डॉ.श्रीराम गीत
दहावीचे सर्व बोर्डाचे निकाल लागले आहेत. ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या काहींनी यूपीएससीची परीक्षा देणार असा मानस व्यक्त केला. पालकांचा त्याला पूर्ण पाठिंबा असणार. आपल्या मुलांचे त्यांना खूप कौतुक वाटणार. डॉक्टर, इंजिनीअर, सीए होण्याऐवजी यूपीएससी देऊन आयएएस होणार असे म्हणणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यंदाचे ठोस कारण म्हणजे यूपीएससीचा निकाल त्याच सुमाराला लागला. वृत्तपत्रांतून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक, फोटो व मुलाखती छापून आल्या.
‘करियर मंत्र’, या गेले सहा वर्ष चालू असलेल्या प्रश्नोत्तर सदरामध्ये सर्वात जास्त प्रश्न यूपीएससी व एमपीएससी बद्दल असतात. त्यांचे उत्तरापेक्षा येथे वेगळे लिहून, पद मिळेल त्यांना काय स्वरूपाचे काम करावे लागते याची माहिती विद्यार्थी व त्यांचे पालकांना देत आहे.
ओरिसातील बालासोरला झालेल्या भीषण अपघाताचे उदाहरणातून हे सारे वाचकांपर्यंत पोहोचवणार आहे. अपघातानंतर अनेक सचिव व मंत्री पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले. त्यांचे समोरच्या प्रश्नांची आपण यादी करू यात.
१) अपघाताचे स्थळ कोणत्या गावी, कोणत्या तालुक्यात येते?
२) जवळची मोठी रुग्णालये किती? त्यांची सेवा देण्याची क्षमता काय?
३) तिथे किती अॅम्बुलन्स लागतील? त्या कुठून पुरवायच्या?
४) जवळच्या शहरापासून पोहोचण्यासाठीचे रस्ते कसे आहेत?
५) अपघातग्रस्त डबे हलवण्यासाठी किती क्रेन्स लागतील?
६) मृतांच्या व अपघातात जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठीचे माहिती केंद्र कसे चालवायचे? कुठून चालवायचे बालासोर, भुवनेश्वर, दिल्ली?
७) दुखापतीचा रुग्णालयातील खर्च कोण करणार?
८) मृतांसाठी नुकसान भरपाई किती द्यायची? कोण देणार? विमा कंपनी का रेल्वे?
९) ओळख पटवण्यासाठीचे कायदे कानून काय सांगतात?
१०) विना तिकीट प्रवाशांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा?
११) असे अपघात होऊ नयेत म्हणून नेमल्या जाणाऱ्या चौकशीच्या कायदेशीर मर्यादा कशा आखायच्या? कोण आखणार?
१२) याची एकत्रित माहिती गोळा करून जनतेतून येणाऱ्या प्रश्नांना तोंड कोण, कधी, कसे देणार? कसाही, कोणताही, कुठेही या प्रश्नांसाठी उत्तरदायी अधिकारी हा यूपीएससीचे कठोर निवडीतून बाहेर पडलेला, त्यानंतर प्रशिक्षण घेतलेला असतो. प्रशिक्षणानंतरची पहिली सोळा वर्षे तो विविध स्वरूपाचे स्थानिक पातळीवरचे, शहराचे वा जिल्ह्याचे प्रश्न सोडवतो. प्रश्नाची सखोल माहिती घेऊन विश्लेषण करून त्यावर उपाययोजना करण्याचे काम करतो. कोणत्याही खात्यात बदली होणे, कोणाच्याही गावी पाठवणे हा दर अडीच वर्षांनी येणारा एक बदल असतो. हा कधीही चुकत नाही. सोळा वर्षांची अशी सेवा झाल्यानंतर एखाद्या खात्याचा सहसचिव म्हणून कार्यभाग येतो. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे वेगळे वेगळे सचिव असतात. हे माझे काम नाही, हे मला येत नाही, असे त्यांचे पैकी कोणालाही म्हणण्याची मुभा नसते. हे सारे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे प्रत्येकाला पद, प्रतिष्ठा, पैसा पाहिजे म्हणून स्पर्धा परीक्षांकडे वळावे वाटते. पण नंतरच्या कामाबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये अज्ञान असते. अनेक सरकारी अधिकारी आपल्याला सहजपणे भेटतात. मात्र यूपीएससी झालेला कलेक्टर सहजपणे गप्पा मारायला कोणालाही उपलब्ध नसतो. त्याला फक्त फोटोत आपण सारे पाहतो. ज्यांना यूपीएससी व्हायचे आहे त्यांनी हे समजून घ्यावे, स्पर्धेत धावण्यापूर्वी.