Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप दिवसेंदिवस लांबत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील सर्वच सरकारी सेवांवर होत आहे. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णसेवेला बसत आहे. त्यामुळे संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नयेत आणि रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कक्ष सेवक, शिपाई, सफाई कामगार यांची कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली आहे. भरती संदर्भातील अधिकची माहीती जाणून घेऊया.
हेही वाचा- नव्या चॅटबॉटमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात? या ‘२०’ क्षेत्रांमध्ये AI घेऊ शकतो माणसांची जागा
जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एकमत होत नसल्याने संप लांबला आहे. या संपाचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. संपाच्या सुरुवातील जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये (J.J. Hospital, G.T. Hospital, Kama Hospital and St. George’s Hospital) मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी, परिचारिका आणि शिकाऊ परिचारिकाची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय जे कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत त्या कामगारांच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरविण्यावर भर देण्यात येत होता.
पण दिवसेंदिवस संप लांबत असल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवेवर खूप ताण येत आहे. यासाठीच आता कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी लवकरच जे.जे. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी.टी. रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जाणार आहे. या भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
या पदांसाठी भरती –
- रुग्णालयातील कक्ष सेवक
- आया
- सफाई कामगार आणि शिपाई
वरील पदांच्या जागांसाठी भरती करणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे. संप चिघळल्यास रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता आहे. रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पण ही भरती सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच केली जाणार आहे. त्यामुळे त्याला काही अवधी लागण्याची शक्यता असल्याचंही डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं.