भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने १९५५ साली पुण्यात खडकवासला येथे एन डी ए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. बारावीनंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी एन डी ए तसेच नेव्हल अॅकेडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी चारशे विद्यार्थ्यांची (३७० मुले , ३० मुली) संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुढील प्रवेश परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून त्यासाठीची जाहिरात १५ मे रोजी upsc. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ज्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींची जन्मतारीख २ जानेवारी २००६ आणि १ जानेवारी २००९ या दरम्यान असेल त्यांना ४ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने upsconline. nic. in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्रे, शारीरिक तंदुरुस्तीचे निकष या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे. इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शारीरिक तंदुरुस्ती निकषांमध्ये आपण बसतो की नाही याची खातरजमा करूनच अर्ज भरावेत जेणेकरून नंतर निराशा होणार नाही.
हेही वाचा >>> UPSC ची तयारी : मुख्य परीक्षा: इतिहास
या प्रवेशासाठी ची लेखी परीक्षा ऑब्जेक्टीव्ह स्वरुपाची असते, ज्यामध्ये अडीच तासांचे दोन पेपर असतात. पहिला पेपर गणिताचा तीनशे मार्कांचा असतो दुसरा पेपर जनरल ? बिलिटी चा सहाशे मार्कांचा असतो. या दुसऱ्या पेपरमध्ये दोनशे गुणांचा इंग्रजी चा तर चारशे गुणांचा फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. परीक्षेनंतर साधारण तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो, जो upsc. gov. in या संकेतस्थळावर बघता येतो. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत एस एस बी इंटरव्ह्यू साठी बोलावले जाते. हा इंटरव्ह्यू प्रदीर्घ म्हणजे पाच दिवस चालतो ज्यात दोन टप्पे असतात. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा कस लागतो. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्याकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंतर त्यांच्या क्षेत्रात ( आर्मी /नेव्ही / एअरफोर्स ) त्यांना पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेत अधिकारी म्हणून एक लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येते. एन डी ए चे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते.