रणजित धर्मापुरीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रंथालयाच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या एकंदरीत अवकाशात, तंत्रज्ञान हे एक आव्हान आणि संधी दोन्ही बनले आहे. वाचन साहित्याने सुसज्ज अशी एक शांत जागा म्हणून ग्रंथालयांची पारंपरिक प्रतिमा, डिजिटल माहिती, माहितीचा ग्रंथालयातील आपापसातील सहयोग, आणि शिक्षणाच्या गतिमान केंद्रात रुपांतरीत होत आहे. ग्रंथपाल म्हणून हा बदल स्वीकारने केवळ ऐच्छिक नाही; आपल्या व्यवसायिक वाढीसाठी आणि संस्थेच्या निरंतर प्रासंगिक कार्यांसाठी ते आवश्यक आहे.

हे समजून घेण्यासाठी ग्रंथालयाच्या भविष्याला आकार देणाऱ्या काही वर्तमान तंत्रज्ञानाच्या उपयोगीतेचा शोध घेऊ. सुरुवात करू यात डिजिटल ग्रंथालये आणि रिपॉजिटरीज पासून. डिजिटल संसाधनांच्या वाढीमुळे माहिती कशी संग्रहित आणि अॅक्सेस करावी यात क्रांतिकारक बदल झाला आहे. ग्रंथालये आता विस्तीर्ण डिजिटल रिपॉजिटरीजचे केंद्र झाले आहे, ज्यामुळे वाचकांना, संशोधकांना कधीही, कुठेही संसाधनांचा वापर करणं शक्य झाले आहे. संस्थात्मक रिपॉजिटरीजच्या सॉफ्टवेअरद्वारे अनेक उच्चशिक्षित संस्थांनी डिजिटल संसाधनाचे संचयिका (रिपॉजिटरीज) तयार केले आहेत, ज्यामुळे ग्रंथपालासाठी डिजिटलायजेशनचे ज्ञान आणि त्याच्या व्यवस्थापनात निपुण असणे अत्यावश्यक बनले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग : आपण माहिती कशी व्यवस्थापित करतो आणि पुनर्प्राप्त करतो यात बदल होतो आहे. वाचकांना, संशोधकांना संसाधने शोधण्यास मदत करणाऱ्या चॅटबॉट्स पासून ते एआय चलित डेटा अॅनॅलॅटिक्स पर्यंतची तंत्रज्ञाने वाचकांचा, संशोधकांचा अनुभव, शोध घेताना केलेल्या प्रयत्नांच्या कार्यक्षमतेत भर पाडत आहेत. त्यामुळे निर्णय घेणं सोयिस्कर होत आहे.

बिग डेटा आणि डेटा अॅनॅलॅटिक्स (विशाल विदा आणि विदा विश्लेषक): ग्रंथालयात विविध कार्यावर आधारित विविध प्रकारच्या नोंदी केल्या जातात. यात काही नोंदी जाणूनबुजून केल्या जातात तर काही नोंदी नकळतपणे होतात. यात ग्रंथालय व्यवस्थापनाच्या दैनंदिन नोंदी पासून ते वाचकांच्या वाचन सवयींपर्यंत मोठ्या प्रमाणात डेटा संकलित होतो. या डेटांचा आणि विश्लेषण साधनांचा वापर केल्याने वाचकांचे वाचन वर्तन समजून घेणे शक्य होते. त्यानुसारच वाचकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाचकानुकूल सेवा नव्याने तयार करता येतात.

हेही वाचा >>> पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी

ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे डिजिटल खाते किंवा लेजर, सुरक्षित ऑनलाइन नोटबुक सारखे आहे. जे व्यवहार किंवा माहितीची नोंद ठेवते. ही नोंद बऱ्याच संगणकावर सामायिक केली जाते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्रंथालयांना त्यांच्या सेवेबाबतच्या वाचकांच्या विविध संगणकाद्वारे केलेल्या खात्रीशीर सूचनांचे संकलन व त्याचं विश्लेषण करून पुढील सेवा नियोजन, सुधार करण्यास वाव मिळतो. तसेच यात डिजिटल रेकॉर्डची अखंडता जपण्याची क्षमता आहे.

व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी तंत्रज्ञान ग्रंथालयामधे शिक्षणाच्या अनुभवांना नवीन दिशा देत आहे. या तंत्रज्ञानामुळे ऐतिहासिक संग्रहणांचे आभासी अनुभव घेता येणे शक्य झाले आहे. आणि अभ्यासाचे वाचन साहित्य अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवले जाते आहे. ज्यामुळे वाचकांना अभ्यासकांना शिक्षण अधिक रोचक वाटत आहे. उदा. असे काही ज्ञानकोश आहेत ज्यामधील माहितीवर बोटाने स्पर्श केला की वाचकांना त्या माहितीची विस्तृतपणे केलेली मांडणी अभासी स्वरूपात केलेली दिसते.

तंत्रज्ञानाच्या युगात करिअरमध्ये प्रगती होत आहे. या तांत्रिक प्रगतीमुळे ग्रंथालय व्यावसायिकांसाठी करिअरच्या नवीन संधी, नवे मार्ग प्राप्त होत आहेत. उदाहरणार्थ यात खालील नव्या संधींचा समावेश होतो.

डिजिटल लायब्ररीयनशिप : डिजिटल लायब्ररी, डिजिटल प्रिझर्वेशन आणि डिजिटल अॅसेट मॅनेजमेंटमधे स्पेशलायझेशन केल्यास आधुनिक ग्रंथालयाच्या वातावरणात अग्रस्थान मिळू शकते. डिजिटल क्यूरेशन आणि डेटा मॅनेजमेंट मधील पदवी/पदवीका/ प्रमाणपत्र कोर्सेस करिअर घडवण्यासाठी मौल्यवान आहेत.

डेटा लायब्ररीयनशिप: अलिकडे ग्रंथालये अधिक विदा (डेटा) चलित झाल्याने डेटा-ग्रंथपालाच्या भूमिकेला जो डेटा-व्यवस्थापन, डेटा-विश्लेषण आणि डेटा-गोपनीयता समजू शकेल अशा व्यक्तींना जास्त मागणी व महत्त्व असेल. आर पायथॉन किंवा एसक्युएल सारख्या डेटा मॅनेजमेंट अप्लिकेशनमधे प्रावीण्य प्राप्त केले तर या क्षेत्रात भरपूर ग्रंथालय उपयोगी वेगळं काही करू शकतो.

माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ : जे ग्रंथपाल ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या ज्ञानाला माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालतात जसे की सॉफ्टवेअर मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा किंवा नेटवर्क व्यवस्थापन ते डिजिटल संसाधनाचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी स्वत: माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ म्हणुन कार्य करतीलच तसेच इतरांनाही सहकार्य करू शकतात.

ज्ञान व्यवस्थापक आणि सल्लागार: ग्रंथालय शास्त्र आणि नवीन तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी समजून घेऊन, ज्ञान व्यवस्थापनात मुख्य भूमिकेत कार्य करणे शक्य आहे. एखाद्या संस्थेच्या धोरणात्मक हक्काच्या फायद्यासाठी सल्लागार म्हणून कार्य करता येते.

ग्रंथालय वाचकांच्या ग्रंथालयाच्या वापर सवयीनुसार व्यवस्थापन: आजची ग्रंथालये वाचक केंद्रित झाल्याने, युजर एक्सपिरीयेन्स डिझाईन मधील कौशल्य डिजिटल आणि पारंपारिक ग्रंथालयाच्या वाचकांचा वाचनानुभव वाढवणाऱ्यावर भर देणाऱ्या करिअरसाठी दरवाजे उघडू शकतात.

भविष्याची तयारी : करिअरच्या मार्गावर यशस्वीपणे प्रयत्न करण्यासाठी, आयुष्यभर शिकण्याची तयारी असायला हवी. कार्यशाळा, ऑनलाइन अभ्यासक्रम तसेच प्रमाणपत्र कोर्सेस द्वारे सतत व्यावसायिक ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. संबंधित विषयावरील नियतकालिकांमध्ये प्रकाशित प्रचलित कल दर्शविलेल्या लेखांचा अभ्यास करणे, परिषदेत उपस्थित राहाणे आणि प्रोफेशनल नेटवर्कमध्ये सहभागी होऊन नवीनतम ट्रेंड्सची माहिती करून घेणे. या गोष्टी आधुनिकतेच्या उंबरठ्यावर तुम्हाला घेऊन जातील. या व्यतिरिक्त नव्या संधीचा गांभीर्याने विचार करून इतरांना यात सहभागी करून घेण्याचे सॉफ्ट स्किल्स पूर्वीच्या पेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. जसेजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसे माहितीचे क्लिष्ट स्वरूपाचा अर्थ लावणे, विविध विषयांमध्ये सहयोग करणे, ग्रंथालय सेवांचे मूल्य वाचकांना, अभ्यासकांना समजावून सांगणे ही यशाची गुरुकिल्ली असेल हे निश्चित.

ग्रंथालय माहितीशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय हा नावीन्य आत्मसात करत करिअर वाढीसाठी एक सुयोग्य संधी आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून निरंतर शिक्षणासाठी वचनबद्ध राहून, केवळ आपल्या करिअरमध्ये प्रगती होत नाही, तर संपूर्ण संस्थेला संलग्न असलेल्या ग्रंथालयाच्या अभूतपूर्व कामगिरीने मूळ संस्था (पालक संस्था) गतिमान व महत्त्वपूर्ण म्हणून गणले जातील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunities and challenges of digital libraries zws