रेल्वे आपल्या विविध विभागांतर्गत होणाऱ्या थेट भरतीमध्ये अराजपत्रित पदांवर अग्निवीरांना १५ टक्के Cumulative Reservation देणार आहे. यासह अग्निवीरांना वयाची अट आणि फिटनेस परीक्षण यांमध्येही सूट दिली जाणार आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफमधील अग्निवीरांना आरक्षण देण्याच्या निर्णयावरही सध्या विचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमधील आरक्षण – लेव्हल-१ मध्ये १० टक्के, लेव्हल-२ मध्ये ५ टक्के आणि त्यावरील अराजपत्रित पदांवर माजी सैनिकांसह अपंगत्व असलेले उमेदवार (PwBD) आणि कोर्स कम्प्लेटेड अॅक्ट अप्रेंटिस (CCAAs) यांना दिले जाणारे आरक्षण हे Horizontal Reservation असेल.
अग्निवीरांना शारीरिक क्षमता चाचणी आणि वयाच्या अटींवर मिळणार सूट
अग्निवीरांना शारीरिक क्षमता चाचणीसह वयाच्या बंधनावर सूट मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या बॅचसाठी पाच वर्षं आणि त्यापुढील बॅचसाठी लेव्हल-१, लेव्हल-२ आणि त्यांच्यावर असणाऱ्या पदांसाठी विविध गटांसाठी निश्चित केलेल्या वयाच्या अटींवर सूट दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना अधिकृत पत्र पाठवून रेल्वेमध्ये भरती करणाऱ्या संस्थांना वेतन लेव्हल-१ आणि वेतन लेव्हल-२ यांसाठी भरतीमध्ये ठराविक उमेदवारांना (अग्निवीरांना) सवलती देण्यास सांगितले आहे. याअंतर्गत भारतीय सैन्यात चार वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे, अशा अग्निवीरांना अराजपत्रित पदावर सवलती/ सुविधा मिळणार आहे. केंद्राने मागच्या वर्षी सुरू केलेल्या अग्निपथ भरती योजनेंतर्गत चार वर्षं पूर्ण झाल्यानंतर २५ टक्के भरती केली जाणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर आणि अपंग व्यक्ती यांसारख्या Horizontal Reservation असलेल्या गटातील उमेदवारांना वर्टिकल श्रेणींच्या माध्यमातून समान संधी दिली जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासह अनेक उद्योग संस्था अग्निवीरांना समान नोकरी आरक्षण योजनांद्वारे करिअरचा योग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. सैन्यामध्ये चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले अग्निवीर कागदोपत्री पुरावे घेऊन रेल्वे भरती एजन्सीद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
बोर्डाने पाठवलेल्या पत्रामध्ये सरव्यवस्थापकांना उद्देशून लिहिले आहे की, रिक्त जागांमध्ये नियुक्ती न झाल्यास भरती पुढे न ढकलता त्या जागा संयुक्त गुणवत्ता यादीतील इतर उमेदवारांद्वारे भरल्या जातील. लष्करामध्ये चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागतील. लेखी परीक्षेला उपस्थित राहिल्यावर उमेदवारांना ही रक्कम परत केली जाईल.
रेल्वेच्या विविध विभागांमध्ये साहाय्यकांच्या नियुक्तीसाठी लेव्हल-१ पदांकरिता परीक्षा घेतली जाईल. लेव्हल-२ आणि त्यावरील श्रेणींमध्ये कनिष्ठ लिपिक, सहटंकलेखक, स्टेशन व्यवस्थापक आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जातील.