Success Story of Prince Chaudhary: कठोर परिश्रम आणि जिद्द यांच्या बळावर प्रिन्स चौधरी या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. राजस्थानमधील बाडमेर या सीमावर्ती जिल्ह्यातील धोरिमाना या छोट्याशा गावातील प्रिन्सचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), दिल्ली येथून शिक्षण घ्यायचे, असे स्वप्न होते.
हिंदी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेल्या प्रिन्सने २०१८ मध्ये NEET परीक्षेत ५ वा क्रमांक मिळवून यशाच्या मार्गात भाषा किंवा संसाधने कधीही अडथळा ठरू शकत नाहीत हे सिद्ध केले.
सुरुवातीपासून केले कठोर परिश्रम
प्रिन्सचे वडील रामाराम गावात मेडिकल स्टोअर चालवतात आणि आई गृहिणी आहे. मर्यादित संसाधने असूनही त्याने लहानपणापासूनच अभ्यासात समर्पण दाखवले. प्रिन्सने दहावीमध्ये ९४.१७.% आणि बारावीमध्ये ९३.६% गुण मिळवून आपला शैक्षणिक पाया मजबूत असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर कोटामध्ये कोचिंगदरम्यान तो अभ्यासासाठी दररोज सहा तास द्यायचा. त्याच्या तयारीचा मूळ मंत्र दररोज नोट्स बनवणे, उजळणी करणे आणि दररोज दिला गेलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा होता.
NEET मध्ये मोठी कामगिरी (NEET Topper Prince Chaudhary)
NEET सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे ही खूप दुर्लभ गोष्ट आहे; पण हिंदी माध्यमातील प्रिन्स या विद्यार्थ्याने या परीक्षेत ७२० पैकी ६८६ गुण मिळवीत पाचवा क्रमांक पटकावला. त्याने शिस्त, समर्पण व नियमित अभ्यासाद्वारे यशाचे हे इतरांना दुष्प्राप्य वाटणारे कठीण वाटणारे फळ मिळवून दाखवले. त्याच्या यशाची ही कहाणी त्या लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे; ज्यांना वाटते की, मर्यादित साधनांसह महान गोष्टी साध्य करणे कठीण आहे.
एम्समधून एमबीबीएसचा अभ्यास
प्रिन्सचे स्वप्न दिल्लीच्या एम्समधून एमबीबीएस करण्याचे होते. हे स्वप्न त्याने आपल्या मेहनतीने आणि यशाने पूर्ण केले. प्रिन्सची ही कथा यशासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देते की, कठीण परिस्थितीतही योग्य दिशेने मेहनत केली, तर यश निश्चित मिळू शकते. मर्यादित संसाधने आणि ग्रामीण पार्श्वभूमी असूनही प्रिन्सने हे सिद्ध केले की, प्रत्येक आव्हान समर्पण आणि कठोर परिश्रमाने पार केले जाऊ शकते.