डॉ. अरविंद नातू, अध्यक्ष, आयसर तिरुवनंतपुरम्
जेव्हा मी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विचारतो तुम्ही पुढे काय करणार आहात? तेव्हा मला विद्यार्थी विविध क्षेत्रांची नावं सांगतात. त्यावर मी त्यांना त्या क्षेत्राची एक पानभर माहिती लिहून काढायला सांगितल्यावर त्यांना त्या विषयाबद्दल लिहीता येत नाहीत. विद्यार्थ्यांना अनेक वेळा आपण निवडणाऱ्या क्षेत्रांची पुरेशी महिती नसते फक्त आजूबाजूच्यांकडून ऐकून हे क्षेत्र निवडायचे असे ठरवलेले मला नेहमी दिसून येते.
क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यांनी आपण या क्षेत्रात कसे करिअरची संधी निर्माण करणार या प्रश्नात न अडकता आपण कसेही या क्षेत्रात आपले यशस्वी करिअर करू हा आत्मविश्वास जोपासला पाहिजे. जर विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शाखा निवडणार असतील तर त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये गल्लत करू नये. विज्ञान आणि तंत्रज्ञान एकमेकांमध्ये गुंतलेले असले तरीही हे दोन वेगळे आणि फार महत्त्वाचे विषय आहेत.
संशोधकांविषयी लोकांना अनेक प्रश्न असतात. चित्रपटात दाखवल्यामुळे लोकांना असे वाटते संशोधक हे नेहमी बंद खोलीत पुस्तकांमध्ये दिवसरात्र काम करत असतो. परंतु, खऱ्या आयुष्यात संशोधक नेहमी आपल्या कामाचा आनंद घेत काम करतात. संशोधन म्हणजे, काही तरी नवीन शोधण्याचा आनंद. प्रत्येक विद्यार्थी हा मुळात संशोधक असतो. एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे हा गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असतोच, गरज असते ती फक्त योग्य त्या मार्गदर्शनाची. निरीक्षणातून संशोधन होत असते. आतापर्यंत नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून अनेक संशोधकांनी मानवासाठी उपयुक्त सामग्रींची निर्मिती केली आहे.
परंतु, संशोधन क्षेत्रात जाणारे सगळेच विद्यार्थी शास्त्रज्ञ होतातच असे नाही. एखाद्या विद्यार्थाला काही नवीन करायचा असेल तर त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना जर संशोधन क्षेत्रात भविष्य घडवायचे असेल तर त्यांनी परदेशी जाण्याच्या दृष्टीने शिक्षण न घेता आपल्या देशाला कसा फायदा होईल याचा विचार करावा. शिक्षण घेतल्यानंतर पुढे ५० ते ६० टक्के विद्यार्थी संशोधन क्षेत्रात करिअर करू शकतात. संशोधन क्षेत्रात तुम्हाला अनेक वेळा अपयश येते, याची तयारी देखील विद्यार्थ्यांनी केली पाहिजे.