या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल घटकातील सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत पाहू. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून प्राकृतिक आणि आर्थिक घटकांच्या तुलनेत सामाजिक भूगोल घटकावर कमी प्रश्न विचारले जातात हे लक्षात येते. मानवी भूगोलातील पारंपरिक मुद्दे आणि लोकसंख्या भूगोलातील तथ्यात्मक मुद्द्यांवर भर दिला जातो. मुद्देनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.

मानवी भूगोल

मानवी भूगोलातील विचाधारा अभ्यासताना त्यांमागील लॉजिक-कार्यकारणभाव व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये नमूद निश्चयवाद/निसर्गवाद, संभववाद/शक्यतावाद, थांबा व पुढे जा निश्चयवाद या तीन विचारधारा क्रमाने अभ्यासाव्या लागतील. पहिल्या विचाराची प्रतिक्रिया म्हणून किंवा त्रुटी निवारण्याचा प्रयत्न दुसरी व दोन्हींतील मध्य साधण्याच्या आवश्यकतेतून तिसरी विकसित झालेली आहे हे समजून घेतले तर त्यांचा अभ्यास सोपा होईल. या विचारधारांची मांडणी करणारे समाजशास्त्रज्ञ, त्यांचे इतर कार्य माहित असायला हवे. प्रत्येक विचारधारेतील महत्वाचे मुद्दे आणि त्यांची उदाहरणे समजून घ्यायला हवीत. दिलेल्या प्रसंगातील/विधानातील परिस्थितीमध्ये कोणती विचारधारा लागू होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

विकासासंबंधीची विविध मते हा मुद्दा अभ्यासताना विकासाचे वितरण ( Spatial distribution of development) हा विकासात्मक भूगोलातील मुद्दा समजून घ्यावा लागेल. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि मानवी विकासावर भौगोलिक स्थितीचे होणारे परिणाम ढोबळमानाने समजून घ्यावे लागतील. भारतातील विकासाचे हे पैलू थोडे जास्त खोलवर समजून घ्यावे लागतील. विकासाचा असमतोल हा अर्थव्यवस्था घटकातील मुद्दा येथे ओव्हरलॅप होतो. हा मुद्दा कोणत्याही एका पेपरमध्ये एकाच वेळी व्यवस्थित अभ्यासणे शक्य आहे.

मानवी वसाहत ग्रामीण व नागरी वसाहत – स्थळ, जागा, प्रकार, अंतरे व त्यांची रचना समजून घेताना अशा वसाहती स्थिरावण्यामागची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक कारणे/पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वसाहतीचे आपले फायदे, तोटे आणि आर्थिक सामाजिक महत्त्व समजून घ्यावे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी वसाहत कोणत्या प्रकारे विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.

नागरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या समजून घेताना समस्येचे स्वरूप, कारणे, तिच्यामुळे होणारे परीणाम, संभाव्य उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत. यामध्ये ग्रामीण नागरी झालर/किनार क्षेत्राच्या काही वैशिष्ट्यपूर्ण समस्या असू शकतात. त्यांचाही अभ्यास या मुद्यांच्या आधारे करायला हवा.

नागरीकरण, नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन हे परस्परांवर परीणाम करणारे/ प्रभाव टाकणारे मुद्दे आहेत. नागरीकरणाची वैशिष्ट्ये, आवश्यकता, स्वरुप, त्यातून उद्भवणा-या समस्या, त्यांवरील उपाय समजून घ्यावेत. नागरीकरणाची प्रक्रिया अभ्यासताना एखाद्या वसाहतीचे नागरी वसाहतीमध्ये होणारे रुपांतर व त्यासाठी कारक परिस्थिती समजून घ्यावी.

लोकसंख्या भूगोल

लोकसंख्याविषयक सांख्यिकी साधने/माहिती सामग्री कोणती ते माहित असायला हवे. भारतामध्ये जनगणना अहवाल, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवाल हे अशा माहितीचे अधिकृत स्राोत आहेत. या अहवालांचे स्त्रोत, त्यांमागील प्रक्रीया, माहिती गोळा करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा हे मुद्दे समजून घेतले पाहिजेत.

महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण याबाबतची आकडेवारी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून किंवा जनगणना अहवालातून पहायला हवी. महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्ट्ये अभ्यासताना जनगणना अहवालातील सर्व निर्देशक व्यवस्थित समजून घ्यायला हावेत. प्रत्येक निर्देशकाचा अर्थ/ व्याख्या व त्याची सन २००१ व २०११ ची माहिती/ आकडेवारी तुलनात्मक टेबलमध्ये नोट्स काधून अभ्यासायला हवी.

लोकसंख्या बदलाचे घटक म्हणून जनन दर, मृत्यूदर, लोकस्थलांतर या मुद्द्यांचा विचार करणे आयोगाला अपेक्षित आहे. या घटकांमुळे राज्याच्या लोकसंख्येची रचना (वय /लिंग /साक्षरता/ कार्यकारी लोकसंख्या) कशी बदलते हे समजून घ्यायला हवे. महाराष्ट्रातील जन्म दर, मृत्यूदर, लोकस्थलांतराचा कल व पातळी याबाबतची आकडेवारी अधिकृत सांख्यिकी स्राोतांतून पहायला हवी व अद्यायावत करत रहायला हवी.

लोकसंख्यावाढ व आर्थिक विकास यांचा एकमेकांवर होणारा परिणाम समजून घ्यायला हवा. लोकसंख्या वाढीचे चांगले व वाईट दोन्ही परिणाम आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून अभ्यासायला हवेत. भारतातील लोकसंख्या विषयक धोरणे आणि त्यांतील महत्वाच्या तरतूदी समजून घ्यायला हव्यात. याबाबत थेट तरतूदी, उद्दिष्टे विचारली जाऊ शकतात.

आनुषंगिक अभ्यास

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्यूदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११ च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्द्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेले जिल्हे आणि सर्वाधिक व सर्वात कमी वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या राजधान्या व त्यांची वैशिष्ट्ये, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी/ डोंगर/ नैसर्गिक भूरूप या बाबी आधीच्या अभ्यासक्रमामध्येही वेगळ्याने नमूद केलेल्या नव्हत्या तरी त्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे आताही राज्याचा राजकीय नकाशासुद्धा व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

पेपर तीनमधील मानवी हक्क/ संसाधने किंवा पेपर चार मधील अर्थसास्त्राचा भाग म्हणूनही विचारले जाणारे काही जागतिक व राष्ट्रीय निर्देशांक व त्यातील भारताचे व त्याच्या शेजारी देशांचे स्थान या बाबींची माहिती अद्यायावत करुन घ्यायला हवी.

● steelframe. india@gmail. com

Story img Loader