Essential Skills For Job Interview : हल्ली नोकरी शोधणे, ही तरुणाईपुढे खूप मोठे आव्हान आहे. नोकरी क्षेत्रात दरदिवशी स्पर्धा वाढताना दिसत आहे. आकडेवारीनुसार एखाद्या कॉर्पोरेट नोकरीसाठी जवळपास २५० रेज्युमे आले तर त्यापैकी दोन टक्के उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाते. जर तुमच्यामध्ये काही चांगली कौशल्ये असेल तर तुम्हाला नोकरी मिळविणे, तुमच्यासाठी सोपी जाते. आज आपण याच कौशल्यांविषयी जाणून घेणार आहोत.
संवाद कौशल्य
संवाद हा आयुष्यातील महत्त्वाचा पैलू आहे. मुलाखतीमध्ये संवाद हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. स्पष्ट विचार मांडण्याची तुमची क्षमता, मुलाखतकाराचे ऐकण्याची वृत्ती यावरून तुमचे संवाद कौशल्य दिसून येते. यासाठी आत्मविश्वासाने बोला आणि आय कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. देहबोलीकडे लक्ष द्या कारण याद्वारे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो.
ऐकून घेणे
मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराचे प्रश्न आणि टिप्पण्या ऐकून घेणे, हा एक उत्तम प्रतिसाद आहे. याद्वारे तुमचा स्वारस्य आणि वैचारिक दृष्टीकोन दिसून येतो. ऐकून घेण्याची तुमची वृत्ती तुमच्यातील समंजसपणा दाखवते आणि संबंध निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा मुलाखतकार प्रश्न विचारतो तेव्हा नीट ऐकून घ्या आणि उत्तर देण्याआधी त्यांनी विचारलेला प्रश्न समजून घ्या. मित्र, सहकारी किंवा मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधून ऐकण्याचे कौशल्य विकसित करा.
समस्या सोडविण्याची आणि गंभीर विचार करण्याची क्षमता
मुलाखतकार अशा उमेदवाराला नियुक्त करतो ज्याच्याकडे कोणतीही समस्या सोडविण्याची आणि गंभीर विचार करण्याची क्षमता आहे. मुलाखतकार अनेकदा गंभीर परिस्थितीचे वर्णन करतात आणि उमेदवाराला समस्या सोडविण्यास सांगतात. तुम्ही ज्या समस्यांवर मात केली त्याविषयी सांगा. तुमच्या अनुभवातून तुम्ही कोणतीही समस्या सोडवू शकता आणि कोणत्याही गंभीर परिस्थितीत विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे, हे तुम्ही मुलाखतीदरम्यान सांगितले पाहिजे. या साठी कोडे, ऑप्टिकल इल्युजन सोडवण्याचा प्रयत्न करा,याद्वारे तुमची बुद्धिमत्ता वाढते.
लवचिकता आणि अनुकूलता
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कामाच्या ठिकाणी लवचिकता आणि अनुकूलता असणे आवश्यक आहे. जर तुमच्या कडे ही दोन कौशल्ये असेल तर तुम्ही कंपनीबरोबर स्वत:चा सुद्धा विकास करू शकता. कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची क्षमता आणि कामाच्या स्वरूपानुसार बदल घडवून आणणे खूप गरजेचे आहे.
नेतृत्व आणि टीमवर्क
कोणतीही कंपनी अशा उमेदवाराला महत्त्व देतात ज्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि जो सहकाऱ्यांना घेऊन काम करू शकतो. त्यासाठी तुमचा नेतृत्व गुण हायलाइट करा. तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स आणि तुम्ही सहकाऱ्यांना केलेले मार्गदर्शन, याविषयी बोला. टीमधील सहकाऱ्यांना काम करण्यास प्रेरित करणे, त्यांच्याबरोबर चर्चा करणे इत्यादी कौशल्यांविषयी बोला. यामुळे टीममध्ये काम करण्याची आणि नेतृत्व सांभाळण्याची तुमची क्षमता दिसून येईल.
मुलाखतीत पास व्हायचं असेल तर वरील कौशल्यांवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. संवाद, ऐकण्याची क्षमता विकसित करून , विचारशक्ती आणि समस्या सोडविण्याचे कौशल्यांवर भर द्या. कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी आणि बुद्धिमता तसेच नेतृ्त्वगुण असेल तर तुम्हाला मुलाखतीत यश मिळू शकते.