायला हवेत.

शिक्षाणाचे सार्वत्रिकीकरण ही समस्या न समजता आव्हान समजायला हवे. त्याची आवश्यकता, उद्दिष्ट गाठण्यात येणारे अडथळे, त्यासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत. सर्व शिक्षा अभियान, उच्चतर शिक्षा अभियान यासहित शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी शासकीय उपक्रम माहीत करून घ्यावेत. यातील तरतुदी माहीत असाव्यात.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : पर्वत म्हणजे काय? पर्वतांचे प्रकार कोणते?

शिक्षण पद्धतीवर परिणाम करणारे घटक

जागतिकीकरण व खासगीकरणाचे शिक्षण पद्धतीवरील सकारात्मक व नकारात्मक परिणाम समजून घ्यायला हवेत. यासाठी वृत्तपत्रे टीव्ही, इंटरनेट इत्यादीमधील चर्चा उपयोगी ठरतील. करोना काळामध्ये वर्षभरापासून शाळांमध्ये ई प्लॅटफाम्र्सवरूनच अध्यापन सुरू आहे. त्यामुळे ई-अध्ययन ही संकल्पना सध्या काही वर्षे ‘IMP’ यादीमध्ये ठेवून अभ्यासायला हवी. ई-अध्ययन उपलब्ध करुन देणाऱ्या संस्था माहीत असाव्यात. तसेच या शिक्षणपद्धतीचे फायदे व तोटे समजून घ्यायला हवेत. इ अध्ययनाबाबतच्या विविध शासकीय योजना, अ‍ॅप्स, संकेतस्थळे आणि त्यांचे स्वरूप, स्कोप यांचा व्यवस्थित आढावा घ्यायला हवा.

शिक्षण विषयक संस्था

राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी या अभ्यासक्रमात उल्लेख असलेल्या संस्थांबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय मानांकन संस्था, एकत्रित प्रवेश परीक्षेसाठी स्थापित राष्ट्रीय परीक्षा संस्था (National Test Agency) अशा शिक्षण क्षेत्रातील आयोग, संस्थांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल: स्थापनेची पाश्र्वभूमी, शिफारस करणारा आयोग/समिती, स्थापनेचा उद्देश,  बोधवाक्य/ बोधचिन्ह, मुख्यालय, रचना, कार्यपद्धत, जबाबदाऱ्या, अधिकार, नियंत्रण करणारे विभाग, खर्चाची विभागणी, वाटचाल, इतर आनुषंगिक मुद्दे

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc preparation tips in marathi mpsc study in marathi mpsc preparation strategy in marathi zws