महेश भागवत, सुप्रिया देवस्थळी
व्यक्तिमत्व चाचणीसाठी जो डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म भरला जातो त्यातल्या माहितीनुसार कशाप्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे गेल्या दोन लेखांमध्ये आपण पाहिलं. या अर्जात उमेदवाराबद्दलचे अनेक तपशील असतात आणि त्यानुसार प्रश्नांचा अंदाज वर्तवता येऊ शकतो. इथून पुढेही काही लेखांमध्ये आपण या अपेक्षित प्रश्नांचाच विचार करणार आहोत. सगळ्याच तपशिलांचा आणि प्रश्नांचा उल्लेख लेखांमधून शक्य नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की काही उदाहरणे सविस्तर घेऊ ज्यामुळे उमेदवाराला आणखी प्रश्न काय आणि कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येईल.
डीएएफ अर्जात आई वडिलांचं नाव, त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांचा व्यवसाय/नोकरी याबद्दल माहिती असते. त्यानुसार उमेदवाराला तयारी केली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराचे आई वडील शिक्षक असतील तर नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा त्रिभाषा सूत्राबद्दल मत विचारलं जाऊ शकत. प्रथम संस्थेचा असर हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो आणि मग तुमच्या राज्यात या रिपोर्ट प्रमाणे किती शाळाबाह्य विद्यार्थी आहेत वा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात.
शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकार राबवत असलेले कार्यक्रम/योजना या बद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. समाज एखाद्या उमेदवाराचे आई वडील पोलीस विभागात कार्यरत असतील तर त्याला पोलीस दलांमध्ये कोणत्या मूलभूत समस्या आहेत आणि काय सुधारणांची गरज आहे? सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंह केस मध्ये ज्या ७ मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या विषयी , पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काय प्रयत्न करता येतील असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
पोलीस दलातली रचना विचारली जाऊ शकते. पोलीस आयुक्तालय कुठे असतात, आयुक्तालय ठरवताना काय निकष लावले जातात. उमेदवार ज्या शहरातून आलेला असेल तिथे आयुक्तालय आहे का असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखाद्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या तर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस काय काय उपाय करू शकतात, पोलिसांना राज्यघटनेच्या आणि कुठच्या कुठच्या कायद्यांच्या चौकटीत काम करावं लागतं याचीही माहिती उमेदवाराला असली पाहिजे. वॉरंट , जामीन , पोलीस कोठडी , न्यायालयीन कोठडी याही संज्ञा पोलिसांच्या कामकाजात महत्त्वाच्या असतात त्याबद्दलही उमेदवाराला कल्पना असली पाहिजे.
एखाद्या उमेदवाराचे पालक समजा सेनादलात असतील तर सेनादलाच्या ज्या शाखेत त्यांनी काम केलेलं आहे त्या शाखेची सविस्तर माहिती पाहिजे, त्यातलेही वेगवेगळे विभाग माहीत पाहिजेत. कॉर्प्स , कमांड्स , डिव्हिजन असतात त्याची माहिती असली पाहिजे. थिएटर कमांड, ‘वन रँक वन पेन्शन’ या विषयावर उमेदवारांना प्रश्न विचारले जातात.
सेना दलातली वेगवेगळी पदे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार त्याचा क्रम माहिती असायला हवा. उदाहरण बघूया- आर्मीमध्ये कोणाचं सिलेक्शन झालं तर सर्वप्रथम त्याला कुठचं पद मिळतं ? लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल यात सिनियर कोण? आर्मीमध्ये जो कर्नल आहे त्याचं एअर फोर्समधलं समतल पद कोणतं ? सेना दलातल्या अधिकाऱ्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, परम विशिष्ट सेवा मेडल अशी अनेक मेडल्स मिळतात त्याबद्दलही माहिती असली पाहिजे. एकदा एका उमेदवाराला प्रश्न विचारला गेला, रँक आणि पद यात फरक काय? भारतीय सरंक्षण खात्याच्या तिन्ही दलांच्या समान रँक कोणत्या याची माहिती विचारली जाते. सध्या सिव्हिल सर्व्हिसेस च्या मुलाखती सुरू आहेत त्यात एक सदस्य आहेत जे आर्मी बॅकग्राऊंडचे आहेत, अशा सदस्याचे पॅनल आले तर सेना दलासंबंधी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट असते.
एखाद्या उमेदवाराच्या आई वडिलांचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती असली पाहिजे. उमेदवाराने छोटा व्यवसाय असं लिहिलं असेल तर काय स्वरूप आहे व्यवसायाचे, अशा प्रश्नाने सुरुवात होऊ शकते. आपण एक उदाहरण घेऊ- उमेदवाराच्या आई वडिलांचा साड्यांचा व्यवसाय आहे सुरत मध्ये.
आई वडिलांचं साड्यांचं दुकान आहे का? या दुकानात विकला जाणारा माल कुठून आणला जातो? ज्या साड्या विकल्या जात नाहीत त्याचं तुम्ही काय करता ? तुमचा घराचा व्यवसाय आहे तर तो सोडून तुम्हाला सरकारी नोकरीत का यायचं आहे? आपल्या देशात व्यवसाय करणाऱ्या मंडळींना कुठच्या अडचणींचा सामना करावा लागतो? नवीन व्यावसायिकांना बँका सहजी कर्ज देत नाहीत असं म्हटलं जातं , ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल? बिझनेस म्हटला की कंपनी , पार्टनरशिप या बिझनेसच्या स्वरूपाबद्दल सुद्धा माहिती असावी लागते. एकदा एका उमेदवाराला फॉर्च्युन ५०० कंपनी कशी ठरवली जाते असा प्रश्न विचारला गेला. लिमिटेड लाएबिलिटी पार्टनरशिप आणि पार्टनरशिप यात फरक आहे का? वन पर्सन कंपनी म्हणजे काय असेही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते.
डिटेल्ड अप्लिकेशन फॉर्म मधली सगळी माहिती आपणच भरलेली असते त्यामुळे त्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती असणं अपेक्षित आहे.
mmbips@gmail.com supsdk@gmail.com