दहावी, बारावीचा निकाल लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे ती प्रवेशाची. कुठे प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडायची किंवा विचार केला होता एक आणि निकाल लागला अनपेक्षित, असे काहीसे होते. त्यात अनेकदा पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहताना मुलांना ताण येतो. अनेक जणांना अपेक्षांचे ओझे पेलवत नाही आणि त्यातून मुलं आत्मविश्वास गमावतात, कधी त्यांना अटी ताणामुळे नको ती पावले उचलण्यात परिणती होते. हे टाळण्यासाठी पुढील काही उपाय केल्यास ताण निवळून, उत्साहाने पुढील प्रश्नांना, समस्यांना सामोरे जाता येते.
मुलांशी सुसंवाद हवा
’ मुलांनी आणि पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हल्ली यशाच्या अनेक पायऱ्या असतात. एका पायरीवरून घसरून पडलो तर इतर पायऱ्या तयार आहेत. केवळ एका पायरीवर विसंबून चालणार नाही. थोडक्यात, अनेक पर्याय आणि संधी आता करिअरच्या बाबतीत उपलब्ध आहे. त्यामुळे एक संधी हुकली म्हणून वाईट न वाटून घेता पुढच्या संधीकडे पहा.
’ गुण म्हणजे चढ-उतार. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत जसे चढउतार असतात तसे ते परीक्षेतही होतात. पण, पालकांनी साथ दिली तर एकूण यश सरासरीजवळ राहणार. एखाद्या परीक्षेत गुण कमी पडले तर आयपीएलच्या अनेक मॅचपैकी एक गमावली असे समजायाचे आणि पुढे जायचे.
’ विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षेची गुणपत्रिका आपण ‘फ्रेम’ करून लावत नसतो. कारण त्या पुढेही आपले शिक्षण आणि यश-अपयश सुरूच असते. तसेच, आयुष्याच्या परीक्षेत किंवा एक चांगले व्यक्तिमत्व घडवताना किंवा घडवल्यानंतर ही कुणी दहावी-बारावील किती गुण होते याची चौकशी करीत नाही. त्यामुळे, परीक्षेच्या गुणांविषयीचे हे भ्रम आपण दूर केले पाहिजे.
’ पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आपण मुलांना बदलू शकत नाही. तसेच, मुलांनाही पालकांना बदलता येत नाही. मूल जन्माला येते तेव्हा ते गुणपत्रिका घेऊन येत नाही. पालकांचा मुलांशी चांगला संवाद असेल, त्यांचा त्यांच्यावर विश्वास असेल तर असे मूल आयुष्यात नक्कीच उभे राहणार. आपला मुलावर विश्वास आहे, याची जाणीवही पालकांनी मुलाला करून दिली पाहिजे. मग नक्कीच चांगले प्रयत्न करीत राहतात.
’ मुलांनीही स्पष्टपणे आपला अभ्यास किती झाला आहे, पेपर कसा सोडविला आहे, हे स्पष्टपणे पालकांना सांगितले पाहिजे. म्हणजे पालकांच्या अपेक्षाही वाढत नाहीत. नाही तर वाढलेल्या अपेक्षांचे ओझे शेवटी मुलांनाच वाहावे लागते.
’ आपल्या मुलाला एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तर त्याची लाज पालकांनी बाळगू नये. कारण, परीक्षेतील गुणांच्या आधारे ठरणारी प्रतिष्ठा ही एक ‘फॅन्टसी’ आहे.