इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू

जमशेटजी टाटा यांच्या दूरदृष्टीतून १९११ साली सुरू झालेली ही संस्था भारतातीलच नव्हे तर जगभरातील संशोधन संस्थांमध्ये अग्रगण्य आहे. या संस्थेत बारावीनंतर चार वर्षांचा सायन्समधील पदवी कोर्स उपलब्ध आहे. या कोर्सला प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड किंवा आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट यातील मार्कांवर प्रवेश मिळतो.

आयसर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी अर्ज आणि या कोर्स साठीचा अर्ज स्वतंत्ररित्या भरणे आवश्यक आहे. यासाठी https:// admissions. iisc. ac. in या संकेतस्थळावर १ मे ते ६ जून या दरम्यान अर्ज करावेत. या कोर्समध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, मटेरियल्स , एन्व्हायरमेंट सायन्स या सहा शाखा उपलब्ध आहेत.

या चार वर्षांच्या कोर्समधील शेवटच्या सेमिस्टरमध्ये एक रिसर्च प्रोजेक्ट करावा लागतो ज्यातून विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळतो. हा पदवी कोर्स चार वर्षांचा असल्याने नंतर मास्टर्स साठी परदेशातही प्रवेश मिळणे शक्य होते.

याच संस्थेत बारावीनंतर आणखी एक चार वर्षांचा बी टेक इन मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटिंग कोर्स उपलब्ध आहे. जेईई अॅडव्हान्स्डच्या मार्कांवर प्रवेश मिळतो आणि बोर्डात किमान ७५ गुण आणि पहिल्या २० पर्सेंटाइलमध्ये स्थान मिळवलेले विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र ठरतील.

नायसर

सायन्स विषयातील शिक्षण आणि संशोधन याला वाहिलेली ही संस्था २००७ मध्ये भुवनेश्वर येथे सुरू झाली. या संस्थेमध्ये बारावीनंतर फिजिक्स,केमिस्ट्री,बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये ५ वर्षांचा मास्टर ऑफ सायन्स हा कोर्स उपलब्ध आहे. या कोर्सला प्रवेशासाठी नेस्ट नावाची एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी www. nestexam. in या संकेतस्थळावर ९ मे २०२५ पर्यंत अर्ज करता येईल. परीक्षा रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी देशांतील प्रमुख शहरांमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असून यामध्ये चार सेक्शन असतील. प्रत्येक सेक्शन साठ मार्कांचा असून त्यात फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या विषयांवर आधारीत २० प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तीन गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. चार सेक्शन पैकी सगळ्यात चांगले मार्क असणारे तीन सेक्शनच अंतिम निवड यादी साठी वापरले जातील. आधीच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा ११वी व १२ वीच्या सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षेतील मार्कांवर आधारित मेरिट लिस्टनुसार नायसर भुवनेश्वरमध्ये पाच वर्षांच्या मास्टर ऑफ सायन्स कोर्सला प्रवेश मिळेल.

मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र (CEBS), मुंबई

मुंबई विद्यापीठ आणि भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर यांनी २००७ मध्ये स्थापन केलेल्या मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र , मुंबई या ठिकाणी बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमएससी कोर्स उपलब्ध आहे ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये मूलभूत संशोधनासाठी संधी उपलब्ध आहे. याचे प्रवेश नेस्ट परीक्षेच्या मार्कांवर होतात.

याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना मूलभूत शास्त्रांमध्ये संशोधन क्षेत्रात करीअर करायचे असेल त्यांना कोणत्याही महाविद्यालयातून बीएससी कोर्स पूर्ण करुन नंतर मास्टर्स इन सायन्ससाठी आयआयटी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळू शकतो. याकरीता बीएससी नंतर एक जाम नावाची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. देशातील मुंबई, दिल्ली, कानपूर, मद्रास, रूरकीसह २२ आयआयटी मध्ये तीन हजार जागा यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज अशा विविध संस्थांमध्ये जवळपास अडीच हजार जागा यासाठी उपलब्ध आहेत. बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, जिऑलॉजी अशा विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण व संशोधनाच्या संधी विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित संस्थांमधून मिळतात.

(उत्तरार्ध)

vkvelankar@gmail. com