Mrinal Kutteri Study Tips : प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT)चे प्रवेशद्वार असलेली संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) ही भारतातील आणि अगदी जागतिक स्तरावरील सर्वांत कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशभरातील हजारो विद्यार्थी जेईई मेन (JEE Main) आणि जेईई ॲडव्हान्स (JEE Advanced) अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयआयटीमध्ये जागा मिळवण्याची आकांक्षा मनाशी बाळगतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलू ज्याने केवळ राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण केली नाही, तर आयआयटी-जेईईदेखील उत्तीर्ण होऊन दाखवले.
मृणाल कुट्टेरी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृणाल कुट्टेरी हैदराबादचा रहिवासी आहे. मृणाल कुट्टेरी त्याचे आईवडील, धाकटा भाऊ व आजी-आजोबा यांच्याबरोबर राहतो. त्यांचे कुटुंब मूळचे केरळचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही डॉक्टर नाही, ज्यामुळे त्याचा प्रवास अधिकच वेगळा ठरतो.
मृणालला आठवी – नववीपासून जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत खूप रस निर्माण झाला होता. अकरावीत असतानाच त्याने नीट परीक्षेची तयारी सुरू केली. २०२१ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मृणालने सांगितले की, मला सुरुवातीला लष्करात डॉक्टर व्हायचे होते आणि वैद्यकीय, साहसी जीवन जगायचे होते. पण, हळूहळू त्यांना औषधात रस निर्माण झाला. तसेच कोविड काळात जगभरातील डॉक्टरांना बघून त्याला आणखीन प्रेरणा आली.
कोविड-१९ महामारीच्या काळात, ऑफलाइन अभ्यासाऐवजी ऑनलाइन अभ्यासाकडे वळल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवांवर परिणाम झाला. सुरुवातीला मृणालला हा बदल आवडला. लॉकडाऊन सुरू झाल्यावर सुरुवातीला त्याला भरपूर मोकळा वेळ मिळाला, ज्यामुळे त्याला अभ्यासापेक्षा त्याच्या आवडींना प्राधान्य देता आले.
पण, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे तो अभ्यासाच्या पद्धतींचे काटेकोरपणे पालन करत नव्हता. वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याऐवजी, तो अभ्यासासाठी लवचिक दृष्टिकोनाला प्राधान्य देत होता. कारण – कठोर वेळापत्रक बनवल्यास ते पाळणे कठीण होईल आणि ते पाळण्याचा अट्टहासाने प्रयत्न करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होईल, असे त्याला वाटत होते.
चार ते पाच तासांपेक्षा जास्त अभ्यास केला नाही (Mrinal Kutteri Study Tips) :
२०२१ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मृणालने सांगितले की, त्याने एक फ्री फॉर्म आणि फ्लेक्सिबल पॅटर्न अभ्यासासाठी निवडला. प्रत्येक दिवसासाठी एक ध्येय ठेवले. असे बरेचदा झाले, जेव्हा तो ठरविलेले ध्येय साध्य करू शकला नाही. पण, त्यामुळे त्याला कोणताच खेद वाटत नव्हता. उलट फ्री फॉर्म पॅटर्नची त्याला अभ्यासात प्रचंड मदत झाली. मृणालने असा दावा केला की, अनेकदा तो दररोज चार तास अभ्यास करायचा आणि इतर प्रॉडक्टिव्ह दिवसांमध्ये त्याने पाच तास अभ्यास केला. पण, त्याने त्यापेक्षा कधीच जास्त अभ्यास केला नाही.
त्याने JEE मुख्य परीक्षेत ९९.९ टक्के, तर NEET २०२१ परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले आणि ऑल इंडिया रँक १ प्राप्त केली.