उमेदवार वैकल्पिक विषयाची निवड करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करतात? विषय स्कोअरिंग आहे का? आपल्याला या विषयाची पार्श्वभूमी आहे का? या विषयाचे अभ्यास साहित्य सहज उपलब्ध आहे का? हा उमेदवारांमध्ये लोकप्रिय विषय आहे का? संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा पद्धतीचा आपण विचार केला तर असे लक्षात येते की एकाच एक विषयात अनेक वर्षं उमेदवारांना उत्तम गुण मिळत आहेत असे होत नाही. हे असे का होते याचा थोडक्यात विचार करूया.

या परीक्षेचं महत्व आणि काठिण्य पातळी टिकू देण्यासाठी हे होत असो. एखाद्या विषयात उमेदवारांना चांगले गुण मिळतात तेव्हा या विषयांचं मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेस ना सुद्धा या विषयाच्या स्कोअरिंगसाठी काय काय टॉपिक्स केले पाहिजेत-त्या टॉपिक्स वर कशाप्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येत असतो आणि त्यानुसार ते कोचिंग देत असतात. विद्यार्थीही एकमेकांशी चर्चा करत असतात, नोट्स ची देवाणघेवाण करत असतात. या सर्वातून स्कोअरिंगचा पॅटर्न तयार होतो. आणि हा पॅटर्न जास्त टिकू न देण्याचा यशस्वी प्रयत्न परीक्षा पद्धतीमध्ये होत असतो. सध्याच्या काळात कुठचे वैकल्पिक विषय विद्यार्थीप्रिय आहेत ते एकदा बघूया. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, अँथ्रोपॉलॉजी वा मानववंशशास्त्र , मॅथेमॅटिक्स (प्रामुख्याने आयआयटी मध्ये शिकलेले उमेदवार हा वैकल्पिक विषय घेतात), सोशॉलॉजी वा समाजशास्त्र हे सर्वात जास्त प्रमाणात सध्या घेतले जाणारे वैकल्पिक विषय दिसतात. या बरोबरीने भूगोल, इतिहास, फिलॉसॉफी वा तत्त्वज्ञान, सायकॉलॉजी वा मानसशास्त्र हेही विषय घेतले जातात. एमबीबीएस उमेदवार मेडिकल सायन्स हा वैकल्पिक विषय अनेकवेळा निवडतात.

वैकल्पिक विषयावर तुम्ही मुख्य परीक्षेत ५०० गुणांचे पेपर्स लिहिल्याने सहसा जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. जे प्रश्न विचारले जातात त्यामध्येही थिअरी संबंधी प्रश्न खूप कमी असतात. त्या विषयाचं उपयोजन (अॅप्लिकेशन ) हा प्रश्नांचा फोकस असतो. उमेदवाराने जो वैकल्पिक विषय घेतला असेल त्याचा प्रशासनात काय उपयोग आहे हा प्रश्न हमखास अनेक उमेदवारांना विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तराची व्यवस्थित तयारी करावी. कारण या प्रश्नाच्या आधारे काही उपप्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. याचे एक उदाहरण बघूया. एखाद्या उमेदवाराचा वैकल्पिक विषय भूगोल आहे, तर त्याचा प्रशासनात काय उपयोग होईल असा प्रश्न विचारला तर उमेदवार सांगेल की यामुळे देशाबद्दल आणि जगातल्या महत्त्वाच्या भूप्रकारांबद्दल, महासागरांबद्दल, हवामानाबद्दल माहिती मिळते.

या माहितीचा शेती, हवामान बदल, आंतरराष्ट्रीय संबंध या सर्वात उपयोग होऊ शकतो. मग असा उपप्रश्न विचारला जाऊ शकतो, ‘पनामा कालव्याचे भौगोलिक आणि राजकीय महत्त्व काय आहे?’ भारताच्या भूगोलामुळे भारताचा इतिहास रचला गेला का? कारण सुरुवातीला नदी, नाले, पाण्याच्या जवळ लोक रहात होते. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना १९९३ साली लातूर, उस्मानाबाद भूकंप का व मोठया प्रमाणात प्राणहानी का झाली? भूकंप प्रवण क्षेत्रात कोणत्या प्रकारची घरे बांधावीत या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात.

पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा वैकल्पिक विषय असेल तर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आज बघूया. ब्युरोक्रसी ही संकल्पना कोणी मांडली? ब्युरोक्रसी बद्दल मॅक्स वेबर ने काय काय मुद्दे/विचार मांडले आहेत? आजच्या काळात ते कितपत महत्त्वाचे आहेत? QUAD / BRICS / ASEAN/ SAARC/ BIMSTEC याचं भारतासाठी महत्त्व काय? इस्रायल- हमास संघर्षामध्ये व युक्रेन-रशिया संघर्षात भारताची भूमिका काय आहे? ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा सामना आपण कसा करणार आहोत? भारताची लूक इस्ट आणि अॅक्ट इस्ट ही धोरणे काय आहेत? भारतासाठी बांग्लादेशाबरोबर सदसंबंध का महत्त्वाचे आहेत? भारत आणि चीन देशाच्या संबंधित भारताने चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पात का सहभाग घेतला नाही? चीन ब्रम्हपुत्रा नदीवर मोठे धरण बांधत आहे या धरणामुळे भारताचे काय नुकसान होऊ शकते?

उमेदवार मुलाखतीसाठी जातो त्या दरम्यान भारताच्या पंतप्रधानांनी किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी कोणत्या देशाला भेट दिली असेल किंवा इतर कोणत्या देशाचे राष्ट्रपती/पंतप्रधान भारतात असतील तर त्यांच्याशी असणाऱ्या भारताच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. या भेटींमध्ये काही महत्वाचे करार झाले असतील तर त्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपले प्रधानमंत्री नुकतेच ज्या देशाचा दौरा करून आले त्या विषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे असते

इतर वैकल्पिक विषयांबद्दलचे प्रश्न पुढच्या काही लेखांमध्ये बघू.

mmbips@gmail. com

supsdk@gmail. com