महेश भागवत, सुप्रिया देवस्थळे
संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील शेवटचा टप्पा म्हणजे व्यक्तिमत्त्व चाचणी. या व्यक्तिमत्त्व चाचणीबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपण या सदरात घेत आहोत. आतापर्यंत आपण नागरी सेवा परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि यात व्यक्तिमत्त्व चाचणीचे स्थान काय याबद्दल माहिती घेतली आहे. त्यानंतर आपण व्यक्तिमत्त्व चाचणीचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. यात आपण आत्तापर्यंत, आयएएस, आयपीएस या सेवांचे कॅडर प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे पाहिलं आहे. नागरी सेवा परीक्षा साधारणत: २३ प्रकारच्या सेवांसाठी घेतली जाते, या २३ सेवांबद्दल थोडक्यात माहिती आपण गेल्या काही लेखांमधून घेतली आहे.
व्यक्तिमत्त्व चाचणीचा डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म (डॅफ) चांगला सविस्तर असतो आणि हा फॉर्म काळजीपूर्वक भरणं आवश्यक असतं. याच फॉर्ममधल्या माहितीच्या आधारे उमेदवाराला प्रश्न विचारले जाणार असतात. आजच्या लेखात आपण प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दिवशी किंवा त्याच्या काही दिवस आधी काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा विचार करूया.
मुलाखती कशा आणि कधी?
या वर्षी जानेवारी महिन्यापासून दिल्लीतल्या संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात व्यक्तिमत्त्व चाचण्या सुरू आहेत. इथून पुढे ज्या उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी असेल त्यांनाही या सूचनांचा उपयोग होईल अशी आशा आहे. व्यक्तिमत्त्व चाचणी ही साधारणत: जानेवारी महिन्यात सुरू होते आणि मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालते. सोमवार ते शुक्रवारी सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात साधारणपणे १२ उमेदवारांच्या मुलाखती एक पॅनल घेते. संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि चेअरमन या पॅनेलचे प्रेसिडेंट असतात आणि त्यांना मदतीसाठी चार सल्लागार असतात, ते शक्यतो सनदी सेवेतील निवृत्त वा कार्यरत अधिकारी किंवा शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असे प्राध्यापक, उप कुलगुरू, विषय तज्ज्ञ असतात. मुलाखतीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पॅनल प्रेसिडेंट विषयी माहिती असणे गरजेचे असते. ती माहिती यूपीएससीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. म्हणजे सर्जनशील कल्पनाशक्तीचा वापर करत उमेदवाराला त्या पॅनलला व्यक्तिमत्त्व चाचणीत सामोरे जाणे सोपे जाईल.
आरोग्य महत्त्वाचे
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांमध्ये ज्या उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी असते त्यांनी तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं असत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दिल्लीत खूप थंडी असते. महाराष्ट्रातून येणाऱ्या उमेदवारांना एवढ्या थंडीची सवय नसते. यावर्षी एका दक्षिण भारतातील महिला उमेदवाराने कडक थंडीत स्वेटर वा जॅकेट घातला नव्हता कारण त्याची सवय नसावी, पण मुलाखतीदरम्यान त्याच विषयावर सविस्तर चर्चा होत दिल्लीतील तापमानासंबंधी मोबाइल अॅपचा वापर करावा आणि गरम कपडे नक्की वापरावेत असा सल्लाही त्या उमेदवाराला मिळाला. अचानक थंड प्रदेशात आल्यावर सर्दी-खोकला-ताप असे त्रास होऊ शकतात. तब्येत बिघडली की तयारीचे दिवस फुकट जाऊ शकतात. दिवस वाया गेल्यामुळे मनावरचा ताण वाढू शकतो. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. उमेदवार जेव्हा व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी निवडले जातात तेव्हा दिल्लीत येऊन काही ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू देतात या मॉक इंटरव्ह्यूला जातानासुद्धा स्वेटर कसा घालू, जॅकेट कसं घालू असा विचार करून चालणार नाही. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण प्रसिद्ध आहे. त्यामुळे तब्येत चांगली राहिली तर प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व चाचणीत चांगल्या पद्धतीने उत्तरं देता येतील.
व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधीचे तीन-चार दिवस पुरेशी झोप घेतलीच पाहिजे. नाहीतर सुजलेला चेहेरा, झोपाळलेले डोळे असणार व्यक्तिमत्त्व चाचणीला जाताना. सकाळच्या सत्रात तुमचा नंबर असेल तर पुरेसा नाश्ता करून गेलं पाहिजे, दुपारच्या सत्रात असेल तर दुपारचं जेवण किंवा पुरेसं खाऊन गेलं पाहिजे.
पोशाख कोणता?
व्यक्तिमत्त्व चाचणीला जाताना कपडे काय घालायचे हा प्रश्न अनेक उमेदवार विचारतात. टाय घालायचा का, ब्लेझर घालायचं का, मुलींनी साडी नेसायलाच हवी का असे प्रश्न आम्हाला हमखास विचारले जातात. या प्रश्नाचं एकच एक उत्तर देता येणार नाही. संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातली अतिशय महत्त्वाची परीक्षा मनाली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून जे अधिकारी निवडले जातात त्यांना महत्त्वाच्या पदांवर काम करायचं असतं, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या व्यक्तिमत्त्व चाचणीला म्हणूनच फॉर्मल स्वरूपाचे कपडे घालून जाणं महत्त्वाचं आहे. अनेक वेळा मुलांना टाय घालण्याची किंवा ब्लेझर घालण्याची सवय नसते. आणि एकदम व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दिवशी या गोष्टी घातल्या तर अवघडल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे काय कपडे घालायचे हे आधीच निश्चित करावं आणि ते कपडे घालून वावरण्याचा सराव करावा. टाय किंवा ब्लेझर घालायलाच पाहिजे असं अजिबात नाही. पण हे कपडे घातल्यामुळे आत्मविश्वास वाढणार असेल तर ते नक्की घालावे. टायची गाठ किंवा शर्टचे वरचे बटण हे मानेभोवती घट्ट दबाव पडणारे नसावे नाहीतर मुलाखत देताना उमेदवार सफाईदारपणे बोलणं शक्य होत नाही. ब्लेझरचा रंग शक्यतोवर काळा, गडद निळा किंवा ग्रे असावा. शर्टसुद्धा पांढरा किंवा फिकट निळा असावा. टायचा रंग शर्ट आणि ब्लेझरच्या रंगानुसार ठरेल, पण अगदीच लाल भडक-पिवळा असला टाय घालू नये. मुलाखतीला जाण्याआधी उमेदवारांनी एकदा तरी हा ड्रेस घालून सराव करावा.
मुलींना सुद्धा साडीबाबत महत्त्वाचा मुद्दा हा की साडी नेसण्याची सवय नसेल तर साडी नेसून वावरण्याची प्रॅक्टिस करावी. साडीचा रंगसुद्धा भडक असू नये. पेस्टल शेड्स मधली साडी केव्हाही चांगली. जरीची साडी नको. साडी कॉटन, लिनन, सिल्क या प्रकारातली असावी. साडीच नेसायला हवी असे अजिबात नाही. साधा ड्रेसही चालू शकतो. तिथे पण साडीचेच नियम लागू होतील, भडक रंग नको, जरीचे ड्रेस नको. जे कपडे घालायचे ते आधीच ठरवावे, त्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यावी. तुम्ही देशाच्या ज्या राज्यातून मुलाखतीसाठी जात आहात त्या तुमच्या नेटिव्ह स्टेटमध्ये कोणत्या प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल प्रसिद्ध आहे किंवा जीआय टॅग आहेत त्याविषयी महिला उमेदवारांनी खोलात जाऊन अभ्यास करणे गरजेचे आहे.
उमेदवारांनी व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दिवसापर्यंत कोणतेही काम बाकी ठेवून देऊ नये. सर्व तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी. उमेदवार जिथे राहात असेल तिथून संघ लोकसेवा आयोगाच्या धोलपूर हाऊसपर्यंत प्रवास कसा करायचा आहे याचेही नियोजन करून ठेवावे. एक दिवस अगोदर संघ लोकसेवा आयोग, धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, इंडिया गेट जवळ, या नवी दिल्लीतील कार्यालयाला जरूर भेट द्यावी. म्हणजे मुलाखतीच्या दिवशी आपल्याला कोठे जायचे आहे त्याची सुनिश्चिती असेल. मुलाखतीच्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेच्या थोडं आधीच पोहोचण्याची तयारी ठेवावी.
सोप्या शब्दात सांगायचं तर व्यक्तिमत्त्व चाचणीचा दिवस हा खूपच महत्त्वाचा असतो. शांतचित्ताने धोलपूर हाऊसमध्ये पोहोचून बोर्ड मेम्बर्सबरोबर उत्तम संवाद साधणं महत्त्वाचं आहे. आपण कसे राहतो याचा आपण कसे बोलतो यावर परिणाम होत असतो. म्हणूनच हे सविस्तर विवेचन.
mmbips@gmail. Com/ supsdk@gmail. com