प्रा. रवींद्र कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘आज कोणत्या विषयाची चर्चा करू या असं तुम्हाला वाटतं?’’ नेहमी प्रश्नांची उत्तरे देत असलेल्या प्राध्यापक रमेश सरांनी सर्वाना प्रश्न केला. प्रा. गोकूळ म्हणाले, ‘‘सर, आतापर्यंत तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामधून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे,  NEP ने दिलेल्या अभ्यासक्रमाच्या लवचिक चौकटीमधून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ऑनलाइन, ऑफलाइन, मुक्त व दूरस्थ शिक्षण किंवा हायब्रिड अशा विविध पद्धती स्वीकारता येतील; तशी लवचिकता या धोरणात आहे. यासंदर्भातील नेमक्या नियमांविषयी तुम्ही काही सांगू शकाल का?’’

प्रा. रमेश म्हणाले, ‘‘हो नक्कीच. या संदर्भात NEP मधे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मुक्त व दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीचं शिक्षण घेणं हा NEP च्या कलम १२.५ नुसार अध्ययनाचा एक नैसर्गिक मार्ग आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी, अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेल्या मानकांचे पालन करताना विद्यापीठे/ उच्च शिक्षण संस्थांनी, ठोस पुराव्यावर आधारित प्रयत्नांद्वारे मुक्त व दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणामधील सकारात्मक संभाव्यतांचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी एखाद्या नियमित वर्गात दिल्या जात असलेल्या दर्जेदार शिक्षणाइतकेच ऑनलाइन पद्धतीने दिले जाणारे शिक्षण तितकेच दर्जेदार असेल हे देखील पाहिले पाहिजे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (मुक्त व दूरस्थ अभ्यासक्रम आणि ऑनलाइन अभ्यासक्रम – ODL पद्धत) नियमावली- २०२० नुसार पदविका, पदवी, आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रदान करण्यासाठी काही मानके निश्चित केलेली आहेत.  ODL पद्धत ही विविध माध्यमांचा वापर करून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधे असलेल्या भौगोलिक अंतरावर मात करून लवचिक अशा अध्ययन-अध्यापनाच्या संधी प्रदान करते.’’

हेही वाचा >>> नोकरीची संधी

प्रा. सुनील म्हणाले, ‘‘म्हणजे सर, यामधे विविध प्रकारची डिजिटल सेवा व माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वेगवेगळय़ा विद्यार्थी साहाय्यक सेवा, ऑनलाइन अध्ययन-अध्यापनाबरोबरच विद्यार्थी-शिक्षक यांच्यामधील अधून-मधून घडणाऱ्या प्रत्यक्ष भेटींचा, प्रात्यक्षिकांचा किंवा कार्यानुभवाचा ODL पद्धतीत समावेश करता येईल. याबरोबरीनेच ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणामध्ये ई-लर्निग मटेरिअल्स, तंत्रज्ञान साहाय्यक यंत्रणा आणि संसाधने वापरून इंटरनेटद्वारे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची लवचिकताही दिलेली आहे.’’ रमेश सर समाधानाने म्हणाले, ‘‘वा, तुमच्या लक्षात नेमका मुद्दा आलाय.’’

रमेश सर पुढे सांगू लागले, ‘‘आता  SWAYAM ची एक महत्त्वाची भूमिका आहे, ती लक्षात घ्या.’’ मयुरानं विचारलं, ‘‘सर,  SWAYAM म्हणजे स्टडी वेब्स ऑफ अ‍ॅक्टीव्ह- लर्निग फॉर यंग अस्पायारिंग माईंड्स ना?’’

रमेश सरांनी त्याला दुजोरा दिला, ‘‘बरोबर!  SWAYAM ची फार मोठी भूमिका आहे. याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आठवत असेल की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (SWAYAM द्वारे ऑनलाइन अध्ययनासाठी श्रेयांक रचना) अधिनियमानुसार एखाद्या अभ्यासक्रमातील एका सत्रासाठी एकूण अभ्यासक्रमाच्या चाळीस टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने करता येणे शक्य आहे.  SWAYAM चे चार वैशिष्टय़पूर्ण भाग सांगता येतील

१) एका संघटित स्वरूपात निर्माण केलेली दृक् श्राव्य अभ्यास सामग्री, अ‍ॅनिमेशन, सिम्युलेशन, आभासी प्रयोगशाळा यांच्या साहाय्याने तयार केलेली टय़ूटोरिअल्स

२) ई-पुस्तके किंवा शब्दकोष, केस स्टडी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न व्हिडीओ लेक्चर्सचे ट्रान्सक्रिप्शन आणि डाउनलोड/मुद्रित केले जाऊ शकणारे इतर कोणतेही खास तयार केलेले वाचन किंवा अभ्यास साहित्य असलेली ई-सामग्री

३) अभ्यासक्रम-संयोजकांच्या व अन्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला विद्यार्थ्यांच्या मनातील विविध समस्या, शंका, मते आणि टिप्पण्या यांच्या चर्चेसाठी निर्माण झालेला चर्चा मंच

४) बहुपर्यायी प्रश्न, समस्या, प्रश्नमंजुषा, असाइनमेंट आणि निराकरणे इत्यादींचा समावेश असलेली स्वयं-मूल्यमापन यंत्रणा’’

रमेश सर पुढे सांगू लागले, ‘‘तुम्हाला  SWAYAM द्वारे तयार केलेल्या श्रेयांकाधारित अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकाची सांगड पारंपरिक अभ्यासक्रमांच्या सत्रांबरोबर घालता येणं शक्य आहे. विद्यापीठांची किंवा स्वायत्त उच्च शिक्षण संस्थांची शैक्षणिक परिषद ही विभागप्रमुख/ अध्यक्ष, अभ्यास मंडळ आणि संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम आराखडय़ाचा एक भाग म्हणून SWAYAM प्लॅटफॉर्मच्या ऑनलाइन श्रेयांक अभ्यासक्रमांच्या निवडीला मान्यता देऊ शकेल.’’

हेही वाचा >>> एमपीएससी मंत्र : भाषा घटकाची तयारी

प्रा. महेश यांनी प्रश्न केला, ‘‘सर, मोठय़ा प्रमाणात  SWAYAM द्वारे ऑनलाइन व खुल्या पद्धतीने चालणाऱ्या या अभ्यासक्रमांचे मूल्यमापन आणि प्रमाणन कसं केलं जाईल? एखाद्या विद्यार्थ्यांने  SWAYAM वर मिळवलेल्या श्रेयांकांचे, त्याच्या पालक उच्च शिक्षण संस्थेकडे कशा पद्धतीने हस्तांतरण केले जाईल, या प्रक्रियेवर कसे लक्ष ठेवता येईल?’’

रमेश सरांनी उत्तर दिले, ‘‘महेश सर, यासाठी एक सुनिश्चित प्रक्रिया ठरवून दिलेली आहे. UGC ( SWAYAM द्वारे ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक आराखडा) नियमावली, २०२१ नुसार या प्रक्रियेत सात महत्त्वाचे मुद्दे आहेत:

१) SWAYAM प्लॅटफॉर्मवर ऑफर केलेल्या क्रेडिट-आधारित MOOC साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी  HEI आणि अभ्यासक्रम-संयोजक जबाबदार असतील.

२) अभ्यासक्रमाचे अंतिम मूल्यमापन हे अंतर्गत मूल्यमापन आणि सेमिस्टर समाप्ती परीक्षा व्यतिरिक्त अंतर्गत मूल्यांकन चर्चा मंच, प्रश्नमंजुषा, असाइनमेंट, सत्रांत परीक्षा आणि संपूर्ण मूल्यमापन योजना (जास्तीत जास्त ३० टक्के गुण) यासारख्या साधनांवर आधारित असेल. अभ्यासक्रमाच्या प्रारंभीच मूल्यमापन पद्धतीचं सविस्तर आकलन विद्यार्थ्यांना करून दिलं जाईल.

३) सत्राच्या शेवटी ऑनलाइन परीक्षेला प्राधान्य दिले जाईल, परंतु अभ्यासक्रम-समन्वयक अंतिम परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतीवर: ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष लेखनाद्वारे परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेण्यासाठीचा सक्षम अधिकारी असेल. अर्थात अभ्यासक्रम समन्वयकाने यासंबंधीची सूचना प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांना देणे आवश्यक राहील.

४) SWAYAM आधारित श्रेयांक अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी सत्रांत परीक्षा ही संपूर्ण देखरेखीखाली (proctored examination) एकतर SWAYAM बोर्डाद्वारे किंवा शिक्षण मंत्रालयाद्वारे भारत सरकारच्या वतीने MoE मध्ये GoI द्वारे अधिकृत कोणत्याही अन्य एजन्सीद्वारे देशभरात आयोजित केली जावी.

५) परीक्षा आयोजित केल्यानंतर आणि मूल्यमापन पूर्ण केल्यानंतर, अभ्यासक्रम-समन्वयक, HEI मार्फत, घोषित केलेल्या मूल्यमापन योजनेनुसार गुण किंवा ग्रेड प्रदान करतील.

६) SWAYAM वर आधारित क्रेडिट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र राष्ट्रीय समन्वयक आणि HEI च्या अधिकृत स्वाक्षरीद्वारे स्वाक्षरी केलेले असेल आणि अंतिम सेमीस्टर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून चार आठवडय़ांच्या आत  SWAYAM प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाईल

७) विद्यापीठाकडून किंवा स्वायत्त उच्च शिक्षण संस्थाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या अंतिम प्रमाणपत्र, पदविका किंवा पदवीमधे, विद्यार्थ्यांने SWAYAM मधून केलेले गुण किंवा श्रेयांक मिळवले जातील.’’

महेश सर उत्साहित होऊन म्हणाले, ‘‘हे झकासच आहे की. मीही आता शिक्षण संपवल्यानंतर पंधरा वर्षांनी  SWAYAM चा उपयोग करू शकेन.’’

रमेश सरांना ही प्रतिक्रिया ऐकून खूप आनंद वाटला. ते म्हणाले, ‘‘महेश सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला सर्वाना IIT माहिती आहेत. मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास, गोहाती आणि रूरकी अशा सात IIT नी एकत्र येऊन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगरुळू यांच्या साहाय्याने, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभियांत्रिकी आणि विज्ञानांमधील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी; प्रगत तंत्रज्ञान अध्ययन राष्ट्रीय अभ्यासक्रम (National Programme on Technology Enhanced Learning – NPTEL) तयार केले आहेत. त्यांचाही लाभ घेता येऊ शकेल.’’ नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात संधी मिळते आहे, याचा आनंद आज सर्वाना वाटत होता. या आनंदातच सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला. अनुवाद- डॉ. नीतिन आरेकर

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open distance and online education in news education policy zws