काही जणांना एआय म्हणजे फक्त सॉफ्टवेअर लिहिणं, असं वाटू शकतं. यात अजिबातच तथ्य नाही. माहितीचं उत्तम विश्लेषण करू शकणारे लोक एआयमध्ये चांगलं काम करू शकतात. खरं म्हणजे असंख्य प्रकारची माहिती आपल्याशी जवळपास संवाद साधत असते. आपल्याला तो संवाद साधण्यासाठीची साधनं अवगत नसतात, ही त्यामधली मुख्य अडचण असते. आपण एकदा ती जाणून घेतल्यानंतर एआय या माहितीचा वापर कशा प्रकारे करतो हे बघणं खरोखर अत्यंत रंजक असतं.

एकूणच संगणकविश्वात आणि त्यातही खास करून एआयमध्ये माहिती (डेटा)चं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं आपण अनेकदा ऐकतो. तसंच माहिती म्हणजे आताचं इंधन असल्याचं विधानही अनेकजण करताना दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे जितकी अचूक आणि सखोल माहिती असेल तितकं एआयचं काम जास्त उत्तमरीत्या होतं आणि त्यातून मिळत असलेले निष्कर्षही आपण त्यांच्यावर अवलंबून राहू शकू, असे असतात. एआयच्या मुळाशी ‘मशीन लर्निंग’ नावाची प्रक्रिया असते. याचा सोपा अर्थ म्हणजे उपलब्ध माहिती वापरून आपण संगणकाला ‘शिकायला’ सांगतो. उदाहरणार्थ अनेक ग्राहकांनी वस्तूंच्या केलेल्या खरेदीची माहिती आपण ‘मशीन लर्निंग’च्या हाती सोपवून त्यातून ‘तुझे तूच निष्कर्ष काढ’ असं सांगू शकतो. आपण मशीन लर्निंगविषयी स्वतंत्रपणे बोलणारच आहोत; पण आत्तापुरता याचा अर्थ संगणकाला अशाप्रकारे शिकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर माहितीची आवश्यकता असते, असा होतो.

एकदा का एआयला या माहितीच्या आधारे शिकता आलं की त्यानंतर आपण त्याला या माहितीतून काही ठरावीक गोष्टी आढळतात का; असं विचारू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकानं कोणत्या प्रकारची माहिती शोधल्यावर तो नेमकं काय खरेदी करतो यामधला दुवा आपण शोधू शकतो का? यासारख्या हजारो गोष्टींमधले दुवे शोधण्याचं काम संगणक अशा प्रकारे करू शकतो. साहजिकच माहितीशिवाय हे काम अशक्य आहे. एआयविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी माहितीसंबंधीचा हा मुद्दा ध्यानात घेणं आवश्यक आहे. काही जणांना एआय म्हणजे फक्त सॉफ्टवेअर लिहिणं, असं वाटू शकतं. यात अजिबातच तथ्य नाही. माहितीचं उत्तम विश्लेषण करू शकणारे लोक एआयमध्ये चांगलं काम करू शकतात. खरं म्हणजे असंख्य प्रकारची माहिती आपल्याशी जवळपास संवाद साधत असते. आपल्याला तो संवाद साधण्यासाठीची साधनं अवगत नसतात, ही त्यामधली मुख्य अडचण असते. आपण एकदा ती जाणून घेतल्यानंतर एआय या माहितीचा वापर कशा प्रकारे करतो हे बघणं खरोखर अत्यंत रंजक असतं.

एआयमध्ये आहे त्या माहितीचा वापर करून भविष्यात काय घडू शकेल यासंबंधीचे अंदाज बांधण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रियासुद्धा घडते. म्हणजेच उद्या काय घडू शकेल हे ठरवण्यासाठी आजवरच्या माहितीचा वापर केला जातो. जर आपल्याकडे असलेली माहितीच बेभरवशाची असेल किंवा अर्धवट असेल तर एआयची फसगत होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारची भविष्यवाणी करणं अवघड होऊन बसेल. याही दृष्टीनं एआयमध्ये माहिती खूप महत्त्वाची ठरते. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे जसजसा माणूस अधिकाधिक माहिती मिळत जाईल तसतसा जास्तीत जास्त प्रगल्भ होत जातो, त्याच धर्तीवर एआयचं तंत्रज्ञानसुद्धा अधिकाधिक समृद्ध होत जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण ‘चॅटबॉट’चा विचार करू शकतो.

चॅटबॉट म्हणजे आपल्याशी माणसासारखा संवाद साधू पाहणारा ‘चॅटिंग रोबॉट’. आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम चॅटबॉट करतो. अनेक वेबसाइटवर आपण असा चॅटबॉट अनुभवलेला असेल. सुरुवातीला हा चॅटबॉट अक्षरश: निर्बुद्ध असल्यासारखा आपल्याला वैताग देणारा ठरतो. आपण विचारलेल्या प्रश्नाचं त्याला आकलनसुद्धा होत नसल्याचं आपल्याला जाणवतं. साहजिकच आपली समस्या चॅटबॉटनं सोडवणं हा कल्पनेपलीकडचा प्रकार ठरतो. मात्र जसजसे अधिकाधिक लोक या चॅटबॉटशी संवाद साधायला लागतात (आणि वैतागून जातात!) तसतशी या चॅटबॉटमध्ये सुधारणा होत जाते. जणू एखाद्या अत्यंत नवोदित माणसाला बँकेच्या मुख्य खिडकीत आणून बसवावं आणि त्यानं सुरुवातीला असंख्य लोकांना अजिबात कसलीच माहिती देण्याविषयी असमर्थता दर्शवल्यावर हळूहळू याच प्रभावहीन संभाषणांमधून शिकत जावं, असा हा प्रकार असतो.

सुरुवातीला संगणकाला माणसाची अत्यंत लवचीक असलेली भाषा समजायला खूप कष्ट लागायचे. आपण लिहिताना/बोलताना एकच वाक्य अनेक प्रकारे उलट-सुलट वापरू शकतो. आपल्याला त्याचा अर्थ लागतो; पण संगणकाला हे समजायला खूप जड जातं. माणसाची ही नैसर्गिक भाषा असल्यामुळे जेव्हा आपण संगणकाला अशा भाषेचा अर्थ एआय वापरून लावायला सांगतो तेव्हा त्याला ‘नॅचरल लँग्वेज प्रॉसेसिंग (एनएलपी)’ असं म्हणतात. हे तंत्रज्ञान सुरुवातीला अत्यंत बाळबोध होतं. हळूहळू जसजशी संगणकाला मानवी भाषांमधल्या संवादांची असंख्य उदाहरणं पुरवण्यात आली तसतशी संगणकाची मानवी भाषेचं आकलन करून घेण्याची क्षमता सुधारत गेली. म्हणजेच इथेसुद्धा अधिकाधिक माहितीचा वापर महत्त्वाचा ठरला.

माहिती आणि एआय यांच्यामधलं नातं असं अगदी घट्ट आहे!

akahate@gmail. com

Story img Loader