डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर
वसंत ऋतूच आगमन झालं आहे. नवनिर्मिती, आनंद आणि उत्साहाचा हा काळ समजतात. वसंत ऋतुतल्या १४ फेब्रुवारीच्या (राष्ट्रीय?) सणाला समस्त तरुण जनता (वयाने किंवा मनाने!) आपली भावनिक बुद्धिमत्ता पणाला लावते! याच भावनिकसामाजिक बुद्धिमत्तेबरोबर अन्य चार कौशल्यांची ‘वसंतपंचमी’ आपल्याला छोकरीबरोबरच नोकरी मिळवण्यासाठीही कशी उपयुक्त असते ते पाहू!!
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात, भावनिक, सामाजिक बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता या गोष्टी माणसाला मशीन आणि रोबॉट्सच्या पेक्षा वेगळे आणि वरचढ ठरवतात. कंपन्यांना एआय समजणारी, वापरता येणारी पण त्यातून मिळणाऱ्या माहितीचा सुयोग्य वेळी, आणि ठिकाणी वापर करता येणारी, स्वत:चे मन व विचार असणारी माणसे हवी आहेत. भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी वेगवेगळे सामाजिक क्लब जॉइन करू शकता. स्वयंसेवी संस्था जिथे सामाजिक कार्य करता येईल, उदा. पर्यावरण संवर्धन, परिसर/ नदी स्वच्छता, प्रौढ डिजिटल साक्षरता, गरीब / अनाथ लहान मुलांचे शिक्षण, इ. याशिवाय, खडतर परिस्थितीतून करिअरच्या उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तींचे अनुभवपर भाषण ऐकणे (प्लॅटफॉर्म उदाहरण- टेड टॉक्स, युट्यूब पॉडकास्ट इ.), प्रेरणादायक व्यक्तींची पुस्तके वाचू शकता, किंवा त्यांच्यावर बनलेले चांगले चित्रपट पाहू शकता. ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेतच. पण स्व- अनुभूति हाच खरा शिक्षक! सृजनशीलता वाढवण्यासाठी प्रत्येकाला एखादा तरी सृजनशील छंद असावाच, जसे चित्रकला, ओरिगामि, वाद्यावादन, गाणे, नृत्य इ. डिझाईन थिंकिंग हेही सध्या महत्त्वाचे झाले आहे. त्याचे कोर्सेस Coursera, edX इ. वर आहेत.
पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन. ह्याचा जरूर विचार करा कारण आजचे आपले जग अत्यंत वेगवान आहे. आपल्याला वेळ कमी आणि कामे जास्त आहेत. कामांना योग्य प्राधान्य क्रम देणे, त्यानुसार वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मग त्यावर आधारित कार्यक्रमाचे नियोजन करणे, यासाठी अनेक सहाय्यक टूल्स आहेत, जसे आयझेनहॉवर मॅट्रिक्स- ज्यामध्ये आपण आपल्या कामांचे (१) तातडीने किंवा त्वरित नाही, (२) महत्त्वाचे किंवा महत्त्वाचे नाही या निकषांवर वर्गीकरण करतो. आणि मग तातडीची आणि महत्त्वाची कामे यांना प्राधान्य देतो. पोमोडोरो पद्धत, ज्यात १५ मिनिटे काम/अभ्यास आणि ५ मिनिटे ब्रेक या पद्धतीने काम करतात. अल्प आणि दीर्घकालीन ध्येयनिश्चितीसाठी माइंड-मॅपिंग, सिक्स हॅट्स थिंकिंग वापरू शकता. तर नियोजनासाठी Trello सारखी अॅप्स किंवा Google Calendar, calendly इ. चा फायदा करून घ्या.
याशिवाय महत्त्वाचे आहे नेतृत्वकौशल्य. काही माणसांकडे जन्मत:च नेतृत्वगुण असतात. पण इतरांसाठी स्वभावात, विचार करण्याच्या सवयीत लक्षपूर्वक बदल करून नेतृत्वकला विकसित करता येते. त्यासाठी वेगवेगळ्या क्लबस् प्रोजेक्ट्समध्ये भाग घेऊन, नेतृत्वकौशल्य अजमावणाऱ्या भूमिका स्वत:हून निवडणे आवश्यक आहे. इथे घाबरून चालणार नाही. आम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रशिक्षण देतो, तिथल्या एक विद्यार्थिनीने कॉलेजच्या स्पोर्ट्स टीम, अॅस्ट्रॉनॉमी क्लब, फिल्म क्लब इ मध्ये स्वत: नोंदणी करून भीतीवर मात करून, वरिष्ठ विद्यार्थी व शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन नेतृत्व केले, तिच्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल झाला, या गोष्टी तिने तिच्या रेझ्यूमे मध्ये लिहिल्या, आणि तिला उत्तम नोकरी मिळाली. ऑनलाइन कोर्सेस Great Learning, ऑक्सफोर्ड होम स्टडी सेंटर, Udemy इ. वर विनामूल्य उपलब्ध आहेत.
वर सांगितलेले मार्ग, जसे सामाजिक संस्थांमध्ये काम करणे, ग्रुप प्रोजेक्ट्स, ग्रुप स्पर्धा यात भाग घेणे, शिक्षण संस्थांच्या निरनिराळ्या संघांमध्ये जसे, क्रीडासंघ, वाचकसंघ यात सक्रिय सहभाग घ्या. या कामांमुळे, पुढचा मुद्दा, म्हणजे टीमवर्क आणि सहयोग याचा अनुभव, सराव होईल.
ही सगळी व्यक्तिमत्वविकास कौशल्य योग्य वेळेत म्हणजे शाळा कॉलेज मध्ये असतानाच नियोजन करून आत्मसात करायला हवीत. ज्यायोगे, तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी येईल, आणि तुमचा इंटरव्ह्यू आणि भविष्यातील नोकरीसाठीचा आत्मविश्वास बहरेल.
bhooshankelkar@hotmail.com mkelkar_2008 @yahoo.com