अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये मात्र ‘कर्पूरी जन्मशताब्दी सोहळ्या’ची चर्चा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २२ ते २४ जानेवारीदरम्यान समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या अंतर्गतच २४ जानेवारी रोजी पाटणा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नितीश कुमार नेमके काय बोलतात? ते काही मोठ्या घोषणा करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कसा असेल हा ‘कर्पूरी जन्मशताब्दी सोहळा’? :
२०२४ हे कर्पूरी ठाकूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. दरवर्षी २२ जानेवारी रोजी कर्पूरी ठाकूर यांच्या कर्पूरी ग्राम म्हणजेच पिताउंढिया या गावी त्यांची जयंती साजरी केली जाते. मात्र, यंदा या गावात २२ ते २४ जानेवारी असे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना राजकीय नेते, समाजवादी विचारवंत आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला राज्यातील सर्वच आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
त्याशिवाय २३ जानेवारी रोजी राज्य सरकारद्वारे संचालित जगजीवन राम इन्स्टिट्यूट ऑफ पार्लमेंटरी स्टडीज अॅण्ड पॉलिटिकल रिसर्च यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या जीवनावर आधारित दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. तसेच २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार कर्पूरी गावाला भेट देतील. याच दिवशी पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘मोदी की गॅरंटी’ चा दहा वेळा उल्लेख करीत मोदी यांची मतदारांना सोलापूरमध्ये भावनिक साद
राजकीय पक्षांकडून कर्पूरींचा वारसा चालवत असल्याचा दावा :
दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जाते. देशातील अतिमागास (EBC) आणि इतर मागासवर्गीयांना (OBC) मिळालेल्या आरक्षणाचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. १९७८ साली मुख्यमंत्री असताना भारतीय जनसंघाच्या विरोधाला न जुमानता, त्यांनी राज्यात २६ टक्के आरक्षणाची तरतूद केली. यामध्ये अतिमागास वर्गाला १२ टक्के, इतर मागासवर्गीयांना आठ टक्के, महिलांना तीन टक्के आणि उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या तीन टक्के आरक्षणाचा समावेश होता. पुढे १९८८ मध्ये त्यांचे निधन झाले.
कर्पूरी ठाकूर हे जयप्रकाश नारायण आणि राममनोहर लोहिया यांच्यानंतर मोठे समाजवादी नेते म्हणून उदयास आले. ज्यावेळी तत्कालीन व्ही. पी. सिंग सरकारने १९९० मध्ये मंडळ आयोगाचा अहवाल लागू करण्याची घोषणा केली, त्यावेळी कर्पूरी ठाकूर यांचे महत्त्व आणखी वाढले. मागासवर्गीयांमध्ये कर्पूरी ठाकूर यांना मानले जाऊ लागले. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी भाजपासह सर्वच राजकीय पक्षांकडून आपण कर्पूरी ठाकूर यांचा वारसा चालवत असल्याचा दावा केला जातो.
हेही वाचा – हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का, महत्त्वाच्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; लवकरच भाजपात प्रवेश करणार!
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये जातीआधारित सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणानुसार बिहारमध्ये मागासवर्गीयांची संख्या ३६.०१ टक्के इतकी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेडीयूसह सर्वच राजकीय पक्षांकडून मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात बोलताना, जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी म्हणाले, “कर्पूरी ठाकूर आणि नितीश कुमार यांच्या राजकारणात समानता आहे. कर्पूरी ठाकूर यांच्याप्रमाणेच नितीश कुमारही सर्वसमावेशक राजकारण करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना देण्यात आलेले ५० टक्के आरक्षण, मुलींचे माफ केलेल शैक्षणिक शुल्क, बिहारमध्ये लागू केलेली दारूबंदी यावरून नितीश कुमार हे कर्पूरी ठाकूर यांचा वारसा चालवीत असल्याचे दिसून येते. कर्पूरी ठाकूर यांची विचारधारा ही जेडी(यू)च्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. एकीकडे भाजपाकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे; तर दुसरीकडे भाजपाच्या राजकारणाला शह देण्यासाठी जेडीयूकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी अद्यापही राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.