R. G. Chandramogan Success Story: एका हातगाडीवर आइस्क्रीम विकण्यापासून ते आज अब्जावधींच्या कंपनीचा मालक होण्याचं स्वप्न आर. जी. चंद्रमोगन यांनी पूर्ण केलं. ‘इच्‍छा तेथे मार्ग’ ही म्हण सार्थ ठरवीत, त्यांनी दाखवून दिलं की, कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांनी आपणं हवं ते मिळवू शकतो. लाखो लोकांसाठी आज ते प्रेरणास्थान आहेत. चला तर मग जाणून घेऊ त्यांचा यशोदायी प्रवास…

गरिबीमुळे सोडावी लागली शाळा

तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील तिरुथंगल शहरात जन्मलेल्या चंद्रमोगन (R. G. Chandramogan) यांना लहान वयातच आव्हानांचा सामना करावा लागला. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मध्यंतरी शाळा सोडावी लागली. परंतु, एवढं सगळं होऊनही चंद्रमोगन यांनी पराभव स्वीकारला नाही.

हेही वाचा… फोन केला बंद अन् सोशल मीडिया केलं डिलीट; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या IAS परी बिश्नोई यांचा प्रेरणादायी प्रवास

१९७० मध्ये २१ वर्षीय चंद्रमोगन यांनी चेन्नईतल्या रोयापुरममध्ये २५० स्क्वेअर फूट जागा भाड्यानं घेतली आणि तीन कर्मचाऱ्यांसह स्वतःची आइस्क्रीम कंपनी सुरू केली.

कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय

चंद्रमोगन यांचं स्वप्न मोठं होतं. १९८६ मध्ये त्यांनी कंपनीचं नाव बदलून, त्याचं हटसन ॲग्रो प्रॉडक्ट्स (Hatsun Agro Products), असं नामकरण केलं. हे रीब्रॅण्डिंग कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. हटसननं अरोक्या (arokya) व गोमाथा (gomatha) यांसारख्या लोकप्रिय ब्रॅण्डअंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन सुरू केलं. त्यांच्या कंपनीनं तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांतील बाजारपेठांमध्ये प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी प्रीमियम आइस्क्रीम ब्रॅण्ड इबाको (Ibaco) लाँच केल्यानं चंद्रमोगन यांची बदलत्या बाजारातील कल आणि ग्राहकांच्या पसंतीशी जुळवून घेण्याची क्षमता दिसून आली.

हेही वाचा… समोसा विक्रेता होणार डॉक्टर! भाड्याची खोली, रात्रभर अभ्यास अन् ‘अशी’ केली NEETची परीक्षा पास; वाचा १८ वर्षाच्या सनी कुमारचा थक्क करणारा प्रवास

आज करोडो रुपयांचे साम्राज्य

‘हटसन ॲग्रो’चा व्यवसाय जसजसा वाढत गेला, तसतशी त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत गेली. आज कंपनीत आठ हजार लोक काम करतात. चंद्रमोगन (R. G. Chandramogan) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा आणि व्यावसायिक कौशल्याचा हा पुरावा आहे. कंपनीकडे आता १,००० पेक्षा जास्त स्‍पेशलाइज्‍ड अरुण आइस्क्रीम पार्लर (Arun Icecream) आहेत. तमिळनाडू, कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशात त्यांच्या फ्रँचाइजी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘अरुण आइस्क्रीम’ने २०२३ मध्ये ७,२०० कोटी रुपयांची उलाढाल केली.

१३ हजार रुपयांनी केली होती सुरुवात

चंद्रमोगन (R. G. Chandramogan) यांनी लाकडाच्या डेपोमधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना महिन्याला फक्त ६५ रुपये पगार मिळत होता. मात्र, त्यांना नोकरीत रस नव्हता. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे अवघ्या एका वर्षानंतर त्यांनी नोकरी सोडली. चंद्रमोगन यांनी आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या केवळ १३ हजार रुपयांपासून सुरुवात केली. आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन, हातगाडीवरून आइस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी ग्रामीण भागाला लक्ष्य केलं.