डॉ श्रीराम गीत
‘सायन्स आवडते’, ‘सायन्स मध्येच खूप स्कोप असतो’, ‘अकरावी बारावीला सायन्स घेतले की कुठे पण जाता येते’, ‘सायन्समधे संशोधन करण्याची इच्छा आहे’, अशा वाक्यांची ओळीने पखरण कायम केली जाते. दरवर्षी सगळ्यात जास्त संख्येने शास्त्र शाखेत अकरावीला विद्यार्थी प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांमध्ये बारावीला गणित घेऊन बरे मार्क मिळवून सीईटी पण देणाऱ्यांची संख्या साधारणपणे दीड लाख भरते. यांचा इंजिनीअरिंग किंवा आर्किटेक्चरचा व्यवसायिक अभ्यासक्रमांचा रस्ता सुरू होतो.
गणित सोडून देऊन पीसीबी या तीन विषयातून बारावी करणाऱ्यांची संख्या अमाप वाढत आहे. मात्र, सर्व प्रकारचे मेडिकल, पॅरामेडिकल आणि फार्मसीचे अभ्यासक्रम यासाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प राहते. मग एवढ्या मोठ्या संख्येने शास्त्र शाखेत प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांचे पुढे काय होते? ज्यांना जेमतेम पास होण्यापुरते मार्क पडतात असेही अनेक असतात. त्यातील बहुतेक जण हात पोळले म्हणून शास्त्र शाखा सोडून देतात. तसेच गावात चांगले कॉलेज नाही म्हणून कला शाखा घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा विचार करणारे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आहेत. काहींना इंजिनीअरिंगची भीती वाटते, पण कॉम्प्युटरचे प्रेम कमी होत नाही ते बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतात. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स किंवा एन्वार्न्मेंट सायन्स अशा विषयांकडे मोजक्यांची वर्णी लागते. उरलेले अनेक विद्यार्थी मोठ्या शहरातील किंवा जिल्ह्याच्या गावी असलेल्या शास्त्र शाखेतील कॉलेजमध्ये पारंपारिक विषयासाठी प्रवेश घेतात. यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी, झूलॉजी, जिओलॉजी, जिओग्राफी, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अशा साऱ्या विषयांचा समावेश होतो.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
शास्त्र शाखेतून पदवीधर झालेले हे सारे विद्यार्थी हाती निकाल आल्यानंतर भांबावलेले असतात. अकरावी बारावीला अभ्यास न केलेले पण पदवी घेताना मनापासून अभ्यास केलाय अशांची संख्या जेमतेम दोन-तीन टक्के राहते. त्यांचा मास्टर्सला जाण्याचा रस्ता सोपा होतो. इतर पदवीधरांपुढे मात्र पुढे काय असा एक कठीण प्रश्न उभा राहतो. कारण पदवीच्या विषयानुरुप नोकरी मिळत नाही. पुढे शिकण्याचा हुरूप राहिलेला नसतो. मास्टर्ससाठी प्रवेश परीक्षेद्वारे विद्यापीठात प्रवेश मिळत नाही. काही जण उगाचच बी.एड.चा रस्ता धरतात. कॉम्प्युटरवाले छोटा मोठा कोर्स करण्याच्या मागे जातात पण त्याचा आयटीतील उत्तम नोकरीसाठी फारसा उपयोग होत नाही. मग करायचे काय?
हेही वाचा >>> यूपीएससीची तयारी: इतिहास विषयाची तयारी
शास्त्र विसरून, मुख्य प्रवाहात या सामान्य गणित, इंग्रजी, तर्क -विचारक्षमता, सामान्य ज्ञान यावर परीक्षा असलेले विविध रस्ते त्यांचे साठी वाट पाहत असतात. विविध बँका या चारांवर आधारित परीक्षा घेऊन नोकरी देतात. एमबीएची प्रवेश परीक्षा याच चारावर आधारित असते. गणवेशधारी सेवांसाठी विविध संधी उपलब्ध असतात. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि निमसैनिकी दले वा पोलीस दल येथील अधिकारी पदासाठी हे पदवीधर प्रयत्न करू शकतात. ज्यांना शक्य आहे, घरच्यांचा पाठिंबा आहे व जिद्द आहे त्यांना स्पर्धा परीक्षांचा रस्ता मोकळा असतो. मात्र त्यातून मिळणाऱ्या जागा मोजक्या असल्यामुळे त्याची नीट माहिती घेऊनच त्या रस्त्याला जावे. या खेरीज आवडीनुसार वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रम, संज्ञापन किंवा मास कम्युनिकेशनमधील पदवी, सोशल वर्क सारखा वेगळाच रस्ता, डिजिटल मार्केटिंग सारखी नवीन वाट, फिजिक्स वा इलेक्ट्रॉनिक्स पदवीधरांसाठी इलेक्ट्रॉनिक गुड्स मार्केटिंग, गणित व संख्या शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी डाटा सायन्समधील अभ्यासक्रम अशा रस्त्यांचा समावेश होतो. शास्त्र विषयातील पदवी घेतली म्हणजे मला त्याच विषयात सारे कळते, त्यातच नोकरी पाहिजे हा हट्ट सोडून दिला तर दमदार करियर सुरू होऊ शकते. यंदा शास्त्र शाखेत पदवीधर झालेल्या हजारोंसाठी करियरच्या स्पर्धेत धावण्याकरिता हा एक विचार इथे मांडला आहे. पालकांशी चर्चा करून तो रस्ता पकडायला हरकत नसावी.