NEET UG 2024: नीट यूजी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांचा मंगळवारी (४ जून २०२४) रोजी नीट यूजी-२०२४ (NEET UG 2024) चा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण, नीट यूजी-२०२४ या निकालात परफेक्ट स्कोअर (७२०/७२०) मिळवलेल्या ६७ उमेदवारांपैकी तब्बल ४४ जण टॉपर्स झाले. कारण त्यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नाचे एक उत्तर चुकीचे मिळाले, ज्यामुळे त्यांना ‘ग्रेस मार्क्स’ मिळाले. यामागचे कारण म्हणजे ते उत्तर त्यांच्या इयत्ता १२वीच्या NCERT विज्ञानाच्या पुस्तकातील चुकीच्या संदर्भावर आधारित होते.

२०१९ पासून नीट यूजीच्या कोणत्याही वर्षात तीनहून अधिक टॉपर्स आले नव्हते, २०१९ आणि २०२० मध्ये या परीक्षेत केवळ प्रत्येकी एक टॉपर होता. २०२१ मध्ये तीन टॉपर होते, २०२२ मध्येदेखील एक टॉपर होता; तर २०२३ मध्ये दोन टॉपर्स होते. दरम्यान, आता यावर्षीच्या परीक्षेत आलेल्या चुकीच्या उत्तरामुळे या यादीत तब्बल ४४ जणांचा टॉपर्स म्हणून समावेश झाला.

२९ मे रोजी एनटीएने आपली तात्पुरती उत्तर की जारी केली होती, ज्यात पर्याय एकचे उत्तर बरोबर असल्याचे दाखवण्यात आले होते. परंतु, १०,००० हून अधिक उमेदवारांनी उत्तर कीवर प्रश्न उपस्थित करत ते इयत्ता १२वीच्या NCERT पाठ्यपुस्तकाच्या जुन्या आवृत्तीत चुकीचे असल्याचे म्हटले.

एनटीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही सर्व उमेदवारांना त्यांच्या नीटच्या तयारीसाठी फक्त NCERT पाठ्यपुस्तकांमधूनच अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आम्ही त्या सर्व उमेदवारांना श्रेय देण्याचे ठरवले आहे, ज्यांनी उत्तर म्हणून तिसरा पर्याय निवडला आहे. या निर्णयामुळे ४४ उमेदवारांचे गुण ७१५ वरून ७२० झाले, ज्यामुळे ते यावर्षी नीट यूजी-२०२४ च्या टॉपर्सच्या यादीत आहेत.

हेही वाचा: Success Story: हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी ते करोडोंचा व्यवसाय उभा करण्यापर्यंतचा जयराम बनन यांचा प्रेरणादायी प्रवास

एनटीएच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आपल्याकडे वर्षानुवर्षे मोठी भावंडं त्यांच्या लहान भावंडांना त्यांची पुस्तके देतात. यात काहीच गैर नाही, आम्हीदेखील या सगळ्यातून गेलो आहोत. आम्ही एनटीए विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके खरेदी करण्यास सांगू शकत नाही, कारण हे प्रत्येकासाठी शक्य नाही. म्हणून आम्ही एक बैठक घेऊ आणि अशा परिस्थितीसाठी योग्य प्रोटोकॉल निश्चित करू.”