कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठलेही काम, ते करताना महत्त्वाचे आहे ते म्हणजे नियमितता, नियोजन आणि ‘फोकस’ म्हणजेच लक्ष केंद्रित करणे. ते केले म्हणजे यश मिळतेच, सांगताहेत आयएएस अधिकारी संपदा मेहता.
माझा जन्म आणि उच्च शिक्षण हे सगळं पुण्यात झालं. मी केवळ मुलींसाठी असलेल्या हुजुरपागा या शाळेत मराठी माध्यमातून शिकले. त्यासाठी प्रोत्साहन दिलं जायचं. मला अभ्यासात उत्तम गती होती. त्याबरोबरीने मी स्नेहसंमेलन, वत्कृत्व स्पर्धा यांमध्येही स्वयंप्रेरणेने सहभागी व्हायचे. माझे वडील व्यवसायाने सीए आहेत. त्यांचा सामाजिक कार्याकडे प्रचंड ओढा होता. ते अनेक संस्थांशी जोडले गेले आहेत. दहावी नंतर आपला कल इंजिनीअर किंवा डॉक्टर याकडे नाही हे मला जाणवायचं. अधिक व्यापक काय करता येईल, याचा मी विचार करत असतानाच वडिलांनीच मला सुचवलं की मी स्पर्धा परीक्षा द्यावी. मात्र, त्यापूर्वी मी सीए ही पूर्ण करावं.
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी स्पर्धा परीक्षांतून मिळणार होती. एकूणच व्यक्तिमत्वाचा कस लागणार होता आणि महत्त्वाचं म्हणजे अकरावी-बारावीच्या वयात प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कामाचा प्रभाव माझ्या विचारांवर पडला होता. त्यातूनच स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय पक्का झाला. बारावीनंतरच मी त्यादृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. पुण्यात पुरुषोत्तम पाळंदे हे निवृत्त आयएएस अधिकारी होते. ते महाविद्यालयीन मुलांसाठी दर शनिवारी आणि रविवारी गट चर्चा घ्यायचे. त्यातून मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळायचे. मीही त्या गट चर्चांना जायचे. त्यांच्याशी आणि तिथे केलेल्या चर्चेतूनच मी प्रथम सीए पूर्ण करायचे हे पुन्हा निश्चित झाले. मी सीए पहिल्या प्रयत्नाच पूर्ण केले. शालेय जीवनातील इयत्ता आठवीपासूनच मी ज्ञान प्रबोधिनीच्या छात्र प्रबोधन मासिकाशी जोडले गेले होते. सीए झाल्यानंतर पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा वर्गांमध्ये नाव नोंदवले. माझा वाणिज्य विषय असल्याने त्या विषयातून यूपीएससीची परीक्षा दिलेले मला पुण्यात कोणी मिळू शकले नाही. योग्य मार्गदर्शकाचा शोध सुरू असतानाच मला एका स्पर्धा परीक्षेसंबंधीत नियतकालिकामध्ये सीए करून नुकतेच आयएएस झालेल्या एका अधिकाऱ्याची माहिती मिळाली. मी प्रयत्नपूर्वक त्यांच्याशी संपर्क साधला असता, मला माझ्या विषयासाठी दिल्लीला गेले तर फायदा होऊ शकतो असे त्यांनी सुचवले. मी ही माहिती घेतली आणि त्यातून मग दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला माझ्या पालकांनीही पूर्ण पाठिंबा दिला.
हेही वाचा >>> Success Story: चार लाखांच्या भांडवलात सुरु केला व्यवसाय; पाहा उद्योजक, इनोव्हेटर रंजित वासिरेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास
मी प्रत्यक्ष दिल्लीला गेले तेव्हा सुरुवातीचे काही दिवस खूप तणावाचे होते. कारण पुण्याच्या तुलनेत तिथले वातावरण, भाषा, संस्कृती सगळेच वेगळे होते. मात्र, तिथे मला हवे असलेले मार्गदर्शन मिळाले. मी एकूण तीन वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. प्रत्येक प्रयत्नात मी यश मिळवत होते. मी माझ्या रँकनुसार मिळालेल्या पदावर नियुक्तीही स्वीकारली होती. आयआरएस (इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये माझी दोनदा नियुक्ती झाली होती. माझं ध्येय मात्र ‘आयएएस’ असल्याने मी तिसऱ्यांदा परत परीक्षा दिली.
आणि त्यानंतर माझ्या मनाजोगती रँक मिळून आयएएससाठी माझी निवड झाली.
प्लॅन बी आधीच तयार ठेवा
तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तुमचा प्लॅन बी आधीच तयार ठेवा. मला वाटते स्पर्धा परीक्षांसाठी तुमचे शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या तयारी केली पाहिजे. मात्र, तत्पूर्वी तुमचे प्लॅन बी साठीचे शिक्षण पूर्ण असावे. कारण स्पर्धा परीक्षांसाठी तीन चार वर्षांचा कालावधी दिल्यानंतर तुम्ही पुढील शिक्षण किंवा प्लॅन बी साठी विचार करणे करिअरच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे पूर्णत: नियोजन करून, अभ्यास केल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या दोन ते तीन प्रयत्नांतर प्लॅन बी अमलात आणावा. मी सीए केले होते. मला यशाची खात्री होतीच, पण तरीही यश मिळाले नसते तर मी सीएची प्रॅक्टीस करू शकले असते.
नियमितता महत्त्वाची
कुठलेही काम असो, परीक्षा असो त्यासाठी अभ्यास किंवा प्रयत्नांत नियमितता महत्त्वाची आहे. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. आपले ध्येय काय, आपल्याला काय करायचे आहे, यावर लक्ष्य केंद्रित करून निर्णय घ्या. त्यानुसार नियोजन करा. जुने पेपर सोडवा. एकदा पूर्ण तयारीनिशी परीक्षा दिली की पुन्हा मुळापासून अभ्यास करायला लागत नाही. तुम्ही तुमच्या कमतरता जाणून घेऊन सुधारणा करू शकता.
तणाव व्यवस्थापनाचे अनेक पर्याय
परीक्षा म्हटली की ताण-तणाव आलाच. मी तणाव घालवण्यासाठी मेडिटेशन करायचे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी चालण्याचा व्यायाम करायचे. मात्र, सध्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी, तसंच शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेता येतो.
ग्रुप हवा, चर्चा हवी
माझ्या विषयाशी निगडीत मार्गदर्शन मिळविण्यासाठी मी दिल्लीला गेले. मात्र, प्रत्येकालाच दिल्लीला जाण्याची गरज नाही. आजकाल व्यावसायिक मार्गदर्शन प्रत्येक मोठ्या शहरात अगदी जिल्ह्याजिल्ह्यात उपलब्ध आहे. क्लासेस नसले तरी जी मुलं गांभीर्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, अशा मुलांशी ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले पाहिजे. गटचर्चेतून आपले विचार अधिक प्रगल्भ होतात आणि एकाच विषयाचे अनेक पैलू समजण्यास मदत होते.
यशानंतर लवचीकता ठेवणे आवश्यक
स्पर्धा परीक्षा देताना स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो. सगळ्यांना सारख्याच तयारीला सामोरे जावे लागते. मात्र, यश मिळाल्यानंतर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अगदी कामाच्या ठिकाणी एकटं राहण्यापासून ते जिथे नियुक्ती होईल तिथले वातावरण, संस्कृती स्वीकारण्यापासून ते अगदी लग्नापर्यंत. मात्र, सगळ्याच बाबतीत लवचीकता ठेवल्यास सगळेच सोपे, सहज होते. त्यासाठी तुम्ही तुमची सपोर्ट सिस्टिम तयार करणे आवश्यक आहे.
शब्दांकन : प्रज्ञा तळेगावकरआपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com